८ नोव्हेंबर, २०१०

मेथी मटर मलई




साहित्य :-
१. २ वाट्या चिरलेली मेथी
२. अर्धी वाटी मटार
३. अर्धी वाटी मिल्क क्रीम
४. चिमुटभर दालचिनी पावडर
५. चिमुटभर आमचूर पावडर
६. अर्धी वाटी चिरलेला कांदा
७. मीठ चवीनुसार
८. फोडणीसाठी तेल
९. अर्धा चमचा तिखट
१०. अर्धा चमचा साखर

कृती :-
प्रथम मेथीची पानं खुडून धुवून ती बारीक चिरून घ्यावीत. एका कढई मध्ये तेल घालावे. तेल तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा मऊ होईपर्यंत परतावा. मग त्यात मेथी घालून परतावे. मेथी मऊ झाली की त्यात मटार घालावेत. मध्यम आचेवर थोडावेळ परतून घ्यावे. त्यात दालचिनी पावडर व आमचूर पावडर घालावी. तिखट घालावे. चवीनुसार मीठ घालून भाजी सारखी करून घ्यावी. थोडी साखर घालून भाजी थोडावेळ शिजवावी. सगळ्यात शेवटी जेव्हा भाजी पूर्ण शिजलेली असेल तेव्हा मिल्क क्रीम घालून भाजीला उकळी आणावी. आवश्यक त्या प्रमाणात रस ठेवावा. मिल्क क्रीम घालून जर भाजी जास्त शिजवली तर ती दाट होते. कोथिंबीर घालून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- ही भाजी २ - ३ माणसांना पुरेल.


७ मे, २०१०

भेंडी फ़्राय





साहित्य :-
१. भेंडी अर्धा किलो
२. कांदा अर्धा
३. दाण्याचे कूट ४ चमचे
४. आमचूर पावडर १ चमचा
५. धना जीरा पूड प्रत्येकी १ चमचा
६. तिखट अर्धा चमचा
७. हळद
८. मीठ
९. ओलं खोबरं पाव वाटी

कृती :-
भेंडी चिरून अगदी कमी तेलामध्ये तळून घ्यावी. फार कुरकुरीत करू नये. कांदा बारीक चिरून फोडणीत घालावा. मऊसर झाला की त्यात हळद, तिखट, धना जीरा पूड, आमचूर पावडर असा सर्व मसाला घालावा. तळलेली भेंडी घालून भाजी एकजीव करून घ्यावी. त्यात मीठ घालावे व दाण्याचे कूट घालून भाजी सारखी करून घ्यावी. खोबरं घालून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- हि भाजी २ ते ३ लोकांना पुरेशी होईल.

२३ मार्च, २०१०

चिकन तंदुरी


साहित्य :-

१. अर्धा किलो चिकन
२. १ कप दही (दह्यातील पाणी काढून घ्यावे)
३. १/२ चमचा दालचिनी पूड
४. १/२ चमचा धणे पूड
५. १ चमचा तिखट ( किंवा आवडीनुसार)
६. २ चमचे लिंबू रस
७. १/२ मिरी पूड
८. १/२ चमचा खसखस
९. २ चमचे आल लसूण पेस्ट
१०. मीठ

कृती :-

चिकन धुवून ते कोरडे करून घ्यावे. वरिला सर्व मसाला एकत्र करून चिकनला लावावा. हे marinate केलेले चिकन २ तास फ्रीज मध्ये ठेवावे. २ तासांनी microwave मध्ये ठेवून प्रत्येक बाजू ५ मिनिटे शिजवून घ्यावी. अव्हन साधारण ४०० F ला preheat करावा. चिकन अव्हन मध्येही दोन्ही बाजूनी साधारण ५ मिनिटे बेक करून घ्यावे. कुठल्याही प्रकारच्या भातासोबत गरम गरम खायला द्यावे.

वाढणी :- १ ते २ माणसे


१७ मार्च, २०१०

हक्का नुडल्स


साहित्य :-
१. maggie noodles १ छोटा पाकीट
२. पाव वाटी उभा चिरलेला कांदा
३. पाव वाटी उभी चिरलेली सिमला मिरची
४. पाव वाटी उभं चिरलेला गाजर
५. पाव वाटी कांद्याची पात
६. अर्धी वाटी उभा चिरलेला कोबी
७. अर्धा चमचा चिली सॉस
८. ३ चमचे सोय सॉस
९. २ चमचे टोमॅटो सॉस
१०. १ चमचा शेजवान सॉस

शेजवान सॉस बनवण्याची कृती :-
छोटा अर्धा कांदा, १ छोटा टोमॅटो, ४ ते ५ पाकळ्या लसूण, आलं १ पेर ७ ते ८ लाल मिरच्या या सर्व गोष्टी बारीक चिरून घ्याव्यात. प्रथम तेलावर कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यात आलं लसूण घालून परतावे. आलं व लसणाचा वास यायला लागल्यावर त्यात टोमॅटो घालावा. सर्वात शेवटी मिरच्या घालाव्यात व अगदी मंद आचेवर हा सॉस घट्ट होईपर्यंत शिजवावा. थोडेसे मीठ घालावे. म्हणजे शेजवान सॉस तयार होईल. सॉस तयार होईल.

