उपवासाचे पदार्थ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपवासाचे पदार्थ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ ऑक्टोबर, २०१२

साबुदाण्याची खिचडी


साहित्य :-
१. १ कप साबुदाणा 
२. पाव कप दाण्याचे कूट
३. २ ते ३ मिरच्या 
४. अर्धा चमचा जीरं 
५. २ ते ३ चमचे तूप 
६. अर्धा चमचा साखर 
७. चवीपुरतं  मीठ 
८. ओलं  खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी 

कृती:-
प्रथम साबुदाणा थोड्याश्या पाण्यामध्ये भिजवावा. साबुदाणा कमीत कमी ५ ते ६ तास भिजला पाहिजे. भिजलेला साबुदाणा हाताला अगदी मऊ लागतो. त्याला नख लावले तर लगेच तुटतो. पण तरीही प्रत्येक दाणा अगदी  वेगळा वेगळा दिसतो. अशाप्रकारे साबुदाणा तयार झाला कि मग एका कढईमध्ये तूप तापवून घ्यावं. त्यात जिरं घालावं व ते तडतडलं की मग त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. फोडणी झाली की लगेचच त्यात भिजलेला साबुदाणा घालावा. दाण्याचं कूट घालावं. मीठ व साखर घालून छान  मिक्स करून घ्यावं. जर खिचडी थोडी कोरडी वाटत असेल तर पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून एक वाफ आणावी. खोबरं व कोथिंबीर घालून सजवावी व गरम गरम serve करावी. आवडत असल्यास लिंबू  पिळून हि गरम गरम खिचडी खावी.

आवडत असल्यास या खिचडीमध्ये उकडलेला बटाटादेखील घालतात. 

केवळ उपसालाच नाही तर इतर वेळेलाही अशी खिचडी दुपारच्या खाण्यासाठी केली जाते. उपासाच्या दिवसाचा हा अविभाज्य पदार्थ आहे. 

वाढणी :- १ ते २ माणसे.

६ जून, २०१२

केळ्याची कोशिंबीर


साहित्य :-
१. २ पिकलेली केळी
२. १ ते दीड कप दही
३. चिमूटभर मीठ
४. ३ ते ४ चमचे साखर
५. १ मध्यम आकाराची हिरवी मिरची
६. कोथिंबीर

कृती:-
दोन्ही केळी सोलून कापून घ्यावी. त्यात दही, साखर, व मीठ घालावे. हिरवी मिरची बारीक चिरून घालावी व आवडत असल्यास कोथिंबीर घालावी. ही कोशिंबीर पोळीबरोबर छान लागते किंवा नुसती खायला पण छान वाटते. लहान मुलांना ही कोशिंबीर देताना मिरची न घालता दिली तरी चविष्ट लागते. उपवासाला देखील नुसती खायला ही कोशिंबीर चालते. 

वाढणी :- २ ते ३ माणसे.

१५ सप्टेंबर, २०११

उपवासाची कचोरी


साहित्य :-
१. २ ते ३ माध्यम आकाराचे बटाटे
२. ४ मिरच्या
३. १ चमचा आलं
४. २ चमचे जीरं
५. १ कप किसलेलं खोबरं
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा कप कोथिंबीर
८. २ ते ३ चमचे कोर्नफ्लोर
९. तळणीसाठी तेल
१०. चिमूटभर साखर

कृती:-
बटाटे उकडून सोलावेत व हाताने कुस्करून घ्यावेत. त्यात कोर्नफ्लोर घालावे. २ मिरच्या व थोडं आलं वाटून घ्यावं व बटाट्यामध्ये घालावं. मीठ घालून हे सर्व पदार्थ छान एकत्र करून गोळा बनवून घ्यावा. उरलेल्या मिरच्या, आलं व जिरे वाटून घेऊन किसलेल्या खोबऱ्यामध्ये घालावे. मीठ व थोडीशी साखर घालून सर्व एकत्र करावं. आता बटाट्याच्या गोळ्यामधला थोडा गोळा घेऊन त्याला मध्ये खळगा करावा व त्यात खोबऱ्याच सारण भराव आणि कचोरी बंद करावी. जर आवडत असेल तर सारण भरल्यावर त्यात एखादा बेदाणा घालावा. सर्व कचोऱ्या अशा तयार करून घ्याव्यात. तेल मध्यम आचेवर तापवून घ्यावं. कचोरी तेलात पूर्ण बुडेल एवढं तेल कढईमध्ये घ्यावं. एकदा तेलात कचोरी घातली की जास्त हलवू नये. झाऱ्यावर कचोरी ठेवून मग तेलात सोडावी म्हणजे तिचा आकार बदलणार नाही. कोर्नफ्लोरमुळे कचोरी तळली जायला थोडा जास्त वेळ लागेल. छान सोनेरी रंगावर सर्व कचोऱ्या तळून घ्याव्यात व गरम गरम serve कराव्यात.

वाढणी :- या साहित्यात साधारणपणे १० ते १२ कचोऱ्या होतील.

१७ मे, २०११

साबुदाणा वडा


साहित्य :-
१. साबुदाणा १ वाटी
२. दाण्याचे कूट अर्धी वाटी
३. १ मध्यम आकाराचा बटाटा
४. जीरं १ चमचा
५. मिरची १ चमचा
६. चिमूटभर सोडा
७. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
८. मीठ चवीनुसार
९. तळणीसाठी तेल

कृती :-
प्रथम साबुदाणा पाण्यात भिजवावा. जेवढा साबुदाणा त्याच्यापेक्षा रेषभर जास्त पाणी घालावे आणि हा साबुदाणा ५ ते ६ तास भिजवावा. बटाटा शिजवून घेऊन mash करून घ्यावा. भिजवलेला साबुदाणा, mash केलेला बटाटा, दाण्याचे कूट, जीरं, मीठ, सोडा, कोथिंबीर हे सर्व जिन्नस एकत्र करावेत. हाताला थोडे पाणी लावत लावत त्याचे वाडे करून घ्यावेत. तेल गरम करावे व वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत व दह्यासोबत गरम गरम serve करावेत. यामध्ये कुरकुरीत पणासाठी वारीचे तांदूळ घातले जातात. तुम्हाला आवडत असल्यास घालावेत. पण त्याशिवायदेखील हे वडे छान कुरकुरीत होतात आणि फुलतात.

वाढणी :- २ ते ३ माणसे.