२९ मार्च, २०११

नानकटाई


साहित्य :-
१. १/३ कप मैदा
२. १/३ कप रवा
३. अर्धा कप बेसन
४. चिमूटभर बेकिंग सोडा
५. अर्धा चमचा वेलची पूड
६. अर्धा चमचा जायफळ पूड
७. अर्धा कप लोणी / butter
८. २/३ कप साखर
९. कापलेले बदाम आणि पिस्ते

कृती :-
प्रथम लोणी/ butter फ्रीज मधून काढून ठेवावे व ते मऊ होऊ द्यावे. या मऊ झालेल्या लोण्यामध्ये साखर घालून दोन्ही एकत्र एक ५ मिनिटे फेटावे. बदाम व पिस्ते सोडून इतर सर्व कोरडे पदार्थ एकत्र करावेत. लोणी आणि साखरेच्या मिश्रणात हे कोरडे जिन्नस घालून छान गोळा मळून घ्यावा. या गोळ्याचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून त्यावर बदाम व पिस्ते लावावेत. oven ३५० ला preheat करावा व एका baking tray वर हे गोळे थोड्या थोड्या अंतरावर ठेवावेत. oven मध्ये 350F ला १० - १५ मिनिटे bake करावेत. खुसखुशीत नानकटाई तयार.

वाढणी :- या प्रमाणामध्ये २० ते २२ नानखटाई होतील.

२८ मार्च, २०११

भरली मिरची







साहित्य :-
१. अर्धी वाटी दाणे
२. अर्धी वाटी तीळ
३. अर्धा चमचा मेथ्या
४. चवीपुरते मीठ
५. २ - ३ चमचे तेल
६. मोठ्या जाड मिरच्या २

कृती :-
प्रथम दाणे, तीळ व मेथ्या वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर मिक्सरमधून हे सर्व जिन्नस बारीक वाटावेत. त्यात चवीपुरते मीठ घालावे. मिरची मधोमध उभी चिरावी. दोन भाग होऊ देऊ नयेत. मिक्सरमधून वाटलेले मिश्रण या मिरची मध्ये भरून घ्यावा. तव्यावर थोडा तेल टाकून या मिरच्या ठेवाव्यात व झाकण लावून शिजू द्याव्यात. मस्त आणि चटपटीत तोंडीलावणं तयार.

वाढणी :- १ ते २ माणसे

२६ मार्च, २०११

मसालेदार छोले



साहित्य :-
१. छोले दीड वाटी (न भिजवलेले )
२. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
३. अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
४. अनारदाना १ चमचा
५. हळद १/२ चमचा
६. तिखट १ चमचा
७. छोले मसाला २ चमचे
८. आलं लसूण किसून प्रत्येकी १ चमचा
९. मीठ चवीनुसार
१०.तेल २ चमचे
११. जीरं १ चमचा


कृती :-
प्रथम छोले ४ वाटी पाण्यात ७ ते ८ तास भिजून ठेवावेत. नंतर कूकरमध्ये मीठ घालून हे भिजलेले छोले उकडावेत. एका कढई मध्ये तेल तापवावे. त्यात जीरं घालून कांदा परतावा. कांदा थोडा मऊ झाला की त्यात आलं लसूण घालून पुन्हा मिनिटभर परतावे. आच कमी करावी व हळद, तिखट, छोले मसाला घालावा आणि मिश्रण एकत्र करून घ्यावे. हे मसाले थोडे शिजले की त्यात शिजवलेले छोले घालावेत. आच वाढवावी. थोडे पाणी घालावे व छान उकळी आणावी. मग त्यात अनारदाना घालून पुन्हा उकळावे. मीठ घालावे. जितका जास्त छोले उकळातील तितका जास्त पाणी त्याला लागेल. त्यामुळे आवश्यक तेवढं पाणी घालून थोडी gravy राहील इतपत उकळावे. मग त्यात टोमॅटो घालावा. पुन्हा थोडे उकळून घ्यावे व कोथिंबीर पेरून गरम गरम serve करावे.

वाढणी :- ३ ते ४ माणसे




खांडवी/ सुरळीच्या वड्या



साहित्य :-
१. १ कप बेसन
२. अर्धा कप दही
३. आलं, लसूण, मिरची पेस्ट प्रत्येकी एक चमचा
४. २ कप पाणी
५. अर्धा चमचा हळद
६. मीठ चवीनुसार
७. तेल, मोहरी, जीरं, हिंग फोडणीकरता
८. खोबरं व कोथिंबीर

कृती :-
दही, पाणी, बेसन आलं, लसूण, मिरची पेस्ट, हळद व मीठ या सर्व गोष्टी गुठळ्या होऊ न देता एकजीव करून घ्याव्यात. मध्यम आचेवर हे मिश्रण गरम करण्यास ठेवावे. सतत ढवळावे जेणेकरून बेसन भांड्याला खाली चिकटणार नाही. स्टीलच्या ताटाला मागच्या बाजूने थोडेसे तेल लावून घ्यावे. बेसनाचे मिश्रण थोडे घट्ट व्हायला लागले की थोडेसे मिश्रण घेवून तटावर पातळ पसरून बघावे. ते जर अतिशय सहज पणे सुटे झाले तर मिश्रण वड्या करण्यास तयार आहे असे समजावे. जर हे मिश्रण तयार असेल तर ते सर्व तटांवर पातळ पसरून घ्यावे. थोडे गार झाले की सुरीने उभ्या चिरा पडून घ्याव्यात. एक एक उभी पट्टी हळू हळू गुंडाळत जावी. या सगळ्या गुंडाळलेल्या पट्ट्या एका ताटात ठेवून त्यावर तेल मोहरी, जीरं, हिंग यांची फोडणी करून पसरावी. खोबरं व कोथिंबीर पेरून serve कराव्यात.

वाढणी :- २ ते ३ माणसे

२४ मार्च, २०११

खजूर वडी


साहित्य :-
१. बिया काढलेला खजूर ३ वाट्या
२. २ चमचे तूप
३. १ चमचा खसखस
४. १ चमचा सुकं खोबरं

कृती :-
प्रथम खजूर चिरून घ्यावा. एका कढई मध्ये तूप घेऊन ते मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. त्या तुपात खसखस व खोबरं घालून अर्धा मिनिट परतावे व लगेचच खजूर घालावा. खजूर घातल्यावर सतत ढवळावे. खजूर अगदी मऊ होईपर्यंत शिजवावे व हे मिश्रण थंड होऊ द्यावे. हे मिश्रण थोडे गार झाले की एका ताटलीला तूप लावावे. हाताला पण तूप लावून हे मिश्रण त्या ताटलीवर पसरावे. थोडेसे जाडसर पसरून घेतले की लगेचच त्याच्या वड्या पाडाव्यात. आवडत असल्यास या वाड्यांना चांदीचा वर्ख लावावा किंवा वरून भाजलेली खसखस लावली. या वड्या थंडीमध्ये खाण्यासाठी अत्यंत पोष्टिक आहेत.