१७ फेब्रुवारी, २०१२

वरणफळं / चकोल्या


साहित्य :-
१. २ कप पोळीची कणिक
२. १ चमचा हळद
३. २ चमचे तिखट
४. धना जीरा पूड प्रत्येकी २ चमचे
५. गरम मसाला ३ चमचे
६. तेल ४ ते ५ चमचे
७. १ कप चिरलेली कोथिंबीर
८. तूर डाळ १ कप
९. चवीनुसार मीठ
१०. ६ ते ७ कढीपत्त्याची पणे
११. २ ते ३ आमसुले / कोकम

कृती :-
प्रथम तूर डाळ दीड कप पाणी घालून कुकर मध्ये उकडून घ्यावी. पोळीची कणिक घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, धना जीरा पूड प्रत्येकी १ चमचा, दीड चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, थोडं तेल व कोथिंबीर घालावी. पोळीच्या कणिकेपेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळावी. आता कढईमध्ये तेलाची फोडणी करून त्यात मोहरी व कढीपत्ता घालावा व उरलेले सर्व मसाले घालावेत. उकडलेली डाळ थोडी मॅश करून कढईत घालावी. कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालावे. आमटी थोडी पातळ होण्यासाठी थोडं पाणी घालावं. आमसुले घालून आमटीला उकळी येऊ द्यावी व आमटी बारीक आचेवर उकळत ठेवावी. आता मळलेल्या कणिकेचे छोटे गोळे घेऊन त्यांना तेल लावून ते लाटावेत. पोळी लाटली की कातण्याने शंकरपाळीच्या आकाराचे तुकडे करावेत व आमटीमध्ये सोडावेत. आमटी थोडी उकळावी व तोवर दुसरी पोळी लाटून घ्यावी. आमटीमध्ये अशाप्रकारे पोळीचे तुकडे घातले की आमटी मध्यम आचेवर थोडावेळ उकळावी. म्हणजे कच्ची कणिक शिजेल. आमटी पातळ राहील इतपत तुकडे घालावेत. मध्ये मध्ये आमटी उकळत असताना ढवळावी. अशी तयार वरणफळे एका बाउलमध्ये घालून वरून कोथिंबीर घालून गरम गरम serve करावे. अतिशय झटपट होणारे हे पूर्ण जेवण आहे. वरणफळे वाढताना तूप आणि लिंबू त्यावर घालावे व मगच वाढावे.

वाढणी :- २ ते ३ माणसे

३ फेब्रुवारी, २०१२

राज कचोरी


साहित्य :-
१. मैदा १ कप
२. १ ते ३ चमचे तेल
३. चवीनुसार मीठ
४. साधारणपणे १/४ कप कोमट पाणी
५. १/३ कप बेसन
६. चिली फ्लेक्स अर्धा चमचा
७. आमचूर पावडर १ चमचा
८. मोड आलेले मुग २ वाट्या
९. २ उकडलेले बटाटे
१०. पुदिना, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर यांची चटणी
११. चिंचेची गोड चटणी (ही चटणी ब्लॉगवर लिहिलेली आहे.)
१२. १ कप फेटलेलं दही
१३. कोथिंबीर, शेव सजावटीकरता
१४. तळणीसाठी तेल

कृती:-
प्रथम मैदा, १ चमचा तेल चवीनुसार मीठ व कोमट पाणी हे सर्व जिन्नस एकत्र करून अगदी मऊसर कणिक मलीन घ्यावी. मैद्याची कणिक भिजवताना नेहेमी जास्त वेळ कणिक मळावी. १० ते १५ मिनिटं कणिक झाकून ठेवावी. आता बेसन, १ चमचा तेल, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स व आमचूर पावडर हे सर्व जिन्नस हाताने एकत्र करून घेऊन सारण करून घ्यावे. मोड आलेले मुग एका कढईमध्ये २ ते ४ चमचे पाणी घालून व चवीपुरतं मीठ घालून थोडे मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावेत. उकडलेला बटाटा चौकोनी चिरून घ्यावा. मैद्याची जी कणिक आपण माळली होती ती घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. हे गोळे तळहाताएवढे लाटून घ्यावे. या लाटलेल्या कणकेमध्ये बेसनाचे सारण जे आपण तयार केलं होतं ते चमचाभर भरून घ्यावं. सारण भरून कणकेचे गोळे करून ते थोडावेळ बाजूला ठेवावेत. एक ५ ते १० मिनिटांनी हे बेसनाचे पीठ भरलेले गोळे घेऊन पुन्हा तळहाताएवढे लाटून घ्यावेत. लाटताना ज्या बाजूने हे गोळे बंद केले आहेत ती बाजू वरती घेऊन लाटावेत. त्यामुळे कचोरी छान फुलून येते. कढईमध्ये तेल तापवावे. पण तेल जास्त कढत असू नये. कचोरी तेलात टाकली की ती लगेच वर येत कामा नये. ती आपोआपच फुगते व वर येते. तेलात कचोरी तळताना ती सतत हलवू नये किंवा तेलात खाली दाबू नये. मध्यम आचेवर कचोरी दोन्ही बाजूने ब्राऊन होईपर्यंत तळावी. अशी तळलेली कचोरी जास्त कुरकुरीत होते. कचोरी तयार झाल्यावर ती गार झाली की मग त्याला पाणीपुरीच्या पुरीप्रमाणे मध्ये भोक पाडावे. आता या कचोरीमध्ये उकलेल्या बटाट्याच्या फोडी, शिजवलेले मोड आलेले मुग, पुदिन्याची हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी, फेटलेलं दही, कोथिंबीर व बारीक शेव घालून छान सजवून serve करावी.

वाढणी :- वरील साहित्यात १० ते १२ कचोरी होतील.

३१ जानेवारी, २०१२

मसाला पापड


साहित्य :-
१. बारीक चिरलेला कांदा १ वाटी
२. बारीक चिरलेला टोमॅटो १ वाटी
३. चिरलेली कोथिंबीर
४. चाट मसाला १ छोटा चमचा
५. जिरे पूड अर्धा चमचा
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा चमचा तिखट
८. तुमच्या आवडीचे ४ ते ५ पापड

कृती :-
प्रथम प्रत्येक पापडाला दोन्ही बाजूनी थोडसं तेल लावून घ्यावं. हे तेल लावलेले पापड मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्यावेत. एका बाउल मध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व बाकी सर्व जिन्नस घालून पापडावर घालायचा मसाला तयार करावा. मसाला तयार झालं की प्रत्येक पापडावर घालून चहासोबत किंवा जेवणाच्या आधी एखाद्या सूपसोबत serve करावेत.

वाढणी :- १ ते २ माणसे

१६ जानेवारी, २०१२

साधी चिकन करी


साहित्य :-
१. बारीक चिरलेला कांदा १ कप
२. बारीक चिरलेला टोमॅटो १ कप
३. १ चमचा तिखट
४. १/२ चमचा हळद
५. धना जीरा पावडर प्रत्येकी १ चमचा
६. गरम मसाला १ चमचा
७. पॅप्रिका किंवा देगी मिरची पावडर १ चमचा
८. १.५ पाऊंड चिकन
९. चवीपुरतं मीठ
१०. कोथिंबीर सजावटीसाठी
११. आलं लसूण किसून प्रत्येकी १ चमचा

