२२ जुलै, २०११

इडली


इडलीसाठी साहित्य :-
१. २ कप इडलीचा तांदूळ किंवा इडली रवा
२. १ कप उडदाची डाळ
३. अर्धा कप जाड पोहे

कृती :-
इडलीचा तांदूळ किंवा रवा आणि उडदाची डाळ वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये भिजवावी. साधारण ७ ते ८ तास या दोन्ही गोष्टी भिजणं गरजेचं आहे. तांदूळ व डाळ भिजवताना पाणी थोडं जास्तच ठेवावं. ८ तासांनंतर अर्धा कप जाड पोहे घेवून ते पाण्यात भिजवावेत. जाड पोह्यामुळे इडली हलकी व्हायला मदत होते. १० ते १५ मिनिटांनी सर्व जिन्नस मिक्सरमधून वाटावेत. मिक्सरमधून वाटताना तांदूळ व डाळ यातील पाणी वेगळं काढावं व अगदी वाटताना लागेल तेवढंच पाणी घालावं. मिक्सरमधून काढलेलं पीठ एका मोठ्या पातेल्यात ठेवावं. नीट ढवळून घ्यावं. पातेल्यामध्ये पीठ फुगायला थोडी जागा असेल एवढं मोठं पातेलं घ्यावं. हे पीठ थोडं दाट असावं. मिक्सरमधून पीठ काढून एकत्रं केलं की त्यात मीठ घालावं व पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवावं. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी फर्मेंट करायला ठेवलेलं पीठ ७ ते ८ तासात तयार होतं. इडलीच पीठ सर्वसाधारणपणे दुप्पट होतं. पण थंडीच्या दिवसात मात्र पीठ फर्मेंट व्हायला १२ ते १५ तास लागू शकतात. पीठ फर्मेंट झालं की लगेचच इडली करायला घ्यावी. पीठ जास्त ढवळू नये. इडली करण्यासाठी इडली पात्रात किंवा कुकरमध्ये एक पेर बुडेल एवढं पाणी घ्यावं व इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून तो साचा भरेल एवढं पीठ त्यात घालावं. सर्व साच्यात पीठ भरलं की ते इडली पात्रात ठेवावे व १० मिनिटे उकडावे. जर कुकरमध्ये साचा ठेवत असाल तर कुकरची शिट्टी आठवणीने काढून ठेवावी. चमच्याने किंवा सुरीने इडल्या उचलून घ्याव्यात.
सांबार व चटणी सोबत गरम गरम इडली serve करावी.

वाढणी :- ३ ते ४ माणसे.

१९ जुलै, २०११

पाणी पुरी


पुरीसाठीचे साहित्य :-
१. ३/४ कप रवा
२. १/४ कप मैदा
३. जवळपास अर्धा कप पाणी

कृती:-
वरील साहित्याचा पोळीच्या कणकेपेक्षा थोडा घट्ट गोळा भिजवावा. एक ओलसर कापड घेऊन हा गोळा त्याने झाकावा. साधारण १५ मिनिटांनी या गोळ्याचे समान भाग करून मोठी पोळी लाटावी. एका छोट्याशा वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्याव्यात. त्या देखील ओलसर कपड्यात झाकून ठेवाव्यात. सगळ्या पुऱ्या तयार झाल्या की गरम तेलामध्ये पुऱ्या तळाव्यात. पुऱ्या तळताना झाऱ्याने त्या तेलात खाली दाबाव्यात. म्हणजे पुऱ्या फुगायला मदत होईल.

अशाप्रकारे पुऱ्या तयार झाल्या की पाणीपुरीचे झणझणीत पाणी बनवावे.

पाणीपुरीचे पाणी
साहित्य :-
१. १ कप पुदिन्याची पानं
२. १ कप कोथिंबीर
३. २ ते ३ मिरच्या
४. ३ चमचे चिंचेचा कोळ
५. ३ चमचे लिंबू रस
६. १ चमचा जीरं पूड
७. १/४ चमचा काळी मिरी पावडर
८. १ चमचा काळं मीठ
९. १/४ चमचा सुंठ पूड
१०. १ चमचा मीठ
११. पाव चमचा हिंग

कृती :-
वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून काढावेत. ही पेस्ट गाळून घ्यावी. गाळलेल्या पाण्यात अजून ३ कप पाणी मिसळावे. मिठाचा अंदाज पुन्हा एकदा घ्यावा. पाणीपुरीचे पाणी तयार!!

पाणीपुरीमध्ये पुऱ्या व पाणी हे दोन महत्वाचे टप्पे आपण बघितले. याशिवाय अजूनही काही तयारी करावी लागते. पांढरे वाटाणे साधारण ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावेत. ज्या पाण्यात हे वाटाणे भिजवले आहेत त्या पाण्यासाहित कुकरमध्ये हळद व मीठ घालून हे वाटाणे उकडावेत. पाणीपुरी serve करताना पुरीला मधोमध भोक पडावे व त्यात उकडलेले पांढरे वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिंचेची गोड चटणी, बारीक शेव, कोथिंबीर व सर्वात शेवटी पाणीपुरीचे पाणी घालावे. इतर सर्व जिन्नस पुरीमध्ये घालून केवळ चिंचेची गोड चटणी आणि पाणीपुरीची चटणी वेगवेगळ्या वाट्यांमध्ये देऊनही पाणी पुरी serve करता येते.

चिंचेच्या गोड चटणीची कृती blog वर जरूर पहावी.
वाढणी :- ३ ते ४ माणसे.

चिंचेची गोड चटणी




साहित्य :-
१. २ चमचे चिंचेचा कोळ
२. २ कप कोमट पाणी
३. १/२ कप किसलेला गूळ
४. १ चमचा मीठ
५. १ चमचा गरम मसाला
६. १ चमचा तिखट
७. १ चमचा जीरं पूड
८. १ चमचा बडीशेप पावडर

कृती :-
२ कप कोमट पाण्यात २ चमचे चिंचेचा कोळ मिक्स करून घ्यावा.गूळ घालून पुन्हा एकजीव करावे. एका पातेल्यात हे मिश्रण घेवून शिजवत ठेवावे. उकळी आली की त्यात इतर सर्व जिन्नस घालावेत. मध्यम आचेवर हे मिश्रण उकळत ठेवावे. सतत ढवळावे. हे मिश्रण ज्या डावाने ढवळत आहात त्या डावाला हे मिश्रण चिकटू लागले की ही चटणी तयार झाली असे समजावे. सुरुवातीच्या पातळपणापेक्षा ही चटणी बरीच दाट होते.
ही चटणी भेळ, पाणीपुरी, सामोसा चाट, रगडा पॅटीस यासारख्या कुठल्याही चाट प्रकारात वापरता येते.

१३ जुलै, २०११

जीरा राईस


साहित्य :-
१. १ वाटी बासमती तांदूळ
२. ३ वाट्या पाणी
३. जीरं १ चमचा
४. कोथिंबीर
५. १ ते २ चमचे तेल.
६. चवीनुसार मीठ

कृती:-
प्रथम बासमती तांदूळ धुवून घ्यावा. जीरा राईस करण्यासाठी तसा कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरता येऊ शकतो. पण बासमतीचा स्वाद काही निराळाच येतो. हा भिजवलेला तांदूळ पाणी घालून शिजवत ठेवावा.चवीनुसार मीठ घालावे. प्रथम मोठ्या आचेवर तांदूळ शिजवावा. त्याला जो स्टार्च येईल तो वरचे वर काढून घ्यावा. भात पूर्ण शिजला की उरलेला पाणी गाळून घेऊन भात गार होऊ द्यावा. भात गार झाला की मग एका कढईमध्ये तेल तापवावे त्यात जीरं घालावं व शिजलेला भात घालून छान मिक्स करून घ्यावा. वरून कोथिंबीर पेरून गरम गरम serve करावं.

वाढणी :- २ ते ३ माणसे

नवरत्न कुर्मा



साहित्य :-
१. अर्धी वाटी श्रावण घेवडा
२. अर्धी वाटी गाजर
३. अर्धी वाटी बटाटा
४. अर्धी वाटी मटारचे दाणे
५. पाव वाटी सिमला मिरची
६. अर्धी वाटी पनीर
७ . मध्यम आकाराचा कांदा
८ . १ चमचा आलं
९ . १ चमचा लसूण
१० . ८ ते १० काजू
११ . अर्धा चमचा तिखट
१२ . अर्धा चमचा गरम मसाला
१३. पाव चमचा हळद
१४. पॅपरीका
१५. अर्धा कप heavy whipping cream
१६. पाव चमचा जीरं
१७. १ वाटी टोमॅटो प्युरे
१८. अननस, सफरचंद, द्राक्षं प्रत्येकी ३ ते ४ चमचे
१९. बेदाणे ३ ते ४ चमचे

कृती :- मसाला
प्रथम तेलावर चिरलेला कांदा, चिरलेला आलं, लसूण व काजू परतून घ्यावेत. हा मसाला मिक्सरमधून बारीक वाटावा. हा मसाला बनवून ठेवला तर फ्रीज मध्ये साधारण २ ते ३ आठवडे चांगला टिकतो व पनीर- मटर, मशरूम- मटर, कोफ्ता करीची करी बनवण्यासाठी वापरता येतो.

भाजीची कृती :-
सर्व भाज्या चौकोनी कापून घ्याव्यात. एका कढईमध्ये मध्यम आचेवर तेल तापवून घ्यावे. मग या तेलावर प्रथम भाज्या परतून घ्याव्या. कढईच्या मधोमध जागा करून पनीर चे चौकोनी तुकडे त्यात घालावेत व परतून घ्यावे. पनीर तळू नये. पनीर पहिले तळून घेतलं तर त्याचा मऊपणा जाऊन ते चिवट होतं. मग त्यात वरील मसाला घालावा. थोडावेळ परतून मग टोमॅटो प्युरे घालावी. थोडसं पाणी घालून भाजी थोडावेळ शिजवावी. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला, पॅपरीका व मीठ घालून भाजी सारखी करून घ्यावी. भाजी पूर्ण शिजली की मग त्यात अननस, सफरचंद व द्राक्षं घालावीत. बेदाणे घालून भाजी परत शिजू द्यावी. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालावे. सर्वात शेवटी whipping cream घालून भाजी अजून २ मिनिटं शिजवावी. ही भाजी पोळी सोबत किंवा जीरं राइस सोबत अतिशय छान लागते.

वाढणी :- २ ते ४ माणसे

८ जुलै, २०११

कणकेचे चविष्ट धिरडे




साहित्य :-
१. वाटीभर गव्हाची कणिक
२. २ ते ३ चमचे तांदुळाची पिठी
३. चिमूटभर हळद
४. अर्धा चमचा तिखट
५. अर्धा चमचा गोडा मसाला
६. अर्धा चमचा जीरं पूड
७. २ चमचे दही
८. चवीनुसार मीठ
९. कपभर पाणी
१०. आलं लसूण प्रत्येकी पाव चमचा (हे धिरड लहान मुलांसाठी बनवत असला तर आलं लसूण नाही घातलं तरी चालेल.)

कृती:-
प्रथम पाणी सोडून सर्व जिन्नस एकत्र करावेत. मग हळू हळू पाणी घालत गुठळ्या होणार नाहीत अशाप्रकारे सर्व एकत्र करावे. साधारणपणे डोशाच्या पिठासारखं दाट पीठ असावं. तवा मध्यम आचेवर तापवून लगेचच धिरडी घालायला सुरुवात करावी. ही धिरडी तव्यावर जास्त पसरवू नयेत. इतर धीरड्यासारखी ही धिरडी तव्यावरून उलटायला थोडी त्रासदायक ठरतात. पण ज्या लहान मुलांना नुकताच भात द्यायला सुरु केला असेल त्यांना चवीत बदल म्हणून ही धिरडी अतिशय चांगली आहेत.

वाढणी :- १ ते २ माणसे.

२८ जून, २०११

आंब्याचे आईसक्रीम


साहित्य :-
१. १६ oz whipped cream
२. १४ oz condensed milk
३. १२ oz evaporated milk
४. आंब्याचा पल्प ३० oz

कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करावं व गुधल्या न ठेवता मिक्स करावं. एका मोठ्या डब्यात भरून freezer मध्ये किमान ७ ते ८ तास ठेवावं. serve करताना आईसक्रीम च्या कप मध्ये किंवा कोन मध्ये द्यावा. आंब्याच्या ऐवजी तुम्हाला आवडतील ते flavors वापरून हे आईसक्रीम बनवता येते.हे आईस्क्रीम कुठल्याही flavors शिवाय नुसतं वेलची पूड आणि केशर घालून कुल्फी म्हणून देखील serve करता येईल.

दुधी मुग डाळ




साहित्य :-
१. छोटा दुधी भोपळा
२. १ वाटी मुग डाळ
३. २ लाल मिरच्या
४. अर्धा चमचा आलं
५. अर्धा चमचा लसूण
६. ४ ते ५ कढीपत्ते
७. अर्धा चमचा हळद
८. चवीपुरता मीठ
९. कोथिंबीर

कृती:-
दुधी भोपळ्याची सालं व मधल्या बिया काढून थोडेसे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. कुकरमध्ये तेलाची फोडणी करावी. त्यात मोहरी व जीरं घालावं. ते तडतडले की त्यात कढीपत्ते व लाल मिरच्या घालाव्यात. हळद घालावी. आलं लसूण घालून मिनिटभर परतावे. दुधीच्या फोडी घालाव्यात व मुगाची डाळ घालावी. २ ते ३ मिनिटं मध्यम आचेवर छान परतून घ्यावे. मग त्यात १ ते १ १/२ वाटी पाणी घालावे. चवीपुरते मीठ घालावे. व कुकरचे झाकण लावून भाजी १ ते २ शिट्ट्या होईपर्यंत परतावी. कुकरचे झाकण पडले की भाजी bowl मध्ये काढून वरून कोथिंबीर पसरून गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

२१ जून, २०११

मैद्याच्या कडक पुऱ्या


साहित्य :-
१. १/२ कप मैदा
२. चवीनुसार मीठ
३. १ चमचा ओवा
४. कणिक मळायला पाणी

कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी. थोडावेळ ती कणिक झाकून ठेवून मग त्याच्या पुऱ्या लाटायला घ्याव्यात. पुरी लाटली की त्याला सुरीने चिरा पाडाव्यात म्हणजे ती पुरी फुगणार नाही व कुरकुरीत होईल. त्या चिरा पाडलेल्या पुऱ्या तेलात तळून घ्याव्यात. या पुऱ्या प्रवासात नेण्यासाठी अतिशय उपयोगी होतात व साधारण ४ - ५ दिवस छान टिकतात.

वाढणी :- या साहित्याच्या साधारण १५ ते २० पुऱ्या होतील

८ जून, २०११

भटुरे


साहित्य :-
१. पाव कप कणिक
२. ३/४ कप मैदा
३. चवीनुसार मीठ
४. २ चमचे घट्ट दही
५. १ चमचा तेल
६. कणिक मळण्यासाठी कोमट पाणी
७. १ चमचा यीस्ट
८. तळणीसाठी तेल

कृती :-
कणिक, मैदा, मीठ, दही, १ चमचा तेल, १ चमचा यीस्ट या सर्व गोष्टी एकत्र कराव्यात. तेल आणि दही पिठामध्ये पूर्णपणे एकत्र झाले पाहिजे. मग त्यात हळू हळू कोमट पाणी घालून त्याची छान मऊसर कणिक मळून घ्यावी. थोडासा तेल हातावर घेऊन ही कणिक पुन्हा ४ ते ५ मिनिटे छान मळून घ्यावी. ओल्या कपड्यामध्ये ही कणिक झाकून उबदार जागी ठेवावी. १ तासाने कणकेचा हा गोळा यीस्टमुळे फुगलेला दिसेल. या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करावेत. गोळे करताना कुठेही त्याला घडी पडणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर भटुरा तेलात फुलणार नाही. हे छोटे गोळे लाटण्याने लाटावेत व गरम तेलात तळून घ्यावेत. मसालेदार छोले व गरम गरम भटुरे serve करावेत.
जर यीस्ट उपलब्ध नसेल तर मैदा व कणिक यासोबत १/२ चमचा बेकिंग सोडा आणि १/२ चमचा बेकिंग पावडर घालावी व बाकीची सर्व कृती वरीलप्रमाणेच करावी. पण यीस्ट असलेली कणिक १ तासानंतर जेवढी फुलून येईल तेवढी सोडा व बेकिंग पावडर घातलेली कणिक फुलणार नाही.

