साहित्य :-
१. २ कप खोवलेलं ओलं खोबरं
२. २ कप + १/४ कप साखर (ज्यांना कमी गोड आवडतं त्यांनी जेवढं खोबरं त्यापेक्षा थोडी कमी साखर घ्यावी.)
३. अर्धा चमचा वेलची पूड
४. १ कप मैदा
५. २ चमचे बारीक रवा
६. ४ चमचे तुपाचे मोहन
७. चिमुटभर मीठ
कृती:-
मैदा व रवा एकत्र करून त्यात तुपाचे मोहन व चिमुटभर मीठ घालावे. हे सगळे तूप मैद्यामध्ये एकजीव करून घ्यावे. थोडं थोडं पाणी किंवा दुध घालत घट्ट कणिक मळून घ्यावी. ही कणिक झाकून ठेवावी. खोबरं व साखर एकत्र करून शिजायला ठेवावं. मध्यम आचेवर हे मिश्रण सतत ढवळत शिजवावं. हे सारण थोडं दाट व्हायला लागेल. कढईच्या कडा सुटायला लागल्या की सारण तयार झालं. हे सारण गार होऊ द्यावं. मग मैद्याची मळलेली कणिक घेऊन ती पुन्हा एक ५ मिनिटे छान मळून घ्यावी. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. एक गोळा घेऊन तो पुरीसारखा लाटून घ्यावा. त्यात खोबऱ्याचे सारण भरून अर्धगोलामध्ये कारंजी बंद करून घ्यावी. या बंद बाजूला कातण्याने अगदी बाहेरच्या बाजूने कापून घ्यावे. कातण नसेल तर काटेचमच्याने बंद बाजू दाबून घ्यावी. या तयार करंज्या ओलसर फडक्याखाली ठेवाव्यात. कढईमध्ये तेल तापवून या करंज्या बदामी रंगावर परतून घ्याव्यात. करंज्या केल्या की नेहेमी एखादा मोदक करावा.
वाढणी :- या साहित्याच्या १२ ते १५ करंज्या होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा