अपेटायझर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अपेटायझर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ जानेवारी, २०१६

पोहा भजी



साहित्य :-
१. १ कप पोहे 
२. अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी एकत्र करून घ्यावे 
३. पाव कप किसलेला दुधी 
४. पाव कप किसलेले गाजर 
५. शिजवून घेतलेले मटार पाव कप 
६. किसलेलं आलं आणि लसूण प्रत्येकी एक चमचा 
७. तिखट चवीनुसार 
८. हळद पाव चमचा 
९. ४ ते ५ चमचे बेसन 
१०. चवीनुसार मीठ 
११. तळणीसाठी तेल 
१२. बारीक चिरलेली कोथिंबीर 

फोडणीसाठी साहित्य :-
१. १ चमचा तेल 
२. अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जीरं 
३. पाव चमचा हिंग 

कृती:-
प्रथम पोहे धुऊन घ्यावेत व त्यातले पाणी पूर्णपणे काढून घ्यावे. त्यात दही व पाण्याचे मिश्रण घालून एकत्र करून २० - २५ मिनिटे झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने बाकीचे सर्व पदार्थ घालून थोडे पाणी घालून परत एक १० मिनिटे ठेवावे. एका छोट्या पातेल्यात फोडणी करावी. फोडणीमध्ये मोफारी, जीरं व हिंग घालावे आणि ही फोडणी पोह्याच्या मिश्रणात घालावी. सर्व पीठ चमच्याने छान एकत्रित करून घ्यावे. एका कढईमध्ये तेल तापवावे व हाताने पिठाचा एक एक छोटा गोळा तेलात तळण्यासाठी सोडावा. ही भाजी छान सोनेरी होईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तळून घ्यावीत. सॉस बरोबर गरम गरम serve करावीत. 

वाढणी :- वरील पिठात साधारण १७ ते २० भज्या होतील. 

१५ जून, २०१५

स्वीट कॉर्न चाट



साहित्य :-
१. उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे  २ कप 
२. बारीक चिरलेली सिमला मिरची पाव कप 
३. बारीक चिरलेला कांदा अर्धा कप 
४. बिया काढून बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप 
५. बारीक चिरलेली कोथिंबिर अर्धा कप 
६. बारीक चिरलेली हिरवी मिरची स्वादानुसार 
७.  बारीक चिरलेली काकडी अर्धा कप 
८. जीरा पावडर अर्धा चमचा
९. चाट मसाला अर्धा चमचा 
१०. लिंबुरस १ चमचा 
११. चवीनुसार मीठ 

कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे व स्वीट कॉर्न चाट serve करावी. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

२७ फेब्रुवारी, २०१४

राईस आणि कॉर्न बॉल्स

साहित्य:-
१. शिजवलेला भात २ वाट्या 
२. शिजवून मॅश केलेले  कॉर्न
३. पाव वाटी मैदा 
४. १ कप दूध 
५. ३ ते ४ चमचे बटर 
६. २ हिरव्या मिरच्या 
७. पेरभर आलं 
८. २ ते ३ लसणाच्या पाकळ्या 
९. अर्धी वाटी कोथिंबीर 
१०. पाव वाटी कॉर्नफ़्लॉर 
११. अर्धी वाटी ब्रेड क्रम्स 
१२. चवीनुसार मीठ 
१३. तळणीसाठी तेल 

कृती:-
प्रथम आलं, लसूण, मिरची वाटून घ्यावी. एका पसरट जड बुडाच्या पातेल्यामध्ये बटर घालावे आणि ते वितळायला लागले की त्यात मैदा घालावा. सतत ढवळावे म्हणजे मैदा जास्त भाजला जाणार नाही. मैद्याला रंग चढायच्या आधी त्यात दूध घालावे. दूध घातल्यावर मात्र सतत गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत ढवळावे. हा सॉस घट्ट होत आला की  एका पसरट ताटलीमध्ये काढून घेऊन गार करून घ्यावा. गोल होईल अशा consistency चा हा व्हाईट सॉस तयार झाला की मग त्यात शिजवलेला भात, कॉर्न, मिरची आलं आणि लसणाच वाटण, कोथिंबीर, कॉर्नफ़्लॉर, ब्रेड क्रम्स व चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊन तेलावर मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर टाळून घ्यावेत. कुठल्याही चटणी किंवा सॉस बरोबर serve करावेत. 