वाढणी :- २ ते ३ माणसे

७ जून, २०११

मोड आलेल्या मुगाची उसळ


साहित्य :-
१. मुग १ वाटी
२. ३ वाट्या पाणी
३. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
४. अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमाटो
५. अर्धा चमचा तिखट
६. धणे जिरे पूड प्रत्येकी १ चमचा
७. गोडा मसाला २ चमचे
८. अर्धा चमचा हळद
९. आलं लसूण किसून प्रत्येकी अर्धा चमचा
१०. फोडणीसाठी तेल
११. कढीपत्ता ७ ते ८ पानं
१२. मीठ चवीनुसार

कृती :-
प्रथम अख्खे मुग ३ पात पाण्यात भिजत घालावेत. रात्रभर मुग भिजले की सकाळी त्यातील पाणी निथळून हे मुग एका पातळ कपड्यात हलक्या हाताने बांधून ठेवावेत. खूप घट्ट बंधू नयेत. हे बांधलेले मुग एका पातेल्यात ठेवून वरून झाकावेत व उबदार जागी ठेवावेत. उन्हाळ्याच्या दिवसात कुठल्याही कडधान्याला मोड लवकर येतात. हिवाळ्यामध्ये मोड यायला साधारणपणे दीड दिवस लागतो. मुगाला मोड आले की अगदी जेवढे मुग तेवढेच पाणी घेऊन कुकर मध्ये शिजवून घ्यावेत. मुग शिजले की एका कढईमध्ये ३ ते ४ चमचे तेल घेऊन ते तापले की त्यात मोहरी, हिंग व कढीपत्ता घालावा. कढीपत्ता तडतडला की त्यात चिरलेला कांदा व आलं लसूण घालावे. कांदा मऊ होईपर्यंत परतावे. मग त्यात हळद, तिखट, धणे जिरे पूड, गोडा मसाला हे सर्व घालून मिनिटभर परतावे. मग चिरलेला टोमाटो घालावा. तो मऊ झाला की त्यात मोड आलेले शिजलेले मुग घालावेत. ही उसळ पातळ फावी असेल तर थोडे पाणी व चवीनुसार मीठ घालून छान उकळी आणावी. कोथिंबीर घालून छान सजवावी व पोळी किंवा भातासोबत ही उसळ गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

२४ मे, २०११

पालक मुग डाळ भाजी


साहित्य :-
१. ४ ते ५ वाट्या चिरलेला पालक
२. अर्धी वाटी मुग डाळ
३. पाव वाटी उडदाची डाळ
४. २ हिरव्या मिरच्या
५. अर्धा चमचा आलं
६. अर्धा चमचा लसूण
७. अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा
८. फोडणीसाठी तेल
९. ६ ते ७ कढीपत्त्याची पानं
१०. चवीपुरतं मीठ

कृती :-
एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यामध्ये पहिले थोडी उडदाची डाळ घालावी. डाळीचा रंग हलकासा बदलला की त्यात मुग डाळ घालावी. मुगाच्या डाळीचा रंग बदलला की त्यात मिरची, आलं व लसूण घालून मिनिटभर परतावे. उभा चिरलेला कांदा घालावा. तो मऊसर झाला की त्यात कढीपत्ता घालावा. हळद घालावी व चिरलेला पालक आणि मीठ घालावे. मिठाने पालकाला पाणी सुटते व त्याच पाण्यात पालक आणि डाळी शिजवाव्यात. ही गरम गरम भाजी पोळी किंवा फुलक्यासोबत फारच छान लागते.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

१७ मे, २०११

साबुदाणा वडा


साहित्य :-
१. साबुदाणा १ वाटी
२. दाण्याचे कूट अर्धी वाटी
३. १ मध्यम आकाराचा बटाटा
४. जीरं १ चमचा
५. मिरची १ चमचा
६. चिमूटभर सोडा
७. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
८. मीठ चवीनुसार
९. तळणीसाठी तेल

कृती :-
प्रथम साबुदाणा पाण्यात भिजवावा. जेवढा साबुदाणा त्याच्यापेक्षा रेषभर जास्त पाणी घालावे आणि हा साबुदाणा ५ ते ६ तास भिजवावा. बटाटा शिजवून घेऊन mash करून घ्यावा. भिजवलेला साबुदाणा, mash केलेला बटाटा, दाण्याचे कूट, जीरं, मीठ, सोडा, कोथिंबीर हे सर्व जिन्नस एकत्र करावेत. हाताला थोडे पाणी लावत लावत त्याचे वाडे करून घ्यावेत. तेल गरम करावे व वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत व दह्यासोबत गरम गरम serve करावेत. यामध्ये कुरकुरीत पणासाठी वारीचे तांदूळ घातले जातात. तुम्हाला आवडत असल्यास घालावेत. पण त्याशिवायदेखील हे वडे छान कुरकुरीत होतात आणि फुलतात.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

४ मे, २०११

मुगाच्या डाळीचे वडे



साहित्य :-
१. २ वाटी मुगाची डाळ
२. ४ ते ५ वाटी पाणी
३. २ हिरव्या मिरच्या
४. १ चमचा आलं
५. १ चमचा लसूण
६. चवीनुसार मीठ
७. १ चमचा जीरं
८. कोथिंबीर
९. तळण्यासाठी तेल

कृती :-
प्रथम मुगाची डाळ ७ ते ८ तास पाण्यामध्ये भिजवावी. त्यानंतर मुगाची डाळ कमीत कमी पाणी घालून मिक्सरमध्ये वाटावी. त्यात आलं, लसूण, मीठ, मिरच्या, जीरं हे सर्व घालून वाटावे. थोडेसे जाडसर वाटावे. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर या पिठात घालावी व तापलेल्या तेलामध्ये चमच्याने छोटे छोटे गोळे सोडावेत. छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत टाळावेत. व कुठल्याही चटणी सोबत गरम गरम serve करावेत.

वाढणी :- वरील साहित्यात १५ ते १८ वडे होतील.

स्पाँज केक


साहित्य :-
१. १ कप मैदा
२. अर्धा चमचा बेकिंग सोडा
३.१ कप पिठीसाखर
४. ६ अंडी
५. १ चमचा व्हॅनिला इसेन्स

कृती :-
प्रथम अंडी फोडावीत व पांढरा बलक व पिवळा बलक वेगळा करावा. पांढरा बलक व्हीप होईपर्यंत फेटावं. अर्थात त्या पांढऱ्या बालकाचे हलके क्रीम तयार झाले पाहिजे. पिवळे बलक वेगळे फेटून घ्यावे. त्यात पिठीसाखर व व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा फेटून घ्यावे. मैदा व बेकिंग सोडा चाळणीतून चाळून घ्यावा. फेटलेले पांढरे बलक व पिवळे बलक एकत्र करावं व त्यात मैदा घालावा. अगदी हळुवार हाताने एखाद्या चमच्याने सर्व मिश्रण एकत्र करावं. ओव्हन ३५०f ला preheat करून घ्यावा. केक चे मिश्रण एका baking tray मध्ये घालून ३० ते ४० मिनिटे ओव्हन मध्ये ठेवावे. ३० मिनिटांनी एखादी सुरी किंवा toothpick केक मध्ये घालून बघावी. जर त्याला केक चिकटला नाही तर केक तयार झाला असे समजावे. नाहीतर अजून ५ ते १० मिनिटे केक bake करावा.

केक तयार झाल्यावर तो गार झाला की मग त्यावर whipped cream ने आपल्याला आवडेल तशी सजावट करावी.

केक मध्ये जर अंड चालत नसेल तर तुम्ही फ्लेक्स सीडची पावडर करून वापरू शकता. १ अंड = १ चमचा फ्लेक्स सीड पावडर.