पनीर व पनीरचे पदार्थ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पनीर व पनीरचे पदार्थ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६ मे, २०१५

ब्रेड पनीर रोल्स

साहित्य :-
१. व्हीट ब्रेडचे ७ - ८ स्लाईस 
२. १ कप किसलेलं पनीर 
३. चमचाभर लिंबू रस 
४. चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची 
५. पेरभर किसलेलं आलं 
६. चवीनुसार मीठ 
७. परतण्यासाठी बटर 
८. २ ते ३ चमचे दूध 
९. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर 

कृती:-
प्रथम पनीर कुस्करून घ्यावे. त्यात किसलेलं आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर. लिंबू रस, दूध व चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित कालवून घ्यावे. ब्रेडच्या कडा काढाव्यात. मग तो ब्रेड लाटणं फिरवून पातळ करावा. त्यात पनीरचा मसाला भरून त्याचा रोल करावा. ब्रेडच्या कडांना पाणी लावावे म्हणजे ब्रेडचे रोल्स नीट बंद करता येतील. मग त्या रोल्सना बटर लावून तव्यावर परतून घ्यावे आणि केचअप अथवा चटणीसोबत गरम गरम serve करावे. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

सिमला मिरची - पनीर भुर्जी


साहित्य :-
१. बारीक चिरलेला कांदा १ कप 
२. बारीक चिरलेला  टोमॅटो अर्धा कप 
३. चौकोनी चिरलेली सिमला मिरची अर्धा कप 
४. कुस्करलेलं पनीर ३ कप 
५. १ चमचा देघी मिरची पावडर 
६. पाऊण चमचा गरम मसाला 
७. चवीनुसार मीठ
८.  अर्धा चमचा जीरं 
९. सजावटीसाठी कोथिंबीर 
१०. फोडणीसाठी तेल 

कृती :-
प्रथम पनीर कुक्सरून घ्यावे. कांदा बारीक चिरावा. तेलावर कांदा परतून घ्यावा. कांदा छान मौसार झाला कि मग त्यात टोमॅटो घालून ते मऊ शिजेपर्यंत परतावेत. त्यात सिमला मिरची घालावी. सिमला मिरची अर्धी कच्ची असताना त्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे. मसाले शिजले की त्यात कुस्करलेलं पनीर घालावं. पनीर घालून भाजी छान एकत्र करून घ्यावी. पनीर जास्त शिजवू नये नाहीतर ते कडक व्हायला लागतं. वरून कोथिंबीर व गरज असल्यास मीठ घालून भाजी पुन्हा परतून घ्यावी आणि पोळी अथवा पराठ्यासोबत गरम गरम serve करावी. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

३ एप्रिल, २०१२

पनीर झाल्फ्रेझी


साहित्य :-
१. उभी चिरलेली हिरवी सिमला मिरची १ कप
२. उभी चिरलेली लाल, पिवळी सिमला मिरची प्रत्येकी अर्धा कप
३. उभं चिरलेलं पनीर ३/४ कप
४. २ ते ३ हिरव्या मिरच्या
५. १ चमचा किसलेलं आलं
६. जीरं १ चमचा
७. हळद पाव चमचा
८. गरम मसाला १ चमचा
९. उभं चिरलेला कांदा १ कप
१०. उभा चिरलेला टोमॅटो
११. सजावटीसाठी बारीक कोथिंबीर चिरलेली व आलं उभं चिरलेलं
१२. मीठ चवीनुसार