वाढणी :- ३ ते ४ माणसे. 

३० एप्रिल, २०१२

बटाटा वडा






साहित्य :-
१. उकडलेले बटाटे ३ ते ४
२. ४ हिरव्या मिरच्या 
३. ४ ते ५ लसूण पाकळ्या 
४. पेरभर आल्याचा तुकडा 
५. कोथिंबीर
६. ५ ते ६ चमचे डाळीचे पीठ/ बेसन 
७. अर्धा चमचा तिखट
८. पाव चमचा हळद
९. चिमूटभर बेकिंग सोडा
१०. चवीनुसार मीठ
११. तळणीसाठी तेल

कृती:-
प्रथम उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यावेत. हिरवी मिरची, लसूण व आलं मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. तेलावर हे वाटलेलं आलं, लसूण व मिरची थोडसं परतून घ्यावं. त्यात चिमूटभर हळद घालावी. मॅश केलेला बटाटा घालावा व लगेचच आच बंद करावी. थोडी कोथिंबीर घालून या मिश्रणाचा छान गोळा करून घ्यावा.  मग बेसन, तिखट, सोडा, हळद व मीठ हे सर्व एकत्र करावं. थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे थोडं दाटसर पीठ बनवून घ्यावं. बटाट्याच्या मिश्रणाचे लहान मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल तापवून घ्यावं. आच माध्यमच ठेवावी.  बटाट्याचा एक गोळा बेसनाच्या मिश्रणात घोळवून तेलात सोडवा व छान खुसखुशीत वडे तळून घ्यावेत. केचअप बरोबर किंवा पुदिना कोथिंबिरीच्या चटणीसोबत गरम गरम serve करावेत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

२२ मार्च, २०१२

हरा भरा कबाब


साहित्य :-
१. १ कप ब्लांच केलेला पालक
२. १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा
३. अर्धी वाटी उकडून ठेचलेले मटार
४. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
५. अर्धा चमचा किसलेला आलं
६. ३ ते ४ चमचे कॉर्नफ्लोर
७. १ चमचा चाट मसाला
८. चवीनुसार मीठ
९. तळणीसाठी तेल

कृती :-
प्रथम पालकाची पणे खुडून ती ब्लांच करून घ्यावीत. म्हणजे उकळत्या पाण्यात पालकाची पानं घालून २ ते ४ मिनिटे ती उकळायची आणि लगेचच गार पाण्यात घालायची. असं केल्याने पालकाचा हिरवा रंग छान खुलून येतो आणि पालक थोडा शिजतोही. गार पाण्यातून पानं काढली की त्यातलं शक्य तेवढं पाणी काढून ती पानं चिरून घ्यावी. मटार उकडावेत व त्यातालेदेखील पाणी काढून ते ठेचून घ्यावेत. मग उकडलेला बटाटा हाताने छान कुस्करून घ्यावा. त्यात पालक, मटार, बारीक चिरलेली मिरची, किसलेला आलं, कॉर्नफ्लोर, चाट मसाला व मीठ घालावं. छान गोळा मळून घ्यावा. पाहिजे त्या आकाराचे कबाब करून ते तळून घावेत. कबाब तेलात पसरायला लागले तर त्यात थोडं कॉर्नफ्लोर घालून परत गोळा मळून घ्यावा. यासाठी पहिले एक छोटा गोळा तेलात टाकून तो फुटत नाही ना ते पाहावे व मगच बाकीचे कबाब करायला घ्यावेत. तुम्ही हे कबाब shallow fry पण करू शकता. हे कबाब बनवताना मध्ये पनीरचा तुकडा, काजू किंवा मनुका घालून शाही हरा भरा कबाब देखील बनवता येईल.

वाढणी :- २ ते ३ माणसे

३ फेब्रुवारी, २०१२

राज कचोरी


साहित्य :-
१. मैदा १ कप
२. १ ते ३ चमचे तेल
३. चवीनुसार मीठ
४. साधारणपणे १/४ कप कोमट पाणी
५. १/३ कप बेसन
६. चिली फ्लेक्स अर्धा चमचा
७. आमचूर पावडर १ चमचा
८. मोड आलेले मुग २ वाट्या
९. २ उकडलेले बटाटे
१०. पुदिना, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर यांची चटणी
११. चिंचेची गोड चटणी (ही चटणी ब्लॉगवर लिहिलेली आहे.)
१२. १ कप फेटलेलं दही
१३. कोथिंबीर, शेव सजावटीकरता
१४. तळणीसाठी तेल

