साहित्य :-
१. १ वाटी पाणी
२. १ वाटी तांदुळाची पिठी
३. १ चमचा बटर किंवा तूप
४. चिमूटभर मीठ
५. ३ ते ४ चमचे तेल
६. अर्धी वाटी कोमट पाणी
७. १ वाटी ओलं खोबरं
८. १ वाटीपेक्षा थोडा कमी गूळ
९. १ चमचा वेलची पूड
१०. ड्रायफ्रुट्स (हवी असल्यास )
११. दीड चमचा खसखस
कृती :-
उकड :-
प्रथम १ वाटी पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आली की लगेचच त्यात मीठ व तूप घालावे. १ वाटी तांदळाची पिठी पहिले चाळून ठेवावी व पाण्याला उकळी आल्याआल्या लगेचच सर्व पिठी त्या पाण्यात घालावी. आच अगदी मंद करावी. पटापट पिठी पाण्यात एकत्र करावी. आच बंद करून झाकण लावून ही पिठी ठेवून द्यावी. ही अशीच कृती मायक्रोवेव्ह मधेही तुम्ही करू शकता. पहिले पाणी तूप व मीठ घालून १ मिनिटासाठी गरम करावे. चाळलेली पिठी घालून पुन्हा २ मिनिटे ठेवावे. उकड तयार.
सारण :-
आता सारण करून घ्यावे. हे देखील मायक्रोवेव्हमध्ये छान होते. एका मायक्रोवेव्हच्या भांड्यात प्रथम खसखस ४० ते ५० सेकंद भाजून घ्यावी. त्यात ओलं खोबरं व गूळ घालावं. पुन्हा ४० सेकंद ठेवावा. गूळ व खोबरं छान एकत्र करावं व हे सारण मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिटे ठेवावं. जर सारणातल पाणी आटलं नसेल तर काही सेकंद पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये ठेवावं. सारण तयार झाल्यावर वेलची पूड व ड्रायफ्रुट्स घालावीत. मिक्स करावं. हे सारण तुम्ही आचेवर शिजवत असाल तर आच मध्यम असावी. आणि सारणाच पाणी आटल्या आटल्या सारण भांड्यामधून काढावे.
मोदक :-
आता उकड व सारण या दोन्ही गोष्टी तयार झाल्या. आता मगाशी जी उकड बनवली आहे टी कोमट पाणी लावून छान मळून घ्यावी. त्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत. चीर नसेल अशाप्रकारे एक एक गोळा तयार करावा. मधोमध अंगठ्याने दाबून खळगा तयार करावा. बाकीच्या बोटांनी या गोळ्याला बाहेरून आधार देत अंगठ्याने आटल्या बाजूला हलकासा जोर लावून वाटीसारखा आकार तयार करावा. त्याला छान काळ्या पाडाव्यात. मध्ये सारण भरावे व हळुवार पणे कळ्या दुमडणार नाहीत अशी काळजी घेऊन मोदक बंद करावा.
हाताने मोदक बनवणे ही एक कला आहे. जर हाताने मोदक बनवायला अवघड वाटत असतील आणि मोदकाचा साचा उपलब्ध असेल तर साच्याचा वापर करूनच मोदक बनवावेत. त्यासाठी साच्याला थोडेसे पाणी व तेल लावून घ्यावे. साचा बंद करून उकडीचा छोटा गोळा साच्यात भरावा. साच्यात सर्व बाजूनी तो गोळा पसरवून घ्यावा. सारण भरावे व एक चकती खालच्या बाजूने लावून हळू हळू साचा उघडावा.
हे तयार होणारे मोदक ओलसर कापडाखाली ठेवावेत म्हणजे उकड बाहेरून कोरडी पडणार नाही व मोदक फुटणार नाहीत.
अशाप्रकारे मोदक तयार झाले की इडली पात्रात १० मिनिटे उकडून घ्यावेत. तुमच्याकडे राइस कुकर असेल तर त्यातही जाळीच्या ताटलीवर मोदक छान उकडले जातात. असे गरम गरम मोदक साजूक तूप घालून serve करावेत.
वाढणी :- वरील साहित्यात साधारण ५ ते ६ मध्यम आकाराचे मोदक तयार होतील.
गोडाचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा