२८ सप्टेंबर, २०१२

छोले बिर्याणी


साहित्य :-
१. १ कप बासमती तांदूळ
२. अर्धा कप छोले / कबुली चणा 
३. २ ते ३ मोठे चमचे दही
४. अर्धा चमचा हळद
५. अर्धा चमचा तिखट
६. १ हिरवी मिरची 
७. १ कप बारीक चिरलेला टोमॅटो
८. खडा मसाला :- तमालपत्र, ३ ते ४ लवंगा, ३ ते ४ मिरी, १ इंच दालचिनी, ३ ते ४ वेलदोडे 
९. चवीनुसार मीठ 
१०. बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर प्रत्येकी अर्धा कप 
११. पाव वाटी दूध 
१२. ५ ते ६ केशराच्या काड्या
१३. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा
१४. वितळलेले तूप २ चमचे 

कृती:-
प्रथम बासमती तांदूळ ३ ते ४ पट पाणी व चवीनुसार मीठ  घालून शिजवावा. शिजवताना त्यात खड्या मसाल्याची पुरचुंडी करून घालावी. म्हणजे भाताला मसाल्याचा छान वास लागेल. हा भात शिजवताना मात्र एक काळजी घ्यावी आणि ती म्हणजे हा भात मोकळा शिजला पाहिजे. त्यामुळे भाताचा दाणा बघत राहावं. जेव्हा भात शिजला आहे असं वाटेल तेव्हाच तो गाळून घ्यावा व गार होऊ द्यावा. कबुली चणे आदल्या दिवशी भिजत घालावेत व बिर्याणी करायच्या आधी कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. मग एका कढईमध्ये तेल घालून त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. त्यात हळद, तिखट व हिरवी मिरची घालावी. टोमॅटो घालावेत व २ ते ३ चमचे पाणी घालून ते शिजू द्यावेत. टोमॅटो छान मऊ शिजले की त्यात दही घालावं व त्यात उकडलेले छोले घालावेत. चवीनुसार मीठ घालावे व दाटसर ग्रेव्ही तयार करावी. आता एक मायक्रोवेव्ह सेफ बाऊल घेऊन त्यात प्रथम वितळलेले तूप घालावे. त्यात मग भाताचा एक थर घालावा. वर पुदिना व कोथिंबीर घालावी. वरून चोल्याच्या ग्रेव्हीचा थर घालावा. परत भाताचा थर घालून पुदिना व कोथिंबीर घालावी. दूधामध्ये केशर घालून ते पण भातावर वरून घालावे. मायक्रोवेव्हमध्ये ५ मिनिटे झाकण घालून बिर्याणी शिजू द्यावी. मायक्रोवेव्ह नसेल तर असेच थर कढईमध्ये घालावेत व ही कढई आचेवर तवा ठेवून त्यावर ठेवावी. म्हणजे भात खालून लागणार नाही. ही बिर्याणी serve करताना डाव पूर्ण खालपर्यंत घालून सर्व थर उचलले जात आहेत न ते बघावे. एखाद्या रायत्यासोबत ही बिर्याणी गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

१५ सप्टेंबर, २०१२

तळणीचे मोदक


साहित्य :-
१. १ कप मैदा
२. २ ते ३ चमचे बारीक रवा
३. २ चमचे तुपाचे मोहन 
४. चिमुटभर मीठ
५. दीड कप किसलेला सुकं खोबरं 
६. पाऊण वाटी साखर
७. २ चमचे खसखस 
८. ५ ते ६ बदाम
९. ४ ते ५ काजू
१०. १ चमचा वेलची पूड
११. चिमुटभर केशर
१२. वाटीभर कोमट दूध
१३. तळणीसाठी तेल 


कृती :-
प्रथम मैदा, रवा, चिमुटभर मीठ हे सर्व एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घालावे. हे तूप सर्व मैद्यामध्ये अगदी छान एकजीव करून घ्यावे. नंतर दुधामध्ये पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी व झाकून ठेवावी. सुकं खोबरं व खसखस २ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यावी. ही भाजलेली खसखस व खोबरं, साखर, बदाम, काजू व वेलची पूड सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. या बारीक झालेल्या खिरापतीमध्ये केशर घालावं. हे आपलं सारण तयार झालं. आता भिजवलेली कणिक खलबत्त्याने कुटून थोडी मऊ करून घ्यावी. मग त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्यात सारण भाराव. सर्व बाजूने लाटी एकत्र करायला सुरुवात करावी. सर्व लाटी नीट एकत्र आली की वर मोदकाचे तोंड दाबून बंद करावे. हा तयार मोदक ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावा. सर्व मोदक तयार झाले की ते गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. हे तयार मोदक गणपतीच्या प्रसादासाठी वापरले जातात व ते ४ ते ५ दिवस टिकतात. 

वाढणी :- या साहित्यात ११ ते १२ मोदक होतील. 

खिरापत


साहित्य :-
१. दीड कप किसलेला सुकं खोबरं 
२. पाऊण वाटी साखर
३. २ चमचे खसखस 
४. ५ ते ६ बदाम
५. ४ ते ५ काजू
६. १ चमचा वेलची पूड
७. चिमुटभर केशर
८. २ चमचे खवा 

कृती :-
सुकं खोबरं व खसखस २ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यावी. ही भाजलेली खसखस व खोबरं, साखर, बदाम, काजू व वेलची पूड सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. या बारीक झालेल्या खिरापतीमध्ये केशर घालावं. खिरापत serve करताना  थोडासा खवा भाजून त्यात घालावा. 

वाढणी :- १ छोटी वाटी प्रसाद या साहित्यात होईल. 

७ सप्टेंबर, २०१२

आलू टिक्की


साहित्य :-
१. ३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे
२. २ ते ३ हिरव्या मिरच्या
३. ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या
४. पेरभर आल्याचा तुकडा
५. बारीक चिरलेली कोथिंबीर
६. २ चमचे कोर्नफ्लोर 
७. चवीनुसार मीठ

कृती:-
बटाटे उकडून सालं काढून किसून घ्यावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, लसूण व आलं घालावं. या तिन्हीही गोष्टी मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. त्यात कोर्नफ्लोर, कोथिंबीर व मीठ घालून छान गोळा मळून घ्यावा. हाताला तेल लावून या गोळ्याचे गोलाकार छोटे चपटे गोळे बनवावेत. किंवा तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या टिक्की बनवाव्या. एका पॅन मध्ये थोडं थोडं तेल घालून या टिक्की shallow fry करून घ्याव्यात. सॉस किंवा चटणीसोबत  गरम गरम serve कराव्यात.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

४ सप्टेंबर, २०१२

लसूण चटणी


साहित्य :-
१. ५ ते ६ लसणाच्या मोठ्या पाकळ्या 
२. ४ ते ५ चमचे किसलेला सुकं खोबरं 
३. २ ते ३ चमचे पांढरे तीळ
४. १ चमचा देघी मिरची पावडर
५. चवीनुसार मीठ
६. १ चमचा तेल

कृती :-
एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यात सुकं खोबरं, तीळ व लसूण भाजून घ्यावा. भाजलेल्या गोष्टी गार झाल्या की मिक्सरमध्ये मीठ व तिखट घालून बारीक करून घ्याव्यात. ही लसूण चटणी ७ ते ८ दिवस छान राहते. 


लादीपाव


साहित्य :-
१. दीड कप सेल्फ रायझिंग फ्लोअर किंवा मैदा 
२. १ चमचा यीस्ट 
३. पाव चमचा साखर
४. १ कप कोमट पाणी 
५. १ चमचा बटर

कृती :-
प्रथम एका काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात सेल्फ रायझिंग फ्लोअर किंवा मैदा घ्यावा. जर तुम्ही मैदा वापरणार असाल तर त्यात अर्चा चमचा मीठ घालावं. पण सेल्फ रायझिंग फ्लोअरला मीठ घालायची गरज नाही. एका छोट्या वाटीमध्ये यीस्ट घेऊन त्यात साखर घालावी. कोमट पाण्यातील थोडं पाणी घालून यीस्ट active होण्यासाठी १० मिनिटे ठेवावे. पिठात हे यीस्ट घालून लागेल तेवढ्या पाण्यात पुरणाच्या पोळीसारखी पातळ कणिक मळावी. बटर लावून ही कणिक ५ ते ७ मिनिटे मळावी. हा daugh हाताला चिकटणार नाही अशा स्टेजला येईपर्यंत मळावा. मग काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेऊन वरून झाकावा. १ तास हा daugh ferment होऊ द्यावा. बकिंग ट्रेला तूप व मैदा लावून घ्यावा. ferment झालेल्या कणकेला हाताने बुक्क्या मारून त्यातील हवा काढावी व गोळा पुन्हा मळून घ्यावा. हाताला थोडे पीठ लावून या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून ते ट्रे मध्ये एकमेकाला थोडेसे चिकटतील असे ठेवावे. पुन्हा झाकून हे गोळे अर्धा तास ferment होऊ द्यावेत. तोवर ओव्हन ३५०f ला preheat करून घ्यावा. अर्ध्या तासाने ह्या गोळ्यांना वरून दुधाचा हात लावून बेक करायला ठेवावे. ३० मिनिटे बेक झाल्यावर बाहेर काढून लगेचच या पावला बटर लावावे. त्यामुळे पाव मऊ राहतो. हा पाव एका जाळीवर थंड होण्यासाठी ठेवावा. थंड झाला की एकमेकांपासून अलग करून मधोमध कापावा. वडा पाव, पाव भाजी किंवा अच्छी दाबेली सारख्या पदार्थांमध्ये हा पाव वापरता येऊ शकतो. तुमच्या ओव्हन नसेल तर convection microwave मध्ये १८०c  वर तुम्ही हा पाव बेक करू शकता. 

वाढणी :- या साहित्यात ५ ते ६ पाव होतील. 

वडा बनवण्याची कृती या पत्त्यावर पहावी :- http://migruhini.blogspot.com/2012/04/blog-post_30.html

२१ ऑगस्ट, २०१२

दुधी हलवा


साहित्य :-
१. २ कप किसलेला दुधी
२. १ कप दूध
३. पाव कप खवा
४. १ कप साखर
५. अर्धा चमचा वेलची पूड
६. चिमूटभर केशर
७. काजू व बेदाणे प्रत्येकी  ३ चमचे
८. ४ ते ५ चमचे तूप

कृती :-
प्रथम दुध्या किसून घ्यावा. किसायाच्या आधी त्यातल्या बिया काढून टाकाव्यात. एका कढईमध्ये तूप घाव. त्यात काजू व बेदाणे घालावेत. काजू सोनेरी झाले व बेदाणे फुगले की त्यात किसलेला दुधी घालावा. मध्यम आचेवर झाकण ठेवून १० मिनिटे दुघी शिजवावा. मध्ये मध्ये झाकण काढून ढवळून घ्यावे. मग त्यात दूध घालावे व दुधी पूर्ण दूध आटेपर्यंत शिजवावा. मग त्यात साखर घालावी. साखर घातल्याने हलवा पुन्हा पातळ होऊ लागेल. अजून ५ मिनिटे सतत ढवळत दुधी शिजला की तो थोडा घट्ट होऊ लागेल. मग त्यात खव्याचा चुरा घालावा. वेलची पूड व केशर घालून छान मिक्स करून घ्यावे. हलवा गार किंवा गरम कसाही serve करावा. दूध व खवा या दोन्ही गोष्टींमुळे हलवा अतिशय रीच होईल.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

६ ऑगस्ट, २०१२

पालकवाली दाल


साहित्य :-
१. १ कप बारीक चिरलेला पालक
२. १ कप शिजवलेली मुगाची डाळ
३. १/२ कप बारीक चिरलेला कांदा
४. बारीक चिरलेला छोटा टोमॅटो
५. अर्धा चमचा हळद
६. २ सुक्या लाल मिरच्या 
७. फोडणीसाठी तेल व जीरं 
८. ४ ते ५ कढीपत्त्याची पानं 
९. चवीनुसार मीठ

कृती:-
प्रथम एका कढईमध्ये तेल तापवून त्यात जीरं घालावं.  जीरं थोडं तडतडल की त्यात कढीपत्ता, हळद, सुक्या लाल मिरच्या  व बारीक केलेला कांदा घालावा. कांदा मऊ झाला की मग त्यात टोमॅटो घालून तो मिळून येईपर्यंत शिजवावे. मग त्यात पालकाची धुवून चिरलेली पाने घालावीत. ५ ते ७ मिनिटे ही पाने शिजू द्यावी. मग शिजवलेली मुगाची डाळ घालावी. चवीनुसार मीठ घालून ही पालकवाली दाल ५ मिनिटे अजून शिजवावी. भाताबरोबर गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे  

५ ऑगस्ट, २०१२

भडंग


साहित्य :-
१. ३ ते ४ कप चुरमुरे 
२. ३ ते ४ चमचे शेंगदाणे 
३. ७ ते ८ कढीपत्त्याची पाने
४. अर्धा चमचा तिखट
५. चिमूटभर हिंग
६. पाव चमचा हळद
७. अर्चा चमचा गोडा मसाला किंवा भडंग मसाला
८. चवीनुसार मीठ
९. फोडणीसाठी तेल

कृती:-
एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यात मोहरी घालून ती तडतडली की मग कढीपत्ता व शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे नीट परतले की त्यात हळद, तिखट, हिंग व गोडा मसाला घालून परतावे. लगेचच चुरमुरे घालावेत. चुरमुर्यामध्ये मीठ असेल तर त्याचा अंदाज घेऊन मगच मीठ घालावे. छान मिक्स करून घ्यावे. भडंग तयार झाल्यावर serve करताना त्यात कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून द्यावे. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

२० जुलै, २०१२

कांद्याची गोल भजी


साहित्य :-
१. १ कांदा बारीक चिरलेला
२. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
३. १ कप बेसन
४. अर्धा चमचा तिखट
५. पाव चमचा हळद 
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा कप पाणी 
८. चिमूटभर खायचा सोडा
९. बारीक चिरलेली कोथिंबीर 
१०. तळणीसाठी तेल

कृती:-
एका भांड्यामध्ये बेसन घ्यावं. त्यात तिखट, हळद, हिरवी मिरची, खायचा सोडा, कोथिंबीर या सर्व गोष्टी घालाव्यात. एकदा मिक्स करून मग हळू हळू पाणी घालत बॅटर तयार करावं. हे बॅटर पातळ असू नये थोडं घट्ट असावं. त्यातच बारीक चिरलेला कांदा घालावा. तेल तापवून घेऊन हाताने कांद्यासहित  थोडं थोडं बॅटर तेलात घालावं. हाताने घालायचा नसेल तर चमच्याने देखील ही भजी घालता येतील. तेलामध्ये ही भजी छान सोनेरी रंगावर तळून घ्यावीत. ऐन पावसाच्या दिवसात गरम गरम चहासोबत अशी गरम गरम भजी serve करावीत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

१८ जुलै, २०१२

लेमन राईस


साहित्य :-
१. २ कप शिजवलेला भात
२. ४ ते ५ चमचे लिंबाचा रस
३. २ ते ३ चमचे शेंगदाणे 
४. २ चमचे हरभऱ्याची डाळ 
५. ४ ते ५ कढीपत्त्याची पानं
६. १ हिरवी मिरची 
७. अर्धा चमचा हळद 
८. २ ते ३ सुक्या लाल मिरच्या 
९.  सजावटीसाठी कोथिंबीर
१०. चवीनुसार मीठ 

कृती :-
प्रथम भात शिजवून घ्यावा. भात शिजवतानाच त्यात चवीनुसार मीठ घालावे. हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजवून ठेवावी.  भात शिजला की एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यात मोहरीची फोडणी करावी. कढीपत्त्याची पानं घालावीत. हिरवी मिरची व लाल मिरची घालून परतून घ्यावे.  हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे घालावेत. हळद घालावी. त्यात लगेचच शिजलेला भात घालून छान मिक्स करून घ्यावे. भातामध्ये लिंबाचा रस घालावा व पुन्हा भात मिक्स करून घ्यावा. कोथिंबीर घालून हा भात गरम गरम serve करावा. बाहेर ट्रीपला नेण्यासाठी देखील हा भात सोपा व टिकाऊ आहे. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

७ जुलै, २०१२

चिकन बिर्याणी




साहित्य :-
१. २ कप भिजवलेले बासमती तांदूळ
२. ४ ते ५ चिकन थाईज
३. ४ ते ५ मोठे चमचे दही
४. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी १ चमचा
५. हिरवी मिरची १ किंवा २ 
६. लाल तिखट पावडर १ ते २ चमचे 
७. वेलची पूड २ चमचे
८. तळलेला कांदा १ कप
९. बारीक चिरलेला पुदिना १/२  कप
१०. बारीक चिरलेली कोथिंबीर १ कप 
११. हळद अर्धा चमचा 
१२. पातळ तूप अर्धी वाटी
१३. गरम मसाला पावडर २ चमचे
१४. लिंबाचा रस २ चमचे 
१५. मसाला वेलची १
१६. काळी मिरी ४ ते ५ 
१७. लवंगा ४ ते ५
१८. शाही जीरं 
१९. दालचिनी पेरभर 
२०. तमालपत्र मध्यम आकाराची २
२१. चवीनुसार मीठ 

कृती :-
प्रथम एका कढईमध्ये ५ कप पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळायला लागले की त्यात २ छोटे चमचे मीठ घालावे. मग तमालपत्र, मिरी, लवंग, दालचिनी, मसाला वेलची व शाही जीरं हे सर्व मसाले एका कपड्यात बांधून त्याची पुरचुंडी या पाण्यात सोडावी. अर्धा तास भिजलेले तांदूळ या पाण्यात घालून भात शिजू द्यावा. हा भात पूर्ण शिजवू नये. ३/४ भात शिजला की तो गाळून घ्यावा. मसाल्याची  पुरचुंडी काढून टाकावी. एकीकडे भात शिजेपर्यंत ज्या कढईमध्ये बिर्याणी करायची आहे त्यात चिकन मॅरीनेट करावं. यासाठी सरळ बुडाच पातेलं वापरावं. त्यामध्ये दही, हळद, तळलेल्या कांद्यामाधला अर्धा कांदा, तिखट, वेलची पूड मधली अर्धी पूड, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, अर्धा पुदिना व अर्धी कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक तुकडे करून, गरम मसाला १ चमचा व पातळ तुपातले ४ ते ५ चमचे तूप व चवीनुसार मीठ या सर्व गोष्टी एकत्र कराव्यात. हे मीठ केवळ या मासाल्यापुरते घालावे. भात आपण मीठ घालूनच शिजवत आहोत. हा मसाला तयार झाला की चिकन धुवून स्वच्छ करून थोडे मोठे तुकडे करून या मसाल्यात घालावे. चिकन बोन्ससहित असावे तसेच  थोडे बोनलेस तुकडे पण असावेत. हे  मॅरीनेट केलेलं चिकन किमान अर्धा तास ठेवावं. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आता हे पातेलं मध्यम आचेवर ठेवावा. या चिकनवर ३/४ शिजलेल्या भातामधला अर्धा भात घालावा. त्यावर २ चमचे तूप, थोडी वेलची पूड, गरम मसाला, पुदिना व कोथिंबीर व थोडा तळलेला कांदा हे सर्व घालावे. उरलेला भात घालून पुन्हा त्यावर राहिलेले तूप, राहिलेली वेलची पूड, राहिलेला सर्व तळलेला कांदा, गरम मसाला, पुदिना व कोथिंबीर घालावी. थोडे पाणी शिंपडून आच वाढवून पातेल्याला घट्ट झाकण लावावे. झाकणातून खूप  वाफ बाहेर यायला लागली की आच मध्यामाहून कमी करावी. या कमी आचेवर बिर्याणी २० मिनिटे शिजू द्यावी. चिकनला थोडा भाजल्याचा खुसखुशीतपणा येईल पण  आच कमी केली नाही तर चिकन खालून जळेल. तसे होऊ देऊ नये. २० मिनिटांनी झाकण उघडून हळुवार हाताने भात व चिकन एकत्र करावे व रायत्या सोबत ही गरम गरम बिर्याणी serve करावी. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

२७ जून, २०१२

मेक्सिकन राईस



साहित्य :-
१. भिजवलेले तांदूळ १ कप
२. लाल सिमला मिरची पाव कप
३. लाल  टोमॅटो पाव कप
४. ४ ते ५ सुक्या लाल मिरच्या 
५. किसलेलं गाजर पाव कप 
६. व्हेजिटेबल स्टॉक
७. बारीक चिरलेला कांदा
८. ऑलिव ऑईल 
९. चवीनुसार मीठ 
१०. ४ ते ५ लसूण पाकळ्या 

