साहित्य :-
१. १ कप दूध
२. १ कपापेक्षा थोडीशी जास्त साखर
३. १ कप तूप
४. चिमुटभर मीठ
५. मैदा साधारणपणे ३ ते ४ कप
६. तळणीसाठी तेल
कृती:-
एका पातेल्यामध्ये दुध, साखर व तूप एकत्र करून गरम करण्यास ठेवावे. त्यात चिमुटभर मीठ घालावे. या मिश्रणाला उकळी आली की आच बंद करून त्यात हळू हळू मैदा घालण्यास सुरुवात करावी. अगदी पोळीच्या कणकेसारखी पातळ कणिक तयार झाली की ती झाकून ठेवावी. २ ते ३ तासांनी ही कणिक घट्ट झालेली असेल. आता ही कणिक पुन्हा थोडी मळून घ्यावी. मळताना जर असे वाटले की कणिक परातीला किंवा ओट्याला चिकटत आहे तर त्यात २ चमचे तांदुळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोर घालावे व कणिक मळावी. मग या कणकेचे मोठो गोळे करून ते पराठ्याप्रमाणे जाडसर लाटून घ्यावेत. कातण्याने किंवा सुरीने या लाटलेल्या पोळीचे चौकोनी तुकडे करावेत. या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्याव्यात. सगळ्या कणकेच्या शंकरपाळ्या तयार झाल्या की तेलामध्ये हळूहळू थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडून सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. शंकरपाळ्या सोनेरी झाल्या की लगेचच तेलातून काढाव्यात. तेलातून काढल्यानंतर देखील त्या थोड्या जास्त रंग पकडतात. शंकरपाळ्या तळताना तेल कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर शंकरपाळ्या तेलात विरघळू शकतात.
वाढणी :- या साहित्याच्या मध्यम आकाराचा डबा भरेल एवढ्या शंकरपाळ्या होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा