वैविध्यपूर्ण भाज्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैविध्यपूर्ण भाज्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

६ जून, २०१२

मटकी- श्रावण घेवडा भाजी


साहित्य :-
१. मोड आलेली मटकी अर्धा कप
२. बारीक चिरलेला घेवडा दीड कप
३. चिमूटभर हळद
४. अर्धा चमचा तिखट
५. प्रत्येकी अर्धा चमचा धना जीरा पूड
६. गोडा मसाला १ चमचा
७. चवीनुसार मीठ
८. फोडणीसाठी तेल,मोहरी व हिंग 
९. कढीपत्त्याची पानं ५ ते ६ 
१०. बारीक चिरलेली कोथिंबीर व खोबरं सजावटीसाठी

कृती:-
प्रथम श्रावण घेवडा व मोड आलेली मटकी एकत्र करून कुकरला २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. एका कढईमध्ये तेल तापवावे व त्यात मोहरी, कढीपत्ता व हिंग घालावे. लगेचच सगळे मसाले घालावेत व आच कमी करावी. मसाले तेलात परतले की लगेच त्यात शिजवलेली मटकी व घेवडा घालावा. आवश्यक तेवढे पाणी व चवीनुसार मीठ घालून भाजीला छान उकळी येऊ द्यावी. ही भाजी खोबरं व कोथिंबीर घालून गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

३ एप्रिल, २०१२

पनीर झाल्फ्रेझी


साहित्य :-
१. उभी चिरलेली हिरवी सिमला मिरची १ कप
२. उभी चिरलेली लाल, पिवळी सिमला मिरची प्रत्येकी अर्धा कप
३. उभं चिरलेलं पनीर ३/४ कप
४. २ ते ३ हिरव्या मिरच्या
५. १ चमचा किसलेलं आलं
६. जीरं १ चमचा
७. हळद पाव चमचा
८. गरम मसाला १ चमचा
९. उभं चिरलेला कांदा १ कप
१०. उभा चिरलेला टोमॅटो
११. सजावटीसाठी बारीक कोथिंबीर चिरलेली व आलं उभं चिरलेलं
१२. मीठ चवीनुसार

कृती :-
प्रथम सर्व भाज्या, पनीर, कांदा, टोमॅटो व हिरव्या मिरच्या हे सर्व चिरून घ्यावं. टोमॅटो चिरताना त्यातल्या बिया पूर्णपणे काढून घ्याव्यात. सर्व तयारी झाली की एका कढईमध्ये तेल तापवावं. त्यात जीरं घालावं व ते थोडं परतलं की मग कांदा घालावा. कांदा मऊसर होयीपर्यंत परतावा. मग त्यात आलं व हिरवी मिरची घालावी व १ मिनिटभर परतावं. आता त्यात सर्व प्रकारच्या सिमला मिरची घालाव्यात. एक ५ मिनिट झाकण न लावता शिजवाव्यात. मध्ये मध्ये भाजी परतावी. मग त्यात हळद व गरम मसाला घालावा. थोडं अजून तिखट हवं असेल तर लाल तिखट घालावं. भाजी पुन्हा थोडावेळ परतावी. मग त्यात पनीर घालावं. पनीर घातल्यावर भाजी अतिशय हलक्या हाताने परतावी. मग त्यात टोमॅटो व मीठ घालून भाजी पुन्हा ५ मिनिटं शिजू द्यावी. कोथिंबीर व आलं पेरून भाजी गरम गरम serve करावी. ही भाजी गरम गरम फुलाक्यांसोबत फारच छान लागते. शिवाय रंगीत सिमला मिरची नसेल तर साधी नेहेमीची हिरवी सिमला मिरची वापरली तरी चालेल.

वाढणी :- २ ते ३ माणसे

३१ ऑक्टोबर, २०११

फ्लॉवर मंचुरियन


साहित्य :-
१. फ्लॉवरची फुलं २ कप
२. बारीक चिरलेला कांदा
३. टोमॅटो केचअप ४ चमचे
४. चिली सॉस अर्धा चमचा
५. सोय सॉस २ ते ३ चमचे
६. मैदा पाव कप
७. काळी मिरी पावडर १ चमचा
८. कांद्याची पात अर्धा कप
९. तळणीसाठी तेल
१०. चवीनुसार मीठ
११. २ चमचे लसूण पाकळ्या चिरलेल्या
१२. कॉर्नफ्लॉवर १ चमचा

कृती :-
प्रथम एका पातेल्यामध्ये मैदा घेऊन त्यात मिरी पावडर, चवीनुसार मीठ व पाणी घालावे. गुठळ्या होणार नाहीत अशी काळजी घेऊन भज्याच्या पीठाइतपत पातळ पीठ भिजवावे. फ्लॉवरची फुलं या पिठामध्ये घोळवून तेलात गोल्डन होईपर्यंत तळून घ्यावे. ही फुलं बाजूला पेपर टॉवेलवर काढावीत. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात लसूण घालावं. मिनिटभर परतावे. त्यात कांदा घालून तो मऊ झाला की मग टोमॅटो केचअप, चिली सॉस व सोय सॉस घालावं. थोडसं परतावं. कॉर्नफ्लॉवर पाण्यात घोळवून या सॉसमध्ये घालावे. फावा असल्यास थोडं पाणी घालावं. फ्लॉवरची तळलेली फुलं घालावीत.छान मिक्स करावे. जर जास्त तिखट हवं असेल तर कांदा घातला की हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. कांद्याची पात घालून भाजी serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे

१४ ऑक्टोबर, २०११

व्हेज कोल्हापुरी


साहित्य :-
१. सुकं खोबरं ६ मोठे चमचे
२. पांढरे तीळ ३ चमचे
३. ४ ते ५ लवंगा
४. ४ ते ५ मिरी
५. छोटा दालचिनीचा तुकडा
६. ७ ते ८ काजू
७. १/२ कप बारीक चिरलेला कांदा
८. १/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
९. १ कप चिरलेला बटाटा
१०. १/२ कप चिरलेलं गाजर
११. १/२ कप चिरलेलं फ्लॉवर
१२. पाव कप बारीक चिरलेली सिमला मिरची
१३. १/२ कप चिरलेला पनीर
१४. १/२ कप मटार
१५. १ चमचा तिखट
१६. धणे जिरे पूड प्रत्येकी १ चमचा
१७. १ चमचा गरम मसाला
१८. फोडणीसाठी तेल व जीरं
१९. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी १ चमचा
२०. चवीनुसार मीठ
२१. ३ चमचे बटर.

कृती :-
प्रथम एका पॅन मध्ये सुकं खोबरं, तीळ, लवंगा, मिरी व दालचिनी हा मसाला कोरडाच brown होईपर्यंत भाजून घ्यावा. हा मसाला गार झाला की काजू घालून मिक्सरमधून वाटून घ्यावा. वाटताना थोडं पाणी घालत घालत छान मऊ पेस्ट करून घ्यावी. सगळ्या भाज्या व पनीर चौकोनी चिरून घ्यावे. एका कढईमध्ये तेल गरम करावं व त्यात जीरं घालावं. जीरं तडतडल की त्यात कांदा घालावं. कांदा छान brown करून घ्यावा. मग त्यात आलं लसूण पेस्ट घालून मिनिटभर परतावं. आलं लसणाचा कच्चा वास गेला की त्यात टोमॅटो घालवा. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतावं. मग त्यात धणे जिरे पूड घालावी. थोडावेळ परतून मग त्यात वरील मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट घालावी. तिखट घालावं. रंगासाठी पॅप्रिका घालावं. अगदी तेल सुटेपर्यंत छान परतावं. आता हळू हळू एक एक भाज्या घालाव्यात. प्रथम बटाटा घालवा व थोडं पाणी घालून झाकण लावून बटाटा ५ मिनिटं शिजवावा. मग गाजर, फ्लॉवर, सिमला मिरची व मटार घालून परत थोडं पाणी घालावं. चवीनुसार मीठ व गरम मसाला घालून झाकण लावून भाजी शिजू द्यावी. १० मिनिटांनी झाकण काढून भाजी छान ढवळावी व त्यात पनीर घालावे. छान मिक्स करावी. ग्रेव्ही जशी हवी असेल त्यानुसार भाजीमध्ये पाणी घालावे. सर्व भाज्या छान मऊ शिजल्या की थोडे बटर घालावे. ते विरघळल्यावर छान कोथिंबीर घालून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- ३ ते ४ माणसे.

१९ ऑगस्ट, २०११

फ्लॉवर बटाटा रस्सा



साहित्य :-
१. मध्यम आकाराचे २ बटाटे
२. फ्लॉवरची मध्यम आकाराची ८ ते १० फुले
३. अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला
४. छोटा टोमॅटो बारीक चिरलेला
५. पाव चमचा हळद
६. १ चमचा तिखट
७. १ चमचा प्रत्येकी धना जीरं पूड
८. १ चमचा गोडा मसाला
९. ५ ते ६ कढीपत्ते
१०. चवीपुरते मीठ

कृती:-
प्रथम एका कढईमध्ये तेल तापवावे व त्यात मोहरी व जीरं घालून फोडणी करावी. जीरं मोहरी तडतडले की त्यात कढीपत्ते घालावेत. हळद घालून थोडंसं परतावं व बारीक चिरलेला कांदा घालावं. कांदा मऊ होईपर्यंत परतावा व त्यात बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घालाव्यात. बटाटा तेलावरच थोडासा शिजवावा. मग अर्ध्या शिजलेल्या बटाट्यामध्ये तिखट, धणे जीरं पूड, मसाला घालावा. फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे घालावेत व अगदी कमी पाणी घालून रस्सा शिजवत ठेवावा. रस्सा पूर्ण शिजवून मग त्यात जितकं हवं आहे तितकं पाणी व चवीपुरतं मीठ घालून रस्सा २ ते ३ मिनिटे शिजू द्यावा. कोथिंबीर पेरून हा रस्सा पोळी किंवा भातासोबत serve करावा.

वाढणी :- २ ते ३ माणसे

२८ जून, २०११

दुधी मुग डाळ




साहित्य :-
१. छोटा दुधी भोपळा
२. १ वाटी मुग डाळ
३. २ लाल मिरच्या
४. अर्धा चमचा आलं
५. अर्धा चमचा लसूण
६. ४ ते ५ कढीपत्ते
७. अर्धा चमचा हळद
८. चवीपुरता मीठ
९. कोथिंबीर

कृती:-
दुधी भोपळ्याची सालं व मधल्या बिया काढून थोडेसे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. कुकरमध्ये तेलाची फोडणी करावी. त्यात मोहरी व जीरं घालावं. ते तडतडले की त्यात कढीपत्ते व लाल मिरच्या घालाव्यात. हळद घालावी. आलं लसूण घालून मिनिटभर परतावे. दुधीच्या फोडी घालाव्यात व मुगाची डाळ घालावी. २ ते ३ मिनिटं मध्यम आचेवर छान परतून घ्यावे. मग त्यात १ ते १ १/२ वाटी पाणी घालावे. चवीपुरते मीठ घालावे. व कुकरचे झाकण लावून भाजी १ ते २ शिट्ट्या होईपर्यंत परतावी. कुकरचे झाकण पडले की भाजी bowl मध्ये काढून वरून कोथिंबीर पसरून गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

६ एप्रिल, २०११

श्रावण घेवडा- बटाटा-टोमॅटो




साहित्य :-
१. श्रावण घेवडा चिरून साधारण ३ वाट्या
२. १ मध्यम आकाराचा बटाटा
३. एक टोमॅटो
४. अर्धा चमचा हळद
५. २ चमचे गोड मसाला
६. धणे जीरं पावडर प्रत्येकी १ चमचा
७. ७ ते ८ कढीपत्ते
८. १/४ वाटी खोबरं
९. ४ चमचे दाण्याचे कूट
१०. गूळ अर्धा चमचा
११. फोडणीसाठी तेल
१२. हिंग
१३.मोहरी व जीरं

कृती :-
ही भाजी आपण थेट कुकर मधेच करणार आहोत. त्यासाठी कुकर मध्यम आचेवर गरम करून घ्यावा. त्यात फोडणीसाठी २ चमचे तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी व जीरं घालावा. दोन्ही तडतडले की मग त्यात चिमूटभर हिंग घालावे. कढीपत्ता घालावा. त्यानंतर सर्व मसाले घालून मिनिटभर परतावे. लगेचच चिरलेला घेवडा, चिरलेला बटाटा व टोमॅटो घालावा. थोडावेळ परतावे. अर्धी ते पाउण वाटी पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळावी व कुकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या करून घ्याव्यात. {आपल्या कुकर नुसार शिट्ट्यांचा अंदाज घ्यावा.} कुकरचे झाकण पडले की भाजी छान ढवळून serving bowl मध्ये काढावी व कोथिंबीर पसरून गरम गरम वाढावी. ही भाजी पोळी व भातासोबातही छान लागते.

वाढणी :- २ ते ३ माणसे.
ही भाजी मी सौ. रोहिणी गोरे यांच्या "उदर भरण नोहे " या blog वर बघून शिकले. रोहिणी ताई आभार!

७ मे, २०१०

भेंडी फ़्राय





साहित्य :-
१. भेंडी अर्धा किलो
२. कांदा अर्धा
३. दाण्याचे कूट ४ चमचे
४. आमचूर पावडर १ चमचा
५. धना जीरा पूड प्रत्येकी १ चमचा
६. तिखट अर्धा चमचा
७. हळद
८. मीठ
९. ओलं खोबरं पाव वाटी

कृती :-
भेंडी चिरून अगदी कमी तेलामध्ये तळून घ्यावी. फार कुरकुरीत करू नये. कांदा बारीक चिरून फोडणीत घालावा. मऊसर झाला की त्यात हळद, तिखट, धना जीरा पूड, आमचूर पावडर असा सर्व मसाला घालावा. तळलेली भेंडी घालून भाजी एकजीव करून घ्यावी. त्यात मीठ घालावे व दाण्याचे कूट घालून भाजी सारखी करून घ्यावी. खोबरं घालून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- हि भाजी २ ते ३ लोकांना पुरेशी होईल.