साहित्य :-
१. २ कप बारीक रवा
२. अर्धा कप किसलेलं ओलं खोबरं
३. अडीच कप साखर
४. थोडं पाणी पाक बनवण्यासाठी
५. १ चमचा वेलची पूड
६. चिमुटभर केशर
७. अर्धी ते पाउण वाटी तूप
८. बेदाणे
कृती :-
प्रथम एका पातेल्यात तूप गरम करून त्यावर रवा मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावा. मग त्यात किसलेलं ओलं खोबरं घालून पुन्हा थोडावेळ परतून घ्यावं. खोबरं घातल्यावर रवा थोडा फुलायला लागेल. एक ५ ते १० मिनिटे परतल्यावर आच बंद करावी. रवा भाजून घेईपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये साखर घेऊन ती बुडेल इतपत पाणी घालून १ तरी पाक करायला ठेवावा. एकतरी पाक व्हायला साधारणपणे १० ते १५ मिनिटे लागतील. पाक थोडा दाटसर झाला की कणभर पाक दोन बोटांमध्ये धरून त्याला एक तार येते का ते बघावे. तसे झाल्यास पाक तयार झाला असे समजावे. मग त्यात वेलची पूड व केशर घालावे. केशर आधी घातले तर पाकाचा रंग बदलतो म्हणून पाक तयार झाला की केशर घालावे. मग या पाकामधे भाजलेलं रवा खोबरं घालून मिश्रण छान मिक्स करून घ्यावं. या क्षणी हे मिश्रण खूप सैलसर वाटेल पण हे लाडू लगेच वळायचे नसतात. लाडवाचं मिश्रण तयार झालं की ते २ ते ३ तास ठेवावं. ३ तासाने हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं असेल. फक्त या २ ते ३ तासात मिश्रण मधून मधून ढवळून घ्यावं. आता घट्ट झालेल्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळावेत व सजावटीसाठी त्यावर बेदाणे लावावेत.
वाढणी :- या साहित्याचे १६ ते २० लाडू तयार होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा