चायनीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चायनीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३१ ऑक्टोबर, २०११

फ्लॉवर मंचुरियन


साहित्य :-
१. फ्लॉवरची फुलं २ कप
२. बारीक चिरलेला कांदा
३. टोमॅटो केचअप ४ चमचे
४. चिली सॉस अर्धा चमचा
५. सोय सॉस २ ते ३ चमचे
६. मैदा पाव कप
७. काळी मिरी पावडर १ चमचा
८. कांद्याची पात अर्धा कप
९. तळणीसाठी तेल
१०. चवीनुसार मीठ
११. २ चमचे लसूण पाकळ्या चिरलेल्या
१२. कॉर्नफ्लॉवर १ चमचा

कृती :-
प्रथम एका पातेल्यामध्ये मैदा घेऊन त्यात मिरी पावडर, चवीनुसार मीठ व पाणी घालावे. गुठळ्या होणार नाहीत अशी काळजी घेऊन भज्याच्या पीठाइतपत पातळ पीठ भिजवावे. फ्लॉवरची फुलं या पिठामध्ये घोळवून तेलात गोल्डन होईपर्यंत तळून घ्यावे. ही फुलं बाजूला पेपर टॉवेलवर काढावीत. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात लसूण घालावं. मिनिटभर परतावे. त्यात कांदा घालून तो मऊ झाला की मग टोमॅटो केचअप, चिली सॉस व सोय सॉस घालावं. थोडसं परतावं. कॉर्नफ्लॉवर पाण्यात घोळवून या सॉसमध्ये घालावे. फावा असल्यास थोडं पाणी घालावं. फ्लॉवरची तळलेली फुलं घालावीत.छान मिक्स करावे. जर जास्त तिखट हवं असेल तर कांदा घातला की हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. कांद्याची पात घालून भाजी serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे

३ ऑगस्ट, २०११

बीट रूट मंचुरियन


साहित्य :-
१. १ बीट किसून
२. १ गाजर किसून
३. अर्धी वाटी फ्लॉवर बारीक चिरलेला
४. अर्धी वाटी श्रावण घेवडा बारीक चिरलेला
५. २ वाट्या उभा चिरलेला कोबी
६. पाव वाटी उभी चिरलेली सिमला मिरची
७. अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा
८. २ ते ३ चमचे मैदा
९. ४ चमचे कोर्नफ्लोवर किंवा तांदुळाची पिठी
१०. ४ ते ५ चमचे सोय सॉस
११. ३ ते ४ चमचे टोमॅटो केचप
१२. अर्धा चमचा चिली सॉस
१३. तळणीसाठी तेल


कृती :-
प्रथम किसलेले गाजर, बीट,बारीक चिरलेला श्रावण घेवडा, फ्लॉवर, मैदा व तांदुळाची पिठी सर्व गोष्टी एकत्र कराव्यात. एका कढईमध्ये तेल तापवावे व या मिश्रणाचे गोळे करून ते तेलावर छान तळून घ्यावेत. प्रथम एक गोळा करून तळून बघावा. तो जर तेलात फुटला नाही तर इतर गोळे करून घ्यावेत. जर तो तेलात फुटला तर थोडी तांदुळाची पिठी वाढवावी. हे गोळे तयार झाले की ते एका kitchen towel वर काढून घ्यावेत. म्हणजे त्यातल जास्तीच तेल निघून जाईल. कढईमध्ये अगदी कमी तेल घेऊन ते गरम झाले की पहिले कांदा घालावा. मग कोबी, सिमला मिरची व कांद्याची पात घालावी. ह्या भाज्या थोड्या मऊ झाल्या की त्यात बीटाचे गोळे अर्थात मंचुरियन घालावेत. अगदी अलगत ते सर्व एकत्र करावं. त्यात सोय सॉस, केचअप व चिली सॉस घालून छान एकत्र करावं. पुन्हा १ चमचा कोर्नफ्लोवर घेऊन ते पाण्यात विरघळवून घ्यावा व भाजीमध्ये घालाव त्याने ही भाजी छान मिळून येईल. एक २ मिनिटे ही भाजी परतून मग एका bowl मध्ये काढावी व कांद्याची पात भुरभुरून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- ३ ते ४ माणसे

८ एप्रिल, २०११

शेजवान सॉस


साहित्य :-
१. छोटा अर्धा कांदा
२. छोटा टोमॅटो
३. ४ ते ५ कसून पाकळ्या
४. आलं २ चमचे
५. ७ ते ८ ओल्या लाल मिरच्या

कृती :-
कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, लाल मिरच्या या सर्व गोष्टी बारीक चिरून घ्याव्यात. प्रथम तेलावर कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यात आलं लसूण घालून परतावे. आलं व लसणाचा वास यायला लागल्यावर त्यात टोमॅटो घालावा. सर्वात शेवटी मिरच्या घालाव्यात व अगदी मंद आचेवर हा सॉस घट्ट होईपर्यंत शिजवावा. थोडेसे मीठ घालावे. म्हणजे शेजवान सॉस तयार होईल.

हा सॉस चायनीज हक्का नुडल्स तसेच फ्राईड राइसमध्ये खूप छान लागतो. या सॉस ने चायनीज पदार्थाला वेगळीच चव येते.

चायनीज फ्राईड राइस



साहित्य :-
१. उभा चिरलेला कोबी अर्धी वाटी
२. उभा चिरलेला श्रावण घेवडा पाव वाटी
३. उभं चिरलेलं गाजर पाव वाटी
४. उभी चिरलेली सिमला मिरची पाव वाटी
५. वाट्या शिजलेला बासमती तांदूळ (तांदूळ कुठलाही वापरला तरी चालेल पण बासमती तांदुळाचा भात मोकळा होतो.)
६. ४ चमचे सोय सॉस
७. २ चमचे टोमॅटो केचअप
८. पाव चमचा चिली सॉस
९.पाव वाटी कांद्याची पात

कृती :-
बासमती तांदूळ प्रथम भिजवून ठेवावा. ४ पट पाणी एका पातेल्यात घ्यावे व त्याला उकळी आणावी. या पाण्यात थोडेसे मीठ घालावे. भिजवलेला तांदूळ घालून भात मोकळा शिजवावा. भात शिजला की जास्तीचे पाणी गाळून घ्यावे. सर्व भाज्या उभ्या चिराव्यात. एका पसरट कढईमध्ये थोडेसे तेल घ्यावे. तेल तापले की त्यात कोबी, गाजर, सिमला मिरची, श्रावण घेवडा या सर्व भाज्या घालाव्यात. भाज्या मऊ होईपर्यंत परतावे. मग त्यात सोय सॉस, टोमॅटो केचअप व चिली सॉस घालावा. सर्व भाज्यांना सॉस एकसारखा लागला की भाज्या एका बाजूला घेऊन एक अंड त्या कढईतच फोडून घालावं व छान परतून घ्यावं. सर्व भाज्या त्या अंड्यासोबत एकत्र कराव्यात व त्यात शिजलेला भात घालून नीट एकजीव करून घ्यावा. अंड आवडत नसल्यास नाही घातलं तरी चालेल. कांद्याची पात पेरून हा भात गरम गरम serve करावा.

जर थोडा चटपटीत भात आवडत असेल तर शेजवान सॉस घालावं. शेजवान सॉस कसा बनवावा ते चायनीज च्या thread वर बघावे.

वाढणी :- २ ते ३ माणसे


१७ मार्च, २०१०

हक्का नुडल्स


साहित्य :-
१. maggie noodles १ छोटा पाकीट
२. पाव वाटी उभा चिरलेला कांदा
३. पाव वाटी उभी चिरलेली सिमला मिरची
४. पाव वाटी उभं चिरलेला गाजर
५. पाव वाटी कांद्याची पात
६. अर्धी वाटी उभा चिरलेला कोबी
७. अर्धा चमचा चिली सॉस
८. ३ चमचे सोय सॉस
९. २ चमचे टोमॅटो सॉस
१०. १ चमचा शेजवान सॉस

शेजवान सॉस बनवण्याची कृती :-
छोटा अर्धा कांदा, १ छोटा टोमॅटो, ४ ते ५ पाकळ्या लसूण, आलं १ पेर ७ ते ८ लाल मिरच्या या सर्व गोष्टी बारीक चिरून घ्याव्यात. प्रथम तेलावर कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यात आलं लसूण घालून परतावे. आलं व लसणाचा वास यायला लागल्यावर त्यात टोमॅटो घालावा. सर्वात शेवटी मिरच्या घालाव्यात व अगदी मंद आचेवर हा सॉस घट्ट होईपर्यंत शिजवावा. थोडेसे मीठ घालावे. म्हणजे शेजवान सॉस तयार होईल. सॉस तयार होईल.

हक्का नुडल्स बनवण्याची कृती :-
प्रथम उकळत्या पाण्यात नुडल्स ४ त४ ५ मिनिटे शिजवाव्यात. शिजलेल्या नुडल्सवर गार पाणी घालून नुडल्स गळून घ्याव्यात व त्या नुडल्सवर चमचाभर तेल घालावे. तेल घालण्याने नुडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. एका कढईत तेल घालून त्यात कांदा परतावा. कोबी, गाजर, सिमला मिरची या भाज्या घालून त्या मऊ होईपर्यंत परताव्यात. मग त्यात चिली सॉस, सोय सॉस, व टोमॅटो सॉस घालावा. लगेचच नुडल्स घालून ४ ते ५ मिनिटे परतून serving dish घालाव्या. त्यावर कांद्याची पात घालून गरम गरम serve करावे.

वाढणी :- १ ते २ माणसे