८ नोव्हेंबर, २०१२

पातळ पोह्यांचा चिवडा


साहित्य :-
१. ३ कप पातळ पोहे 
२. १ कप चुरमुरे 
३. १० ते १२ कढीपत्त्याची पाने 
४. मुठभर दाणे 
५. मुठभर डाळं 
६. चवीनुसार हिरव्या मिरच्या 
७. अर्धा चमचा हिंग 
८. १ चमचा साखर 
९. तेल व फोडणीचे साहित्य 
१०. चवीनुसार मीठ 
११. १ चमचा हळद 

कृती:-
प्रथम पातळ पोहे चाळणीतून हलक्या हाताने चाळून घ्यावेत. एका कढईमध्ये हे पातळ पोहे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावेत. एका वर्तमानपत्रावर पोहे काढून घ्यावेत. चुरमुरे देखील थोडे परतून घ्यावेत व पोह्यांवर घालावेत. मग कढईमध्ये भरपूर तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची व हळद  हे सर्व घालून फोडणी करून घ्यावी. त्यात दाणे व डाळं घालून ते परतलं गेलं की ही फोडणीदेखील पोह्यांवर घालावी. मग त्यात साखर व मीठ घालून हलक्या हाताने सर्व पदार्थ मिक्स करावेत. या पोह्यांमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप सोनेरी रंगावर तळून घालतात. फोडणी करायच्या आधी हे खोबरं तळून पोह्यांवर घालावं. अतिशय खरपूस चिवडा तयार. चुकून जर मिठाचा अंदाज चुकला व चिवडा खारट झाला तर थोडे चुरमुरे भाजून घालावेत. खारटपणा कमी होतो.

वाढणी  :- ४ ते ५ माणसे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा