१८ ऑक्टोबर, २०१२

काजू कतली


साहित्य :-
१. १ कप काजू 
२. ३/४ कप पिठीसाखर 
३. ३ ते ४ चमचे पाणी 
४. चिमुटभर केशर 
५. १ चमचा तूप 

कृती:-
काजूची मिक्सरमधून अगदी बारीक पूड करून घ्यावी. पिठीसाखर व काजूची पूड छान  मिक्स करून घ्यावं. एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तूप घालावं. तूप तापलं की त्यात हि पूड घालावी. अगदी मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे. थोडंसं तेल सुटायला लागलं की मध्ये आळ करून त्यात पाणी घालावं. त्या पाण्यात केशर घालावं. थोडं ढवळून सगळी काजूची पूड व केशराचे पाणी एकजीव करून घ्यावे. यानंतर अगदी २ ते ३ मिनिट परतावे. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की लगेच एका ताटामध्ये काढून चमच्याच्या मागच्या बाजूने थापून घ्यावे. मिश्रण गार झाले कि वरून त्याला चांदीचा वर्ख लावून हव्या  त्या आकारात कापावे.

वाढणी :- या साहित्यात १० ते १२ काजू कतली होतील.

१५ ऑक्टोबर, २०१२

साबुदाण्याची खिचडी


साहित्य :-
१. १ कप साबुदाणा 
२. पाव कप दाण्याचे कूट
३. २ ते ३ मिरच्या 
४. अर्धा चमचा जीरं 
५. २ ते ३ चमचे तूप 
६. अर्धा चमचा साखर 
७. चवीपुरतं  मीठ 
८. ओलं  खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी 

कृती:-
प्रथम साबुदाणा थोड्याश्या पाण्यामध्ये भिजवावा. साबुदाणा कमीत कमी ५ ते ६ तास भिजला पाहिजे. भिजलेला साबुदाणा हाताला अगदी मऊ लागतो. त्याला नख लावले तर लगेच तुटतो. पण तरीही प्रत्येक दाणा अगदी  वेगळा वेगळा दिसतो. अशाप्रकारे साबुदाणा तयार झाला कि मग एका कढईमध्ये तूप तापवून घ्यावं. त्यात जिरं घालावं व ते तडतडलं की मग त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. फोडणी झाली की लगेचच त्यात भिजलेला साबुदाणा घालावा. दाण्याचं कूट घालावं. मीठ व साखर घालून छान  मिक्स करून घ्यावं. जर खिचडी थोडी कोरडी वाटत असेल तर पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून एक वाफ आणावी. खोबरं व कोथिंबीर घालून सजवावी व गरम गरम serve करावी. आवडत असल्यास लिंबू  पिळून हि गरम गरम खिचडी खावी.

आवडत असल्यास या खिचडीमध्ये उकडलेला बटाटादेखील घालतात. 

केवळ उपसालाच नाही तर इतर वेळेलाही अशी खिचडी दुपारच्या खाण्यासाठी केली जाते. उपासाच्या दिवसाचा हा अविभाज्य पदार्थ आहे. 

वाढणी :- १ ते २ माणसे.

१२ ऑक्टोबर, २०१२

खवा पोळी


साहित्य :-
१. १ कप खवा
२. १ चमचा बेसन
३. अर्धा चमचा खसखस 
४. २ कप पिठीसाखर
५. ३ ते ४ चमचे साजूक तूप
६. वेलची पूड अर्धा चमचा
७. चिमुटभर केशर
८. १ ते दीड कप कणिक
९. कणिक मळायला पाणी

कृती :-
प्रथम पोळीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट कणिक मळून घ्यावी.  कणिक मळताना चिमुटभर मीठ घालावे. गोड पदार्थाला अस मीठ घातल्याने छान चव येते. मग कढईमध्ये २ चमचे तूप घालावे. ते गरम झाले की त्यात खवा परतावा. चं गुलाबी रंग आला खव्याला की तो एका वाडग्यात काढून घ्यावा. परत थोडं तूप घालून त्यावर बेसन भाजून घ्यावं. बेसन छान भाजलं गेलं की ते खव्यामध्ये घालावं. पुन्हा तूप घालून थोडी खसखस भाजून घ्यावी. ती देखील खव्यावर घालावी. या मिश्रणात पिठीसाखर, वेलची पूड व केशर घालावे. चमच्याने दुध घालत हा खवा छान मळून घ्यावा. साधारणपणे मुठीत खवा घट्ट दाबला तर त्याची मुठ तयार झाली पाहिजे इतपत हा खवा मळून घेतला की पोळ्या करायला घ्याव्यात. कणकेच्या २ लाट्या घ्याव्यात. छोट्या दोन पोळ्या लाटून त्यातील एका पोळीवर खव्याची मूड घालावी व वरून दुसरी पोळी ठेवून कडा घट्ट बंद करून घ्याव्यात. हलक्या हाताने पुन्हा पोळी लाटावी. हि पोळी लाटताना थोडी तांदळाची पिठी लावावी. म्हणजे पोळी सहजतेने लाटली जाईल. तवा मध्यम आचेवर तापवून हि पोळी द्नही बाजूनी खरपूस भाजून घ्यावी. पोळी भाजताना बऱ्याचदा खवा बाहेर येतो व फसफसल्यासारखा दिसतो. त्यामुळे तव्याच्या तापमानाकडे लक्ष द्यावे. तवा जास्त तापला तर पोळी तव्यावर फुटू शकते. मध्यम आचेवरच या पोळ्या खरपूस भाजून घ्याव्यात. वरून तूप घालून गरम गरम serve कराव्यात. 

वाढणी :- या साहित्याच्या साधारणपाने १० ते १२ पोळ्या होतील. 

४ ऑक्टोबर, २०१२

क्रिमी स्पिनच पास्ता


साहित्य :-
१. २ चमचे बटर
२. १ चमचा मैदा
३. अर्धा कप दूध
४. १ कप पालकाची पेस्ट
५. २ ते ३ कप उकडलेला पेने पास्ता
६. अर्धा चमचा चिली फ्लेक्स
७. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा
८. पाव चमचा काळी मिरी पूड 
९. मिल्क क्रीम पाव कप 
१०. चवीनुसार मीठ
११. किसलेला चीज अर्धा कप 

कृती :-
प्रथम पालकाची पानं उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे शिजवावीत. लगेचच ही पानं गार पाण्यात घालावीत. पाणी काढून ही पानं मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. एका कढईमध्ये पास्ता उकडून घ्यावा. पास्ता शिजवताना त्यात मीठ घालावं. पास्ता उकडण्याची कृती त्याच्या पॅकवर लिहिलेली असते. पास्ता उकडला की तो गाळून घेऊन त्यावर थोडं तेल घालावं म्हणजे पास्ता एकमेकाला चिकटणार नाही. मग एका पॅनमध्ये बटर आणि एक चमचा ओलिव्ह ओईल घालावं. बटर वितळल की त्यात १ चमचा मैदा घालावा व सतत ढवळत राहावं. मैदा थोडं शिजला की त्यात दूध घालावं. सतत ढवळाव.  गुठळ्या होऊ देऊ नयेत. हा व्हाईट सॉस थोडं दाट व्हायला लागला की त्यात पालकाची पेस्ट घालावी. छान मिक्स करून घ्यावं. त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. काळ्या मिरीची पूड व चिली फ्लेक्स घालावेत. पास्ता घालून मिक्स करून घ्यावा. गरज वाटल्यास परत थोडं मीठ घालावं. serve करताना वरून किसलेलं चीज घालून गरम गरम serve करावं. 