कृती :-
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. एका चाळणीमध्ये जास्तीचं पाणी गाळण्यासाठी चिकन ठेवून द्यावं. एका कढईमध्ये तेल तापवून त्यात कांदा परतावं. कांदा ब्राऊन झाला की त्यात आलं लसूण घालून मिनिटभर परतावं. मग हळद, तिखट, पॅप्रिका, गरम मसाला, धना जीरा पावडर सगळा घालून परत मिनिटभर परतावं. मग त्यात टोमॅटो घालून शिजवून घ्यावा. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत छान परतावा. मग त्यात चिकन घालावं व मिक्स करून झाकण लावून एक २ ते ३ मिनिटं शिजवावं. चिकनला तेल आणि पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी आत्ता घालू नये. थोडं थोडं पाणी घालत झाकण लावून चिकन शिजू द्यावं. चिकन शिजलं की त्यात तुम्हाला जेवढी पातळ ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालावं व मीठ घालून चिकन पुन्हा २ ते ३ मिनिटं शिजवावं. कोथिंबीर घालून गरम गरम serve करावं.

वाढणी :- २ ते ३ माणसे

१४ जानेवारी, २०१२

गुळाची पोळी


साहित्य :-
१. २ वाट्या किसलेला गूळ
२. पाव वाटी बेसन
३. खसखस व तीळ प्रत्येकी २ चमचे
४. अर्धा चमचा वेलची पूड
५. ३ वाट्या कणिक
६. अर्धी वाटी तेल

कृती :-
पहिले पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी. फक्त ही कणिक थोडी घट्ट असावी. किसलेला गूळ घ्यावा. त्यात खसखस व तीळ भाजून त्यांची पूड करून ते घालावे. बेसन तेलावर थोडं भाजून घ्यावं व गुळामध्ये घालावं. त्यात वेलची पूड घालावी. गुळाबरोबर हे सर्व जिन्नस मिक्स करावेत. आता या गुळाचा गोळा मळून घ्यावा. त्यासाठी अगदी थोडं थोडं दूध वापरावं. दूध अगदी अर्धा अर्धा चमचा घालत राहावं. दूध जास्त झालं तर पोळी लाटली जाणार नाही. थोडं तेल लावून गुळाचा छान गोळा मळून घ्यावा. आता कणकेचे गोळे करून घ्यावेत. त्यातला एक गोळा घेऊन त्याचे दोन भाग करावेत. त्याच्या छोट्या लाट्या करून घ्याव्यात. त्यातल्या एका लाटीवर गुळाचा एक गोळा ठेवून वरून दुसरी लाटी लावावी. कडा नीट बंद करून घ्याव्यात. व तांदुळाची पिठी लावून हलक्या हाताने पोळी लाटावी. मध्यम आचेवर तवा तापवून पोळी दिनही बाजूनी भाजून घ्यावी. अशाप्रकारे सर्व पोळ्या करून घ्याव्यात. गुळाच्या पोळीवर साजूक तूप घालून ही पोळी serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे

११ जानेवारी, २०१२

तीळगूळ वडी


साहित्य :-
१. २ वाट्या चिरलेला गूळ
२. १. वाटी भाजलेले तीळ
३. १ वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट
४. २ चमचे किसलेलं सुकं खोबरं
५. चिमूटभर वेलची पूड
६. १ चमचा तूप

कृती :-
प्रथम एका ताटाला तूप लावून ठेवावे. कढईमध्ये गूळ घालून मध्यम आचेवर कढई तापवावी. गूळ वितळला की लगेचच त्यात तीळ, दाण्याचं कूट व वेलची पूड घालावी. पटापट ढवळून घ्यावं. तुपाने ग्रीस केलेल्या तटावर हे मिश्रण घालून एखाद्या डावाने ते भरभर पसरून घ्यावे. या डावाला देखील थोडेसे तूप लावावे म्हणजे गूळ डावाला चिकटणार नाही. मिश्रण एकसारखा पसरलं की त्यावर सुकं खोबरं लावून हलक्या हाताने दाबून घ्यावं. लगेचच सुरीने वड्या पाडाव्यात. तिळगुळ वडी तयार.

वाढणी :- वरील साहित्यातून साधारणपणे १२ ते १५ वड्या होतील.