कृती:-
प्रथम मैदा, १ चमचा तेल चवीनुसार मीठ व कोमट पाणी हे सर्व जिन्नस एकत्र करून अगदी मऊसर कणिक मलीन घ्यावी. मैद्याची कणिक भिजवताना नेहेमी जास्त वेळ कणिक मळावी. १० ते १५ मिनिटं कणिक झाकून ठेवावी. आता बेसन, १ चमचा तेल, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स व आमचूर पावडर हे सर्व जिन्नस हाताने एकत्र करून घेऊन सारण करून घ्यावे. मोड आलेले मुग एका कढईमध्ये २ ते ४ चमचे पाणी घालून व चवीपुरतं मीठ घालून थोडे मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावेत. उकडलेला बटाटा चौकोनी चिरून घ्यावा. मैद्याची जी कणिक आपण माळली होती ती घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. हे गोळे तळहाताएवढे लाटून घ्यावे. या लाटलेल्या कणकेमध्ये बेसनाचे सारण जे आपण तयार केलं होतं ते चमचाभर भरून घ्यावं. सारण भरून कणकेचे गोळे करून ते थोडावेळ बाजूला ठेवावेत. एक ५ ते १० मिनिटांनी हे बेसनाचे पीठ भरलेले गोळे घेऊन पुन्हा तळहाताएवढे लाटून घ्यावेत. लाटताना ज्या बाजूने हे गोळे बंद केले आहेत ती बाजू वरती घेऊन लाटावेत. त्यामुळे कचोरी छान फुलून येते. कढईमध्ये तेल तापवावे. पण तेल जास्त कढत असू नये. कचोरी तेलात टाकली की ती लगेच वर येत कामा नये. ती आपोआपच फुगते व वर येते. तेलात कचोरी तळताना ती सतत हलवू नये किंवा तेलात खाली दाबू नये. मध्यम आचेवर कचोरी दोन्ही बाजूने ब्राऊन होईपर्यंत तळावी. अशी तळलेली कचोरी जास्त कुरकुरीत होते. कचोरी तयार झाल्यावर ती गार झाली की मग त्याला पाणीपुरीच्या पुरीप्रमाणे मध्ये भोक पाडावे. आता या कचोरीमध्ये उकलेल्या बटाट्याच्या फोडी, शिजवलेले मोड आलेले मुग, पुदिन्याची हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी, फेटलेलं दही, कोथिंबीर व बारीक शेव घालून छान सजवून serve करावी.

वाढणी :- वरील साहित्यात १० ते १२ कचोरी होतील.

२६ जुलै, २०११

मशरूम पनीर कबाब


साहित्य :-
१. १० ते १२ मशरूम
२. १० ते १२ पनीरचे चौकोनी तुकडे
३. १ सिमला मिरची
४. १ टोमॅटो
५. १ कांदा
६. १ चमचा आलं
७. ४ ते ५ लसूण पाकळ्या
८. ३ ते ४ मिरच्या
९. १ चमचा जीरं पूड
१०. १ चमचा गरम मसाला
११. १ चमचा चाट मसाला
१२. १ चमचा मध
१३. १ चमचा लिंबू रस
१४. चवीनुसार मीठ
१५. ३ ते ४ स्क्युअर्स

कृती :-
कांदा, सिमला मिरची, टोमॅटो या सर्वांचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मशरूम जर अख्खा वापरायचा असेल तर त्याचा केवळ देठ काढून टाकावा. नाहीतर त्याचेही चौकोनी तुकडे करावेत. आलं लसूण आणि मिरची वाटून त्याची पेस्ट बनवावी. त्यामध्ये जीरं पूड, गरम मसाला, चाट मसाला, मध, लिंबू रस, व मीठ घालून चिरलेल्या सर्व भाज्या त्यात घालाव्यात. छान मिक्स करून ३० मिनिटे ठेवावे. लाकडाचे स्क्युअर्स १५ मिनिटे पाण्यात भिजवावेत. म्हणजे तव्यावर वा ओवन मध्ये ते जळणार नाहीत. या स्क्युअर्सना एकामागे एक भाज्या लावून तव्यावर वा कोळशाच्या आचेवर खरपूस भाजाव्यात. छान चटपटीत कबाब तयार.


वाढणी :- २ ते ३ माणसे.