हक्का नुडल्स बनवण्याची कृती :-
प्रथम उकळत्या पाण्यात नुडल्स ४ त४ ५ मिनिटे शिजवाव्यात. शिजलेल्या नुडल्सवर गार पाणी घालून नुडल्स गळून घ्याव्यात व त्या नुडल्सवर चमचाभर तेल घालावे. तेल घालण्याने नुडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. एका कढईत तेल घालून त्यात कांदा परतावा. कोबी, गाजर, सिमला मिरची या भाज्या घालून त्या मऊ होईपर्यंत परताव्यात. मग त्यात चिली सॉस, सोय सॉस, व टोमॅटो सॉस घालावा. लगेचच नुडल्स घालून ४ ते ५ मिनिटे परतून serving dish घालाव्या. त्यावर कांद्याची पात घालून गरम गरम serve करावे.

वाढणी :- १ ते २ माणसे

८ मार्च, २०१०

पालक पनीर


साहित्य :-

१. २ वाट्या शिजवलेला पालक
२. अर्धी वाटी पनीर
३. अर्धी वाटी कांदा
४. अर्धी वाटी टोमॅटो
५. खडा मसाला (दालचिनी, लवंग, वेलदोडा)
६. अर्धी वाटी मिल्क क्रीम / whipped cream
७. २ चमचे कसुरी मेथी
८. मीठ
९.2 हिरव्या मिरच्या
१०. फोडणीसाठी तेल
११. प्रत्येकी १ चमचा धणे जिरे पूड
१२. हळद

कृती :-
प्रथम एका पातेल्यात पाणी तापत ठेवावे. पाणी उकळले की त्यात पालक ४ ते ५ मिनिटे शिजवावा. शिजलेला पालक लगेच गार पाण्यात ठेवावा. पालक व चवीनुसार हिरवी मिरची मिक्सरमधून वाटावी. एका पसरट पातेल्यात तेल तापत ठेवावे. तेल तापले की त्यात खडा मसाला घालून परतावे. कांदा घालावा. कांदा मऊ झाला की त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटो थोडा शिजला की धणे जिरे पूड, कसुरी मेथी, हळद घालावी
व थोडावेळ शिजवावे. मग त्यात मिक्सरमधून काढलेला पालक घालावा. त्या पालकाला तेल सुटेपर्यंत परतावे. सतत ढवळत राहावे. पनीर चे आपल्याला आवडतील अशा आकाराचे तुकडे करून ते भाजीत घालावेत. मिल्क क्रीम व मीठ घालून भाजी mix करावी. आच बंद करून भाजी serving bowl मध्ये काढावी व गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे

५ मार्च, २०१०

पोळी







साहित्य :-
१. २ डाव गव्हाची कणिक
२. २ चमचे दही
३. चिमुटभर मीठ
४.१ ग्लास कोमट पाणी
५. तेल
कृती :-

कणकेमध्ये थोडेसे मीठ व २ चमचे दही घालावे. दही घातल्याने पोळी मऊ होण्यास मदत होते. कणिक एकत्र करावी. त्यात हळूहळू कोमट पाणी घालत कणिक मळावी. त्या कणकेचा गोळा झाल्यावर थोडेसे तेल लावून कणिक परत मळावी. ही मळलेली कणिक झाकून ठेवावी. साधारण अर्ध्या तासाने पोळी लाटण्यास घ्यावी. एक छोटा गोळा घेऊन तो थोडा लाटावा व त्याला तेल लावून त्रिकोणी घडी घालावी. ही त्रिकोणी घडी पिठात घोळवून त्याची गोल पोळी लाटावी. तवा मध्यम आचेवर तापला की लाटलेली पोळी तव्यावर भाजून घ्यावी. दही घातल्यामुळे पोळ्या अतिशय मऊ होतात व छान पदर सुटतात.

वाढणी :- या साहित्याच्या साधारण ७ ते ८ पोळ्या होतील

पालकाची भाजी


साहित्य :-
१. उकडलेला पालक ३ वाटया
२. किसलेला लसूण २ मध्यम पाकळ्या
३. फोडणीसाठी तेल १ चमचा
४. तिखट
५. मोहरी
६. डाळीचं पीठ
७. मीठ

भाजीची कृती :-

प्रथम उकडलेल्या पालकामध्ये २ चमचे डाळीचे पीठ घालून पालक smash करून घ्यावा. मग एका पातेल्यात तेल तापत ठेवावे. तेल तापले की त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात किसलेला लसूण घालावा. थोडं परतून त्यामध्ये डाळीच्या पीठासोबत smash केलेला पालक घालावा. गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालून भाजीला उकळी येऊ द्यावी. चवीनुसार मीठ घालावे. भाजी थोडीशी घट्टसर असावी. पोळी व भातासोबत ही भाजी गरम गरम वाढावी

रव्याचा शिरा


साहित्य :-
१. रवा
२. तूप
३. साखर
४. ड्रायफ्रूट्स
५. केशर
६. वेलदोड्याची पूड
७. गरम पाणी

कृती:-
एका पातेल्यात तूप तापत ठेवावे. तूप तापल्यावर त्यात ड्रायफ्रूट्स घालून परतावे. काजूचा रंग बदलेल, मनुका फुगतील. असे झाले की त्यात रवा घालावा व पुन्हा परतावे. रव्याचा रंग थोडासा बदलला की त्यात गरम पाणी घालावे. ढवळून घेऊन झाकण ठेवावे. रवा शिजून थोडा घट्ट झाला की त्यात साखर घालावी. साखर घातल्यावर पुन्हा रवा पातळ होईल व अटायला लागेल. योग्य तेवढा आटला की त्यात वेलदोड्याची पूड व केशर घालावे. गरम गरम शिरा मुदी पाडून serve करावा.