१० जानेवारी, २०१२

बाजरीची भाकरी


साहित्य :-
१. बाजरीच पीठ २ वाट्या
२. गरम पाणी
३. पांढरे तीळ २ चमचे

कृती :-
बाजरीच पीठ गरम पाणी घालत घालत थोडसं सैलसर मळून घ्यावं. मळलेल्या गोळ्याचा छोटा उंडा घेऊन दोन हातामध्ये त्याचा दाबत दाबत त्याचा चपटा गोल बनवून घ्यावा. पोळपाटावर थोडं तांदळाचं पीठ भुरभुरून त्यावर हा चपटा गोळा ठेवावा. हाताने हळू हळू थापत थापत गोल भाकरी बनवावी. त्यावर लगेचच थोडे तीळ लावून हलक्या हाताने दाबून घ्यावेत. भाकरीला ज्या बाजूला तीळ लावलेले आहेत ती बाजू तव्यावर देखील वरच आली पाहिजे अशा प्रकारे भाकरी तव्यावर टाकावी. लगेचच भाकरीच्या वरच्या बाजूला थोडसं पाणी लावायचं. हे पाणी थोडं वाळत आलं की भाकरी उलटावी. परत २ ते ३ मिनिटं भाकरी भाजली गेली की मग उलटून थेट आचेवर भाजावी. जर तुमच्याकडे कॉईल असेल तर त्यावर ठेवायची एक जाळी मिळते. त्या जाळीवर भाकरी भाजली तरी छान फुलते. अशा गरम गरम भाकऱ्या लोणी लावून serve कराव्यात.
ही बाजरीची भाकरी संक्रांतीच्या आदल्या दिवशी अर्थात भोगीला खाल्ली जाते.

वाढणी :- १ ते २ माणसे



१३ डिसेंबर, २०११

गाजर हलवा


साहित्य :-
१. ४ ते ५ वाट्या किसलेलं गाजर
२. १ ते २ वाट्या साखर
३. अर्धी वाटी खवा
४. ४ ते ५ चमचे तूप
५. काजू, बेदाणे पाव वाटी

कृती :-
एका नॉनस्टिक कढईमध्ये तूप गरम करून घ्यावे. या तूपात प्रथम काजू व बेदाणे टाळावेत. काजूचा रंग बदलला आणि बेदाणे फुलले की लगेच किसलेलं गाजर घालून सर्व जिन्नस छान एकत्रित करावेत. गाजरावर झाकण ठेवून मध्यम आचेवर गाजर मऊ शिजू द्यावे. गाजर खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. मधून मधून झाकण काढून ढवळावे. गाजर शिजत आले की त्याचा रंग बदलतो आणि गाजर जवळपास मापामध्ये अर्धं होतं. गाजर छान शिजला की त्यात साखर घालावी. साखर घातल्यावर थोडं पाणी सुटतं. ते पाणी आटेपर्यंत गाजर शिजवावं. खवा थोडसं गरम करून घ्यावा व शिजलेल्या गाजरामध्ये घालावं. ५ मिनिट सर्व मिश्रण शिजवावे. गरम गरम गाजर हलवा छान सजवून serve करावा.

वाढणी :- २ ते ३ माणसे

३१ ऑक्टोबर, २०११

फ्लॉवर मंचुरियन


साहित्य :-
१. फ्लॉवरची फुलं २ कप
२. बारीक चिरलेला कांदा
३. टोमॅटो केचअप ४ चमचे
४. चिली सॉस अर्धा चमचा
५. सोय सॉस २ ते ३ चमचे
६. मैदा पाव कप
७. काळी मिरी पावडर १ चमचा
८. कांद्याची पात अर्धा कप
९. तळणीसाठी तेल
१०. चवीनुसार मीठ
११. २ चमचे लसूण पाकळ्या चिरलेल्या
१२. कॉर्नफ्लॉवर १ चमचा

कृती :-
प्रथम एका पातेल्यामध्ये मैदा घेऊन त्यात मिरी पावडर, चवीनुसार मीठ व पाणी घालावे. गुठळ्या होणार नाहीत अशी काळजी घेऊन भज्याच्या पीठाइतपत पातळ पीठ भिजवावे. फ्लॉवरची फुलं या पिठामध्ये घोळवून तेलात गोल्डन होईपर्यंत तळून घ्यावे. ही फुलं बाजूला पेपर टॉवेलवर काढावीत. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात लसूण घालावं. मिनिटभर परतावे. त्यात कांदा घालून तो मऊ झाला की मग टोमॅटो केचअप, चिली सॉस व सोय सॉस घालावं. थोडसं परतावं. कॉर्नफ्लॉवर पाण्यात घोळवून या सॉसमध्ये घालावे. फावा असल्यास थोडं पाणी घालावं. फ्लॉवरची तळलेली फुलं घालावीत.छान मिक्स करावे. जर जास्त तिखट हवं असेल तर कांदा घातला की हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. कांद्याची पात घालून भाजी serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे

१४ ऑक्टोबर, २०११

व्हेज कोल्हापुरी


साहित्य :-
१. सुकं खोबरं ६ मोठे चमचे
२. पांढरे तीळ ३ चमचे
३. ४ ते ५ लवंगा
४. ४ ते ५ मिरी
५. छोटा दालचिनीचा तुकडा
६. ७ ते ८ काजू
७. १/२ कप बारीक चिरलेला कांदा
८. १/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
९. १ कप चिरलेला बटाटा
१०. १/२ कप चिरलेलं गाजर
११. १/२ कप चिरलेलं फ्लॉवर
१२. पाव कप बारीक चिरलेली सिमला मिरची
१३. १/२ कप चिरलेला पनीर
१४. १/२ कप मटार
१५. १ चमचा तिखट
१६. धणे जिरे पूड प्रत्येकी १ चमचा
१७. १ चमचा गरम मसाला
१८. फोडणीसाठी तेल व जीरं
१९. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी १ चमचा
२०. चवीनुसार मीठ
२१. ३ चमचे बटर.

कृती :-
प्रथम एका पॅन मध्ये सुकं खोबरं, तीळ, लवंगा, मिरी व दालचिनी हा मसाला कोरडाच brown होईपर्यंत भाजून घ्यावा. हा मसाला गार झाला की काजू घालून मिक्सरमधून वाटून घ्यावा. वाटताना थोडं पाणी घालत घालत छान मऊ पेस्ट करून घ्यावी. सगळ्या भाज्या व पनीर चौकोनी चिरून घ्यावे. एका कढईमध्ये तेल गरम करावं व त्यात जीरं घालावं. जीरं तडतडल की त्यात कांदा घालावं. कांदा छान brown करून घ्यावा. मग त्यात आलं लसूण पेस्ट घालून मिनिटभर परतावं. आलं लसणाचा कच्चा वास गेला की त्यात टोमॅटो घालवा. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतावं. मग त्यात धणे जिरे पूड घालावी. थोडावेळ परतून मग त्यात वरील मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट घालावी. तिखट घालावं. रंगासाठी पॅप्रिका घालावं. अगदी तेल सुटेपर्यंत छान परतावं. आता हळू हळू एक एक भाज्या घालाव्यात. प्रथम बटाटा घालवा व थोडं पाणी घालून झाकण लावून बटाटा ५ मिनिटं शिजवावा. मग गाजर, फ्लॉवर, सिमला मिरची व मटार घालून परत थोडं पाणी घालावं. चवीनुसार मीठ व गरम मसाला घालून झाकण लावून भाजी शिजू द्यावी. १० मिनिटांनी झाकण काढून भाजी छान ढवळावी व त्यात पनीर घालावे. छान मिक्स करावी. ग्रेव्ही जशी हवी असेल त्यानुसार भाजीमध्ये पाणी घालावे. सर्व भाज्या छान मऊ शिजल्या की थोडे बटर घालावे. ते विरघळल्यावर छान कोथिंबीर घालून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- ३ ते ४ माणसे.

११ ऑक्टोबर, २०११

मसाला दूध



साहित्य :-
१. ३ कप दूध
२. अर्धा कप साखर
३. कापलेले पिस्ते, बदाम प्रत्येकी अर्धा चमचा
४. अर्धा चमचा चारोळी
५. केशर व वेलची पूड चिमूटभर

कृती :-
प्रथम एका पातेल्यामध्ये दूध आटवत ठेवावे. ३ कप दुधाचे साधारण २ कप दूध झाले की त्यात साखर घालून थोडावेळ परत उकळावे. वेलची पूड, बदाम, पिस्ते, चारोळी व केशर घालून आच बंद करावी. कोजागिरी पोर्णिमेला असे मसाला दूध पिण्याची पद्धत आहे.

वाढणी :- ३ ते ४ माणसे.

१० ऑक्टोबर, २०११

दालफ्राय




साहित्य :-
१. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
२. पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो
३. २ सुक्या लाल मिरच्या
४. ७ ते ८ कढीपत्त्याची पानं
५. किसलेलं आलं लसूण प्रत्येकी अर्धा चमचा
६. फोडणीसाठी तेल आणि जीरं
७. पाव चमचा हळद
८. १ कप मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ
९. चवीपुरतं मीठ

कृती :-
एका कुकरमध्ये तेल तापवून घ्यावं. त्यात जीरं, कढीपत्ता व लाल मिरच्या घालून फोडणी करावी. थोडी हळद घालून मग कांदा घालावा. किसलेलं आलं व लसूण घालून परतून घ्यावं. कांदा थोडा मऊसर झाला की त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटो मऊ शिजला की त्यात मुगाची/तुरीची डाळ घालावी. डाळ न शिजवताच घालावी. थोडी परतून घ्यावी व डाळीच्या दीडपट पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या करून घ्याव्यात. कुकरच झाकण पडलं की एका बाउलमध्ये डाळ काढून कोथिंबीर घालून गरम गरम serve करावी. साधा भात, जीरा राइस सोबत ही दालफ्राय फार छान लागते.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

३० सप्टेंबर, २०११

उप्पीट


साहित्य :-
१. कप रवा
२. २ कप कोमट पाणी
३. २ हिरव्या मिरच्या
४. पाव कप बारीक चिरलेला कांदा
५. २ ते ३ चमचे दाणे
६. ७ ते ८ कढीपत्त्याची पानं
७. अर्धा चमचा आलं
८. कोथिंबीर, खोबरं व फरसाण
९. फोडणीच साहित्य
१०. १ चमचा उडदाची डाळ
११. चवीपुरतं मीठ
१२. १/२ चमचा लिंबाचा रस

कृती :-
प्रथम रवा मध्यम आचेवर थोडा भाजून घ्यावा. भाजलेला रवा एका ताटात काढून घ्यावा. कढईमध्ये थोडा तेल तापवून घ्यावं. त्यात मोहरी, मिरच्या मधोमध उभ्या चिरून, थोडा आलं किसून घालावं. कढीपत्ते घालावेत. थोडी उडदाची डाळ घालावी. ती तांबूस झाली की शेंगदाणे घालावेत. ते पण परतले गेले की कांदा घालावा. कांदा मऊ झाला की त्यात भाजलेला रवा घालावा. रवा थोडासा परत परतून घ्यावा. मग त्यात कोमट पाणी घालावं. लगेचच मीठ व लिंबाचा रस घालून छान ढवळाव व झाकण लाऊन उप्पीट शिजवून घ्यावं. जर तुम्हाला फडफडीत उप्पीट आवडत असेल तर कमी पाणी घालावं किंवा अगदी मऊसर उप्पीट आवडत असेल तर जास्त पाणी घालावं. छान गरम गरम उप्पीट खोबरं, कोथिंबीर व फरसाण घालून serve करावं.
आवडत असल्यास उडदाच्या डाळीबरोबर थोडे काजू घालून ते परतावेत.