कृती :- 
प्रथम एका पॅनमध्ये ऑलिव ऑईल घेऊन त्यात लाल सिमला मिरचीचे मोठे तुकडे, टोमॅटोचे मोठे तुकडे, लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्या सर्व घालून परतत ठेवावे. हे सर्व पदार्थ करपल्यासारखे थोडे थोडे काळसर दिसेपर्यंत परतावेत. मग गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. एका कढईमध्ये ऑलिव ऑईल घेऊन त्यात कांदा घालावा. तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात भिजवलेले तांदूळ घालावेत. थोडावेळ परतून मग त्यात मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालावा.हा मसाला तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या चवीनुसार घालावा. बऱ्याचदा सगळा मसाला वापरण्याची गरज भासत नाही. हा उरलेला मसाला फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ७ ते ८ दिवस टिकतो.  व्हेजिटेबल स्टॉक मिळाला तर तो घालून भात शिजवावा नाहीतर साध्या पाण्यात भात शिजवला तरी चालतो. व्हेजिटेबल स्टॉक घालून भात शिजवताना मिठाची चव घेऊन लागेल तसे मीठ घालावे. स्टॉक घातल्यावर भात शिजायला जरा वेळ लागतो. भात थोडा शिजत आलं की त्यात किसलेलं गाजर घालून भात पूर्ण शिजवून घ्यावा. हा भात सोअर क्रीम व सलाड सोबत गरम गरम serve कारावा. 

वाढणी :- २ ते ३ माणसे. 

१९ जून, २०१२

आलू पराठा


साहित्य :-
१. २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे
२. पेरभर आलं
३. २ ते ३ लसूण पाकळ्या 
४. २ ते ३ मिरच्या 
५. अर्ध्या लिंबाचा रस
६. चवीनुसार मीठ 
७. बारीक चिरलेली कोथिंबीर 
८. २ कप पोळीची कणिक
९. कणकेच्या गोळ्याला लावण्यासाठी तेल 
१०. पराठे भाजण्यासाठी तूप किंवा बटर 

कृती:-
प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. बटाटे गार झाल्यावर ते हाताने मॅश करून घ्यावेत. आलं, लसूण व मिरची थोडंसं मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. हे मिश्रण बटाट्यामध्ये घालावे. त्यात चवीनुसार  मीठ, लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान गोळा मळून घ्यावा. पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी. थोडेसे तेल लावून ही कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. या पोळीच्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. तसेच बटाट्याच्या सारणाचेही गोळे करावेत. पोळीच्या कणकेचा एक गोळा घेऊन तो थोडासा लाटावा व त्यात बटाट्याच्या सारणाचा गोळा घालून सर्व बाजूनी बंद करून घ्यावे. हा गोळा पिठात घोळवून बंद बाजू खाली ठेवून हलक्या हाताने लाटावा. तवा मध्यम आचेवर तापवून घ्यावा व पराठा दोन्ही बाजूनी तूप किंवा बटर लावून भाजून घ्यावा. कोबीच्या कोशिंबिरीसोबत व लोणच्यासोबत आलू पराठा गरम गरम serve करावा.  

वाढणी :- २ ते ३ माणसे 

६ जून, २०१२

केळ्याची कोशिंबीर


साहित्य :-
१. २ पिकलेली केळी
२. १ ते दीड कप दही
३. चिमूटभर मीठ
४. ३ ते ४ चमचे साखर
५. १ मध्यम आकाराची हिरवी मिरची
६. कोथिंबीर

कृती:-
दोन्ही केळी सोलून कापून घ्यावी. त्यात दही, साखर, व मीठ घालावे. हिरवी मिरची बारीक चिरून घालावी व आवडत असल्यास कोथिंबीर घालावी. ही कोशिंबीर पोळीबरोबर छान लागते किंवा नुसती खायला पण छान वाटते. लहान मुलांना ही कोशिंबीर देताना मिरची न घालता दिली तरी चविष्ट लागते. उपवासाला देखील नुसती खायला ही कोशिंबीर चालते. 

वाढणी :- २ ते ३ माणसे.