या पास्त्यामध्ये अर्धा चमचा इटालियन सीजनिंग घातला तर हा पास्ता अधिकच चविष्ट होतो.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

२८ सप्टेंबर, २०१२

छोले बिर्याणी


साहित्य :-
१. १ कप बासमती तांदूळ
२. अर्धा कप छोले / कबुली चणा 
३. २ ते ३ मोठे चमचे दही
४. अर्धा चमचा हळद
५. अर्धा चमचा तिखट
६. १ हिरवी मिरची 
७. १ कप बारीक चिरलेला टोमॅटो
८. खडा मसाला :- तमालपत्र, ३ ते ४ लवंगा, ३ ते ४ मिरी, १ इंच दालचिनी, ३ ते ४ वेलदोडे 
९. चवीनुसार मीठ 
१०. बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर प्रत्येकी अर्धा कप 
११. पाव वाटी दूध 
१२. ५ ते ६ केशराच्या काड्या
१३. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा
१४. वितळलेले तूप २ चमचे 

कृती:-
प्रथम बासमती तांदूळ ३ ते ४ पट पाणी व चवीनुसार मीठ  घालून शिजवावा. शिजवताना त्यात खड्या मसाल्याची पुरचुंडी करून घालावी. म्हणजे भाताला मसाल्याचा छान वास लागेल. हा भात शिजवताना मात्र एक काळजी घ्यावी आणि ती म्हणजे हा भात मोकळा शिजला पाहिजे. त्यामुळे भाताचा दाणा बघत राहावं. जेव्हा भात शिजला आहे असं वाटेल तेव्हाच तो गाळून घ्यावा व गार होऊ द्यावा. कबुली चणे आदल्या दिवशी भिजत घालावेत व बिर्याणी करायच्या आधी कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. मग एका कढईमध्ये तेल घालून त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. त्यात हळद, तिखट व हिरवी मिरची घालावी. टोमॅटो घालावेत व २ ते ३ चमचे पाणी घालून ते शिजू द्यावेत. टोमॅटो छान मऊ शिजले की त्यात दही घालावं व त्यात उकडलेले छोले घालावेत. चवीनुसार मीठ घालावे व दाटसर ग्रेव्ही तयार करावी. आता एक मायक्रोवेव्ह सेफ बाऊल घेऊन त्यात प्रथम वितळलेले तूप घालावे. त्यात मग भाताचा एक थर घालावा. वर पुदिना व कोथिंबीर घालावी. वरून चोल्याच्या ग्रेव्हीचा थर घालावा. परत भाताचा थर घालून पुदिना व कोथिंबीर घालावी. दूधामध्ये केशर घालून ते पण भातावर वरून घालावे. मायक्रोवेव्हमध्ये ५ मिनिटे झाकण घालून बिर्याणी शिजू द्यावी. मायक्रोवेव्ह नसेल तर असेच थर कढईमध्ये घालावेत व ही कढई आचेवर तवा ठेवून त्यावर ठेवावी. म्हणजे भात खालून लागणार नाही. ही बिर्याणी serve करताना डाव पूर्ण खालपर्यंत घालून सर्व थर उचलले जात आहेत न ते बघावे. एखाद्या रायत्यासोबत ही बिर्याणी गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

१५ सप्टेंबर, २०१२

तळणीचे मोदक


साहित्य :-
१. १ कप मैदा
२. २ ते ३ चमचे बारीक रवा
३. २ चमचे तुपाचे मोहन 
४. चिमुटभर मीठ
५. दीड कप किसलेला सुकं खोबरं 
६. पाऊण वाटी साखर
७. २ चमचे खसखस 
८. ५ ते ६ बदाम
९. ४ ते ५ काजू
१०. १ चमचा वेलची पूड
११. चिमुटभर केशर
१२. वाटीभर कोमट दूध
१३. तळणीसाठी तेल 


कृती :-
प्रथम मैदा, रवा, चिमुटभर मीठ हे सर्व एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घालावे. हे तूप सर्व मैद्यामध्ये अगदी छान एकजीव करून घ्यावे. नंतर दुधामध्ये पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी व झाकून ठेवावी. सुकं खोबरं व खसखस २ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यावी. ही भाजलेली खसखस व खोबरं, साखर, बदाम, काजू व वेलची पूड सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. या बारीक झालेल्या खिरापतीमध्ये केशर घालावं. हे आपलं सारण तयार झालं. आता भिजवलेली कणिक खलबत्त्याने कुटून थोडी मऊ करून घ्यावी. मग त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्यात सारण भाराव. सर्व बाजूने लाटी एकत्र करायला सुरुवात करावी. सर्व लाटी नीट एकत्र आली की वर मोदकाचे तोंड दाबून बंद करावे. हा तयार मोदक ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावा. सर्व मोदक तयार झाले की ते गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. हे तयार मोदक गणपतीच्या प्रसादासाठी वापरले जातात व ते ४ ते ५ दिवस टिकतात. 

वाढणी :- या साहित्यात ११ ते १२ मोदक होतील. 

खिरापत


साहित्य :-
१. दीड कप किसलेला सुकं खोबरं 
२. पाऊण वाटी साखर
३. २ चमचे खसखस 
४. ५ ते ६ बदाम
५. ४ ते ५ काजू
६. १ चमचा वेलची पूड
७. चिमुटभर केशर
८. २ चमचे खवा 

कृती :-
सुकं खोबरं व खसखस २ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यावी. ही भाजलेली खसखस व खोबरं, साखर, बदाम, काजू व वेलची पूड सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. या बारीक झालेल्या खिरापतीमध्ये केशर घालावं. खिरापत serve करताना  थोडासा खवा भाजून त्यात घालावा. 

वाढणी :- १ छोटी वाटी प्रसाद या साहित्यात होईल. 

७ सप्टेंबर, २०१२

आलू टिक्की


साहित्य :-
१. ३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे
२. २ ते ३ हिरव्या मिरच्या
३. ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या
४. पेरभर आल्याचा तुकडा
५. बारीक चिरलेली कोथिंबीर
६. २ चमचे कोर्नफ्लोर 
७. चवीनुसार मीठ

कृती:-
बटाटे उकडून सालं काढून किसून घ्यावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, लसूण व आलं घालावं. या तिन्हीही गोष्टी मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. त्यात कोर्नफ्लोर, कोथिंबीर व मीठ घालून छान गोळा मळून घ्यावा. हाताला तेल लावून या गोळ्याचे गोलाकार छोटे चपटे गोळे बनवावेत. किंवा तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या टिक्की बनवाव्या. एका पॅन मध्ये थोडं थोडं तेल घालून या टिक्की shallow fry करून घ्याव्यात. सॉस किंवा चटणीसोबत  गरम गरम serve कराव्यात.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

४ सप्टेंबर, २०१२

लसूण चटणी


साहित्य :-
१. ५ ते ६ लसणाच्या मोठ्या पाकळ्या 
२. ४ ते ५ चमचे किसलेला सुकं खोबरं 
३. २ ते ३ चमचे पांढरे तीळ
४. १ चमचा देघी मिरची पावडर
५. चवीनुसार मीठ
६. १ चमचा तेल

कृती :-
एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यात सुकं खोबरं, तीळ व लसूण भाजून घ्यावा. भाजलेल्या गोष्टी गार झाल्या की मिक्सरमध्ये मीठ व तिखट घालून बारीक करून घ्याव्यात. ही लसूण चटणी ७ ते ८ दिवस छान राहते. 


लादीपाव


साहित्य :-
१. दीड कप सेल्फ रायझिंग फ्लोअर किंवा मैदा 
२. १ चमचा यीस्ट 
३. पाव चमचा साखर
४. १ कप कोमट पाणी 
५. १ चमचा बटर

कृती :-
प्रथम एका काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात सेल्फ रायझिंग फ्लोअर किंवा मैदा घ्यावा. जर तुम्ही मैदा वापरणार असाल तर त्यात अर्चा चमचा मीठ घालावं. पण सेल्फ रायझिंग फ्लोअरला मीठ घालायची गरज नाही. एका छोट्या वाटीमध्ये यीस्ट घेऊन त्यात साखर घालावी. कोमट पाण्यातील थोडं पाणी घालून यीस्ट active होण्यासाठी १० मिनिटे ठेवावे. पिठात हे यीस्ट घालून लागेल तेवढ्या पाण्यात पुरणाच्या पोळीसारखी पातळ कणिक मळावी. बटर लावून ही कणिक ५ ते ७ मिनिटे मळावी. हा daugh हाताला चिकटणार नाही अशा स्टेजला येईपर्यंत मळावा. मग काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेऊन वरून झाकावा. १ तास हा daugh ferment होऊ द्यावा. बकिंग ट्रेला तूप व मैदा लावून घ्यावा. ferment झालेल्या कणकेला हाताने बुक्क्या मारून त्यातील हवा काढावी व गोळा पुन्हा मळून घ्यावा. हाताला थोडे पीठ लावून या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून ते ट्रे मध्ये एकमेकाला थोडेसे चिकटतील असे ठेवावे. पुन्हा झाकून हे गोळे अर्धा तास ferment होऊ द्यावेत. तोवर ओव्हन ३५०f ला preheat करून घ्यावा. अर्ध्या तासाने ह्या गोळ्यांना वरून दुधाचा हात लावून बेक करायला ठेवावे. ३० मिनिटे बेक झाल्यावर बाहेर काढून लगेचच या पावला बटर लावावे. त्यामुळे पाव मऊ राहतो. हा पाव एका जाळीवर थंड होण्यासाठी ठेवावा. थंड झाला की एकमेकांपासून अलग करून मधोमध कापावा. वडा पाव, पाव भाजी किंवा अच्छी दाबेली सारख्या पदार्थांमध्ये हा पाव वापरता येऊ शकतो. तुमच्या ओव्हन नसेल तर convection microwave मध्ये १८०c  वर तुम्ही हा पाव बेक करू शकता. 

वाढणी :- या साहित्यात ५ ते ६ पाव होतील. 

वडा बनवण्याची कृती या पत्त्यावर पहावी :- http://migruhini.blogspot.com/2012/04/blog-post_30.html

२१ ऑगस्ट, २०१२

दुधी हलवा


साहित्य :-
१. २ कप किसलेला दुधी
२. १ कप दूध
३. पाव कप खवा
४. १ कप साखर
५. अर्धा चमचा वेलची पूड
६. चिमूटभर केशर
७. काजू व बेदाणे प्रत्येकी  ३ चमचे
८. ४ ते ५ चमचे तूप

कृती :-
प्रथम दुध्या किसून घ्यावा. किसायाच्या आधी त्यातल्या बिया काढून टाकाव्यात. एका कढईमध्ये तूप घाव. त्यात काजू व बेदाणे घालावेत. काजू सोनेरी झाले व बेदाणे फुगले की त्यात किसलेला दुधी घालावा. मध्यम आचेवर झाकण ठेवून १० मिनिटे दुघी शिजवावा. मध्ये मध्ये झाकण काढून ढवळून घ्यावे. मग त्यात दूध घालावे व दुधी पूर्ण दूध आटेपर्यंत शिजवावा. मग त्यात साखर घालावी. साखर घातल्याने हलवा पुन्हा पातळ होऊ लागेल. अजून ५ मिनिटे सतत ढवळत दुधी शिजला की तो थोडा घट्ट होऊ लागेल. मग त्यात खव्याचा चुरा घालावा. वेलची पूड व केशर घालून छान मिक्स करून घ्यावे. हलवा गार किंवा गरम कसाही serve करावा. दूध व खवा या दोन्ही गोष्टींमुळे हलवा अतिशय रीच होईल.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

६ ऑगस्ट, २०१२

पालकवाली दाल


साहित्य :-
१. १ कप बारीक चिरलेला पालक
२. १ कप शिजवलेली मुगाची डाळ
३. १/२ कप बारीक चिरलेला कांदा
४. बारीक चिरलेला छोटा टोमॅटो
५. अर्धा चमचा हळद
६. २ सुक्या लाल मिरच्या 
७. फोडणीसाठी तेल व जीरं 
८. ४ ते ५ कढीपत्त्याची पानं 
९. चवीनुसार मीठ

कृती:-
प्रथम एका कढईमध्ये तेल तापवून त्यात जीरं घालावं.  जीरं थोडं तडतडल की त्यात कढीपत्ता, हळद, सुक्या लाल मिरच्या  व बारीक केलेला कांदा घालावा. कांदा मऊ झाला की मग त्यात टोमॅटो घालून तो मिळून येईपर्यंत शिजवावे. मग त्यात पालकाची धुवून चिरलेली पाने घालावीत. ५ ते ७ मिनिटे ही पाने शिजू द्यावी. मग शिजवलेली मुगाची डाळ घालावी. चवीनुसार मीठ घालून ही पालकवाली दाल ५ मिनिटे अजून शिजवावी. भाताबरोबर गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे  

५ ऑगस्ट, २०१२

भडंग


साहित्य :-
१. ३ ते ४ कप चुरमुरे 
२. ३ ते ४ चमचे शेंगदाणे 
३. ७ ते ८ कढीपत्त्याची पाने
४. अर्धा चमचा तिखट
५. चिमूटभर हिंग
६. पाव चमचा हळद
७. अर्चा चमचा गोडा मसाला किंवा भडंग मसाला
८. चवीनुसार मीठ
९. फोडणीसाठी तेल

कृती:-
एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यात मोहरी घालून ती तडतडली की मग कढीपत्ता व शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे नीट परतले की त्यात हळद, तिखट, हिंग व गोडा मसाला घालून परतावे. लगेचच चुरमुरे घालावेत. चुरमुर्यामध्ये मीठ असेल तर त्याचा अंदाज घेऊन मगच मीठ घालावे. छान मिक्स करून घ्यावे. भडंग तयार झाल्यावर serve करताना त्यात कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून द्यावे. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

२० जुलै, २०१२

कांद्याची गोल भजी


साहित्य :-
१. १ कांदा बारीक चिरलेला
२. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
३. १ कप बेसन
४. अर्धा चमचा तिखट
५. पाव चमचा हळद 
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा कप पाणी 
८. चिमूटभर खायचा सोडा
९. बारीक चिरलेली कोथिंबीर 
१०. तळणीसाठी तेल

कृती:-
एका भांड्यामध्ये बेसन घ्यावं. त्यात तिखट, हळद, हिरवी मिरची, खायचा सोडा, कोथिंबीर या सर्व गोष्टी घालाव्यात. एकदा मिक्स करून मग हळू हळू पाणी घालत बॅटर तयार करावं. हे बॅटर पातळ असू नये थोडं घट्ट असावं. त्यातच बारीक चिरलेला कांदा घालावा. तेल तापवून घेऊन हाताने कांद्यासहित  थोडं थोडं बॅटर तेलात घालावं. हाताने घालायचा नसेल तर चमच्याने देखील ही भजी घालता येतील. तेलामध्ये ही भजी छान सोनेरी रंगावर तळून घ्यावीत. ऐन पावसाच्या दिवसात गरम गरम चहासोबत अशी गरम गरम भजी serve करावीत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

१८ जुलै, २०१२

लेमन राईस


साहित्य :-
१. २ कप शिजवलेला भात
२. ४ ते ५ चमचे लिंबाचा रस
३. २ ते ३ चमचे शेंगदाणे 
४. २ चमचे हरभऱ्याची डाळ 
५. ४ ते ५ कढीपत्त्याची पानं
६. १ हिरवी मिरची 
७. अर्धा चमचा हळद 
८. २ ते ३ सुक्या लाल मिरच्या 
९.  सजावटीसाठी कोथिंबीर
१०. चवीनुसार मीठ 

कृती :-
प्रथम भात शिजवून घ्यावा. भात शिजवतानाच त्यात चवीनुसार मीठ घालावे. हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजवून ठेवावी.  भात शिजला की एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यात मोहरीची फोडणी करावी. कढीपत्त्याची पानं घालावीत. हिरवी मिरची व लाल मिरची घालून परतून घ्यावे.  हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे घालावेत. हळद घालावी. त्यात लगेचच शिजलेला भात घालून छान मिक्स करून घ्यावे. भातामध्ये लिंबाचा रस घालावा व पुन्हा भात मिक्स करून घ्यावा. कोथिंबीर घालून हा भात गरम गरम serve करावा. बाहेर ट्रीपला नेण्यासाठी देखील हा भात सोपा व टिकाऊ आहे. 

वाढणी :- २ ते ३ माणसे