चटणी / तोंडीलावणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चटणी / तोंडीलावणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६ एप्रिल, २०१३

छोले राजमा सलाड


साहित्य :-
१. लाल सिमला मिरची 
२. भिजवून शिजवलेला राजमा 
३. भिजवून शिजवलेले छोले 
४. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा 
५. १ चमचा लिंबाचा रस 
६. अर्धा चमचा लाल तिखट किंवा १ बारीक चिरलेली हिरवी मिरची 
७. चवीनुसार मीठ 
८. अर्धा चमचा तेल 

कृती :-
राजमा व छोले वेगवगळे भिजववेत. ७ ते ८ तास भिजले की वेगवेगळे शिजवून घ्यावेत. शिजल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे. लाल सिमला मिरचीला हाताने थोडे तेल लावून घ्यावे. सिमला मिरची काट्याचमच्यामध्ये खोचावी व थेट आचेवर धरावी. मिरची सगळीकडून काळे डाग पडून भाजली गेली पाहिजे. असं झाल्यावर ती मिरची पाण्यात घालावी व जळालेला पापुद्रा काढून घ्यावा. सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर एका बाऊलमध्ये छोले, राजमा, कांदा, सिमला मिरची, तिखट किंवा हिरवी मिरची, लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावेत. हे सलाड खास वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी तर फारच उपयोगाचे आहे. 

वाढणी:- २ ते ३ माणसे 

४ सप्टेंबर, २०१२

लसूण चटणी


साहित्य :-
१. ५ ते ६ लसणाच्या मोठ्या पाकळ्या 
२. ४ ते ५ चमचे किसलेला सुकं खोबरं 
३. २ ते ३ चमचे पांढरे तीळ
४. १ चमचा देघी मिरची पावडर
५. चवीनुसार मीठ
६. १ चमचा तेल

कृती :-
एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यात सुकं खोबरं, तीळ व लसूण भाजून घ्यावा. भाजलेल्या गोष्टी गार झाल्या की मिक्सरमध्ये मीठ व तिखट घालून बारीक करून घ्याव्यात. ही लसूण चटणी ७ ते ८ दिवस छान राहते. 


१३ मार्च, २०१२

कोथिंबीर वडी


साहित्य :-
१. बारीक चिरलेली कोथिंबीर २ वाट्या
२. २ चमचे डाळीचं पीठ
३. २ चमचे तांदुळाच पीठ
४. ४ ते ५ चमचे थालीपीठाची भाजाणी
५. अर्धा चमचा तिखट
६. धणे जिरे पूड प्रत्येकी अर्धा चमचा
७. चवीनुसार मीठ

कृती :-
प्रथम कोथिंबीर धुवून चिरून घ्यावी. त्यात डाळीचं पीठ, तांदुळाच पीठ, तिखट, भाजाणी, धणे जिरे पूड व चवीनुसार मीठ घालावे. पाणी न घालता या मिश्रणाचा गोळा होतोय का ते पहावं. गरज पडल्यास १ - १ चमचा पाणी घालत जावं. छान गोळा तयार झाला की कुकरमध्ये २ शिट्ट्या काढून उकडून घ्यावा. गोळा थोडासा गार झाला की त्याचे तुकडे करून थोड्या तेलामध्ये तळून घ्यावेत. कुरकुरीत गरम गरम कोथिंबीर वडी जेवताना तोंडीलावणं म्हणून किंवा चहाबरोबर serve कराव्यात.

वाढणी :- २ ते ३ माणसे

९ मार्च, २०१२

वॉर्म सलाड


साहित्य :-
१. उभा चिरलेला कोबी २ वाट्या
२. उभं चिरलेला गाजर अर्धी वाटी
३. उभी चिरलेली सिमला मिरची अर्धी वाटी
४. उभा चिरलेला कांदा अर्धी वाटी
५. स्वीट कॉर्नचे दाणे पाव वाटी
६. तिरका चिरलेला श्रावण घेवडा अर्धी वाटी
७. २ ते ३ चमचे ऑलिव ऑइल
८. काळी मिरी पावडर
९. चवीनुसार मीठ
१०. इटालियन सिझानिंग अर्धा चमचा
११. रेड चिली फ्लेक्स चवीनुसार
१२. १ चमचा लिंबाचा रस

कृती :-
एका पॅनमध्ये ऑलिव ऑइल गरम करून घ्यावे. त्यात प्रथम कांदा थोडासा परतावा. मग त्यात काळ्या मिरीची पावडर व रेड चिली फ्लेक्स घालावेत. सर्व भाज्या घाल्याव्यात व छान परताव्यात. या भाज्या थोड्या मऊ झाल्या की त्यात इटालियन सिझानिंग व मीठ घालावे. पुन्हा थोडावेळ परतावे. या भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाहीयेत. भाज्या अर्ध्या कच्च्या असतानाच लिंबू पिळावे व हे सलाड एका बाउल मध्ये घेऊन छान गरम गरम serve करावे.
या सलाड मध्ये तुम्ही बेबी कॉर्न, वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरचीही वापरू शकता. हे सलाड थंडीच्या दिवसात गरम गरम खायला अतिशय छान वाटते.

वाढणी :- ३ ते ४ माणसे

३१ जानेवारी, २०१२

मसाला पापड


साहित्य :-
१. बारीक चिरलेला कांदा १ वाटी
२. बारीक चिरलेला टोमॅटो १ वाटी
३. चिरलेली कोथिंबीर
४. चाट मसाला १ छोटा चमचा
५. जिरे पूड अर्धा चमचा
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा चमचा तिखट
८. तुमच्या आवडीचे ४ ते ५ पापड

कृती :-
प्रथम प्रत्येक पापडाला दोन्ही बाजूनी थोडसं तेल लावून घ्यावं. हे तेल लावलेले पापड मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्यावेत. एका बाउल मध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व बाकी सर्व जिन्नस घालून पापडावर घालायचा मसाला तयार करावा. मसाला तयार झालं की प्रत्येक पापडावर घालून चहासोबत किंवा जेवणाच्या आधी एखाद्या सूपसोबत serve करावेत.

वाढणी :- १ ते २ माणसे

२६ जुलै, २०११

मशरूम पनीर कबाब


साहित्य :-
१. १० ते १२ मशरूम
२. १० ते १२ पनीरचे चौकोनी तुकडे
३. १ सिमला मिरची
४. १ टोमॅटो
५. १ कांदा
६. १ चमचा आलं
७. ४ ते ५ लसूण पाकळ्या
८. ३ ते ४ मिरच्या
९. १ चमचा जीरं पूड
१०. १ चमचा गरम मसाला
११. १ चमचा चाट मसाला
१२. १ चमचा मध
१३. १ चमचा लिंबू रस
१४. चवीनुसार मीठ
१५. ३ ते ४ स्क्युअर्स

कृती :-
कांदा, सिमला मिरची, टोमॅटो या सर्वांचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मशरूम जर अख्खा वापरायचा असेल तर त्याचा केवळ देठ काढून टाकावा. नाहीतर त्याचेही चौकोनी तुकडे करावेत. आलं लसूण आणि मिरची वाटून त्याची पेस्ट बनवावी. त्यामध्ये जीरं पूड, गरम मसाला, चाट मसाला, मध, लिंबू रस, व मीठ घालून चिरलेल्या सर्व भाज्या त्यात घालाव्यात. छान मिक्स करून ३० मिनिटे ठेवावे. लाकडाचे स्क्युअर्स १५ मिनिटे पाण्यात भिजवावेत. म्हणजे तव्यावर वा ओवन मध्ये ते जळणार नाहीत. या स्क्युअर्सना एकामागे एक भाज्या लावून तव्यावर वा कोळशाच्या आचेवर खरपूस भाजाव्यात. छान चटपटीत कबाब तयार.


वाढणी :- २ ते ३ माणसे.

२६ एप्रिल, २०११

लाल टोमॅटोची हिरवी चटणी

साहित्य :-
१. १ टोमॅटो
२. कोथिंबिरीची १ जुडी
३. २ पेर आलं
४. ३ लसणाच्या पाकळ्या
५. चवीनुसार मीठ
६. अर्धा चमचा साखर

कृती :-
वरील सर्व जिन्नस मिक्सर मधून कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत. लाल टोमॅटोची हिरवी चटणी तयार. ही चटणी कुठल्याही प्रकारच्या सँडविचमध्ये छान लागते.

२८ मार्च, २०११

भरली मिरची







साहित्य :-
१. अर्धी वाटी दाणे
२. अर्धी वाटी तीळ
३. अर्धा चमचा मेथ्या
४. चवीपुरते मीठ
५. २ - ३ चमचे तेल
६. मोठ्या जाड मिरच्या २

कृती :-
प्रथम दाणे, तीळ व मेथ्या वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर मिक्सरमधून हे सर्व जिन्नस बारीक वाटावेत. त्यात चवीपुरते मीठ घालावे. मिरची मधोमध उभी चिरावी. दोन भाग होऊ देऊ नयेत. मिक्सरमधून वाटलेले मिश्रण या मिरची मध्ये भरून घ्यावा. तव्यावर थोडा तेल टाकून या मिरच्या ठेवाव्यात व झाकण लावून शिजू द्याव्यात. मस्त आणि चटपटीत तोंडीलावणं तयार.

वाढणी :- १ ते २ माणसे