वाढणी :- २ ते ३ माणसे

२० सप्टेंबर, २०११

टोमॅटो राईस


साहित्य :-
१. २ कप शिजलेला भात
२. पाव कप बारीक चिरलेला कांदा
३. ३ ते ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
४. २ सुक्या लाल मिरच्या
५. २ हिरव्या मिरच्या
६. ७ ते ८ कढीपत्त्याची पानं
७. २ चमचे उडदाची डाळ
८. १ चमचा हरभरा डाळ
९. ३ ते ४ चमचे शेंगदाणे
१०. जीरं व मोहरी
११. चवीनुसार मीठ
१२. थोडीशी हळद

कृती :-
प्रथम एका कढईमध्ये तेल तापवावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी व जीरं घालावं. दोन्हीही तडतडले की मग त्यात कढीपत्ता व लाल मिरच्या घालाव्यात. नंतर हरभऱ्याची डाळ घालून छान परतून घ्यावी. उडदाची डाळ घालावी व शेंगदाणे घालावेत. सर्व गोष्टी छान परतल्या, डाळींचे रंग बदलले की त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा मऊ होईपर्यंत परतावे. मग हिरव्या मिरच्या चिरून घालाव्यात. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. थोडंसं मीठ घालावं. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू द्यावे. थोडीशी हळद घालावी. मग यात शिजलेला मोकळा भात घालावा. चवीनुसार मीठ घालावे व सर्व जिन्नस छान एकजीव करावेत. कोथिंबीर घालून हा भात गरम गरम serve करावा.

टीप :- भात शिजवतानाच मीठ घातले तर एकजीव करणे अजूनच सोपे होईल.
वाढणी :- ३ ते ४ माणसे.

१५ सप्टेंबर, २०११

उपवासाची कचोरी


साहित्य :-
१. २ ते ३ माध्यम आकाराचे बटाटे
२. ४ मिरच्या
३. १ चमचा आलं
४. २ चमचे जीरं
५. १ कप किसलेलं खोबरं
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा कप कोथिंबीर
८. २ ते ३ चमचे कोर्नफ्लोर
९. तळणीसाठी तेल
१०. चिमूटभर साखर

कृती:-
बटाटे उकडून सोलावेत व हाताने कुस्करून घ्यावेत. त्यात कोर्नफ्लोर घालावे. २ मिरच्या व थोडं आलं वाटून घ्यावं व बटाट्यामध्ये घालावं. मीठ घालून हे सर्व पदार्थ छान एकत्र करून गोळा बनवून घ्यावा. उरलेल्या मिरच्या, आलं व जिरे वाटून घेऊन किसलेल्या खोबऱ्यामध्ये घालावे. मीठ व थोडीशी साखर घालून सर्व एकत्र करावं. आता बटाट्याच्या गोळ्यामधला थोडा गोळा घेऊन त्याला मध्ये खळगा करावा व त्यात खोबऱ्याच सारण भराव आणि कचोरी बंद करावी. जर आवडत असेल तर सारण भरल्यावर त्यात एखादा बेदाणा घालावा. सर्व कचोऱ्या अशा तयार करून घ्याव्यात. तेल मध्यम आचेवर तापवून घ्यावं. कचोरी तेलात पूर्ण बुडेल एवढं तेल कढईमध्ये घ्यावं. एकदा तेलात कचोरी घातली की जास्त हलवू नये. झाऱ्यावर कचोरी ठेवून मग तेलात सोडावी म्हणजे तिचा आकार बदलणार नाही. कोर्नफ्लोरमुळे कचोरी तळली जायला थोडा जास्त वेळ लागेल. छान सोनेरी रंगावर सर्व कचोऱ्या तळून घ्याव्यात व गरम गरम serve कराव्यात.

वाढणी :- या साहित्यात साधारणपणे १० ते १२ कचोऱ्या होतील.