कृती :-
प्रथम सर्व भाज्या, पनीर, कांदा, टोमॅटो व हिरव्या मिरच्या हे सर्व चिरून घ्यावं. टोमॅटो चिरताना त्यातल्या बिया पूर्णपणे काढून घ्याव्यात. सर्व तयारी झाली की एका कढईमध्ये तेल तापवावं. त्यात जीरं घालावं व ते थोडं परतलं की मग कांदा घालावा. कांदा मऊसर होयीपर्यंत परतावा. मग त्यात आलं व हिरवी मिरची घालावी व १ मिनिटभर परतावं. आता त्यात सर्व प्रकारच्या सिमला मिरची घालाव्यात. एक ५ मिनिट झाकण न लावता शिजवाव्यात. मध्ये मध्ये भाजी परतावी. मग त्यात हळद व गरम मसाला घालावा. थोडं अजून तिखट हवं असेल तर लाल तिखट घालावं. भाजी पुन्हा थोडावेळ परतावी. मग त्यात पनीर घालावं. पनीर घातल्यावर भाजी अतिशय हलक्या हाताने परतावी. मग त्यात टोमॅटो व मीठ घालून भाजी पुन्हा ५ मिनिटं शिजू द्यावी. कोथिंबीर व आलं पेरून भाजी गरम गरम serve करावी. ही भाजी गरम गरम फुलाक्यांसोबत फारच छान लागते. शिवाय रंगीत सिमला मिरची नसेल तर साधी नेहेमीची हिरवी सिमला मिरची वापरली तरी चालेल.

वाढणी :- २ ते ३ माणसे

२६ ऑगस्ट, २०११

मलई बर्फी



साहित्य :-
१. ४ कप दूध
२.  पाव  कप साखर
३. अर्धा चमचा वेलची पूड
४. पिस्ते व बदाम सजावटीसाठी
कृती:-
२ कप दुधाचे प्रथम पनीर बनवून घ्यावे.(पनीरची कृती blog वर नक्की पहावी.) मलई बर्फी साठीचं पनीर ताजंच बनवावं. पनीर कापडामध्ये गाळल्यावर फ्रीजमध्ये ठेवू नये. उरलेलं २ कप दूध आटवत ठेवावं. साधारण २ कप दुधाचं १ कप दूध होईपर्यंत आटवावं. दूध आटलं की त्यात हे ताजं पनीर घालावं. सतत ढवळावं. दूध आटून छान मिळून येईपर्यंत शिजवावं. त्याचा छान गोळा तयार होतो .गोळा बनत आला की त्यात साखर घालावी. साखर घातल्यावर मिळून आलेला गोळा थोडा परत पातळ होतो. त्यात वेलची पूड घालावी व आवडत असेल तर केशरही घालावे. केशर घातल्यावर बर्फीचा रंग अगदी पांढरा राहणार नाही. त्यानंतर २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावं व तो गोळा एका तूप लावलेल्या ताटलीवर थोडा जाडसर पसरावा. त्यावर चांदीचा वर्ख लावून पिस्ते व बदामाचे कप लावून सजवावे व तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात. मलई बर्फी तयार.
वाढणी:- या साहित्याच्या साधारण १० ते १२ बर्फी बनतील.

२५ ऑगस्ट, २०११

पनीर


साहित्य :-
१. ४ कप दूध
२. १/४ कप लिंबाचा रस
३. अर्धा कप पाणी

कृती :-
जाड बुडाच्या पातेल्यामध्ये दूध उकळत ठेवावे. दूध पातेल्याला खाली चिकटणार नाही याची सतत काळजी घ्यावी. आच मध्यम असू द्यावी. दुधाला उकळी आली की आच मंद करावी. लिंबू रस पाण्यामध्ये एकत्रित करून हळूहळू उकळी आलेल्या दूधात घालावे. दूध सतत ढवळावे. थोडेसे ढवळल्यावर पनीर व पाणी वेगवेगळे होताना दिसू लागेल. आच बंद करावी. थोडासा वेळ दूध ढवळावे. एका चाळणीत एक पातळ कापड घालून हे पनीर गाळून घ्यावे. (गाळून शिल्लक राहिलेले पाणी पोळीची कणिक मळायला वापरले जाऊ शकते.) या गाळलेल्या पनीर वर गार पाणी सोडावे. गार पाणी सोडल्याने पनीर घट्ट होत नाही. कापदातले पनीर घट्ट पिळून घ्यावे. कापडासकट एका परातीत ठेवून त्यावर वजनदार असे काहीही ठेवावे. म्हणजे पनीर मधील उरले सुरले पाणी देखील निघून जाईल. ५ ते १० मिनिटांनी या पनीरचे तुम्हाला हवे तसे तुकडे करावेत.