पंजाबी पद्धतीच्या भाज्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पंजाबी पद्धतीच्या भाज्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६ मे, २०१५

सिमला मिरची - पनीर भुर्जी


साहित्य :-
१. बारीक चिरलेला कांदा १ कप 
२. बारीक चिरलेला  टोमॅटो अर्धा कप 
३. चौकोनी चिरलेली सिमला मिरची अर्धा कप 
४. कुस्करलेलं पनीर ३ कप 
५. १ चमचा देघी मिरची पावडर 
६. पाऊण चमचा गरम मसाला 
७. चवीनुसार मीठ
८.  अर्धा चमचा जीरं 
९. सजावटीसाठी कोथिंबीर 
१०. फोडणीसाठी तेल 

कृती :-
प्रथम पनीर कुक्सरून घ्यावे. कांदा बारीक चिरावा. तेलावर कांदा परतून घ्यावा. कांदा छान मौसार झाला कि मग त्यात टोमॅटो घालून ते मऊ शिजेपर्यंत परतावेत. त्यात सिमला मिरची घालावी. सिमला मिरची अर्धी कच्ची असताना त्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे. मसाले शिजले की त्यात कुस्करलेलं पनीर घालावं. पनीर घालून भाजी छान एकत्र करून घ्यावी. पनीर जास्त शिजवू नये नाहीतर ते कडक व्हायला लागतं. वरून कोथिंबीर व गरज असल्यास मीठ घालून भाजी पुन्हा परतून घ्यावी आणि पोळी अथवा पराठ्यासोबत गरम गरम serve करावी. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

१३ जुलै, २०११

नवरत्न कुर्मा



साहित्य :-
१. अर्धी वाटी श्रावण घेवडा
२. अर्धी वाटी गाजर
३. अर्धी वाटी बटाटा
४. अर्धी वाटी मटारचे दाणे
५. पाव वाटी सिमला मिरची
६. अर्धी वाटी पनीर
७ . मध्यम आकाराचा कांदा
८ . १ चमचा आलं
९ . १ चमचा लसूण
१० . ८ ते १० काजू
११ . अर्धा चमचा तिखट
१२ . अर्धा चमचा गरम मसाला
१३. पाव चमचा हळद
१४. पॅपरीका
१५. अर्धा कप heavy whipping cream
१६. पाव चमचा जीरं
१७. १ वाटी टोमॅटो प्युरे
१८. अननस, सफरचंद, द्राक्षं प्रत्येकी ३ ते ४ चमचे
१९. बेदाणे ३ ते ४ चमचे

कृती :- मसाला
प्रथम तेलावर चिरलेला कांदा, चिरलेला आलं, लसूण व काजू परतून घ्यावेत. हा मसाला मिक्सरमधून बारीक वाटावा. हा मसाला बनवून ठेवला तर फ्रीज मध्ये साधारण २ ते ३ आठवडे चांगला टिकतो व पनीर- मटर, मशरूम- मटर, कोफ्ता करीची करी बनवण्यासाठी वापरता येतो.

भाजीची कृती :-
सर्व भाज्या चौकोनी कापून घ्याव्यात. एका कढईमध्ये मध्यम आचेवर तेल तापवून घ्यावे. मग या तेलावर प्रथम भाज्या परतून घ्याव्या. कढईच्या मधोमध जागा करून पनीर चे चौकोनी तुकडे त्यात घालावेत व परतून घ्यावे. पनीर तळू नये. पनीर पहिले तळून घेतलं तर त्याचा मऊपणा जाऊन ते चिवट होतं. मग त्यात वरील मसाला घालावा. थोडावेळ परतून मग टोमॅटो प्युरे घालावी. थोडसं पाणी घालून भाजी थोडावेळ शिजवावी. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला, पॅपरीका व मीठ घालून भाजी सारखी करून घ्यावी. भाजी पूर्ण शिजली की मग त्यात अननस, सफरचंद व द्राक्षं घालावीत. बेदाणे घालून भाजी परत शिजू द्यावी. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालावे. सर्वात शेवटी whipping cream घालून भाजी अजून २ मिनिटं शिजवावी. ही भाजी पोळी सोबत किंवा जीरं राइस सोबत अतिशय छान लागते.

वाढणी :- २ ते ४ माणसे

२६ मार्च, २०११

मसालेदार छोले



साहित्य :-
१. छोले दीड वाटी (न भिजवलेले )
२. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
३. अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
४. अनारदाना १ चमचा
५. हळद १/२ चमचा
६. तिखट १ चमचा
७. छोले मसाला २ चमचे
८. आलं लसूण किसून प्रत्येकी १ चमचा
९. मीठ चवीनुसार
१०.तेल २ चमचे
११. जीरं १ चमचा


कृती :-
प्रथम छोले ४ वाटी पाण्यात ७ ते ८ तास भिजून ठेवावेत. नंतर कूकरमध्ये मीठ घालून हे भिजलेले छोले उकडावेत. एका कढई मध्ये तेल तापवावे. त्यात जीरं घालून कांदा परतावा. कांदा थोडा मऊ झाला की त्यात आलं लसूण घालून पुन्हा मिनिटभर परतावे. आच कमी करावी व हळद, तिखट, छोले मसाला घालावा आणि मिश्रण एकत्र करून घ्यावे. हे मसाले थोडे शिजले की त्यात शिजवलेले छोले घालावेत. आच वाढवावी. थोडे पाणी घालावे व छान उकळी आणावी. मग त्यात अनारदाना घालून पुन्हा उकळावे. मीठ घालावे. जितका जास्त छोले उकळातील तितका जास्त पाणी त्याला लागेल. त्यामुळे आवश्यक तेवढं पाणी घालून थोडी gravy राहील इतपत उकळावे. मग त्यात टोमॅटो घालावा. पुन्हा थोडे उकळून घ्यावे व कोथिंबीर पेरून गरम गरम serve करावे.

वाढणी :- ३ ते ४ माणसे




८ नोव्हेंबर, २०१०

मेथी मटर मलई




साहित्य :-
१. २ वाट्या चिरलेली मेथी
२. अर्धी वाटी मटार
३. अर्धी वाटी मिल्क क्रीम
४. चिमुटभर दालचिनी पावडर
५. चिमुटभर आमचूर पावडर
६. अर्धी वाटी चिरलेला कांदा
७. मीठ चवीनुसार
८. फोडणीसाठी तेल
९. अर्धा चमचा तिखट
१०. अर्धा चमचा साखर

कृती :-
प्रथम मेथीची पानं खुडून धुवून ती बारीक चिरून घ्यावीत. एका कढई मध्ये तेल घालावे. तेल तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा मऊ होईपर्यंत परतावा. मग त्यात मेथी घालून परतावे. मेथी मऊ झाली की त्यात मटार घालावेत. मध्यम आचेवर थोडावेळ परतून घ्यावे. त्यात दालचिनी पावडर व आमचूर पावडर घालावी. तिखट घालावे. चवीनुसार मीठ घालून भाजी सारखी करून घ्यावी. थोडी साखर घालून भाजी थोडावेळ शिजवावी. सगळ्यात शेवटी जेव्हा भाजी पूर्ण शिजलेली असेल तेव्हा मिल्क क्रीम घालून भाजीला उकळी आणावी. आवश्यक त्या प्रमाणात रस ठेवावा. मिल्क क्रीम घालून जर भाजी जास्त शिजवली तर ती दाट होते. कोथिंबीर घालून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- ही भाजी २ - ३ माणसांना पुरेल.


८ मार्च, २०१०

पालक पनीर


साहित्य :-

१. २ वाट्या शिजवलेला पालक
२. अर्धी वाटी पनीर
३. अर्धी वाटी कांदा
४. अर्धी वाटी टोमॅटो
५. खडा मसाला (दालचिनी, लवंग, वेलदोडा)
६. अर्धी वाटी मिल्क क्रीम / whipped cream
७. २ चमचे कसुरी मेथी
८. मीठ
९.2 हिरव्या मिरच्या
१०. फोडणीसाठी तेल
११. प्रत्येकी १ चमचा धणे जिरे पूड
१२. हळद

कृती :-
प्रथम एका पातेल्यात पाणी तापत ठेवावे. पाणी उकळले की त्यात पालक ४ ते ५ मिनिटे शिजवावा. शिजलेला पालक लगेच गार पाण्यात ठेवावा. पालक व चवीनुसार हिरवी मिरची मिक्सरमधून वाटावी. एका पसरट पातेल्यात तेल तापत ठेवावे. तेल तापले की त्यात खडा मसाला घालून परतावे. कांदा घालावा. कांदा मऊ झाला की त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटो थोडा शिजला की धणे जिरे पूड, कसुरी मेथी, हळद घालावी
व थोडावेळ शिजवावे. मग त्यात मिक्सरमधून काढलेला पालक घालावा. त्या पालकाला तेल सुटेपर्यंत परतावे. सतत ढवळत राहावे. पनीर चे आपल्याला आवडतील अशा आकाराचे तुकडे करून ते भाजीत घालावेत. मिल्क क्रीम व मीठ घालून भाजी mix करावी. आच बंद करून भाजी serving bowl मध्ये काढावी व गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे