१५ मे, २०१२

मेथी चिकन



साहित्य :-
१. चिकन थाईज ४ ते ५
२. १ मोठा कांदा बारीक चिरून
३. १ मोठा टोमॅटो बारीक चिरून
४. ४ ते ५ लवंगा
५. ४ ते ५ अक्खी वेलची
६. दालचिनी तुकडा
७. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी १ चमचा
८. कसुरी मेथी १/४ कप
९. चवीपुरतं मीठ
१०. तिखट पूड १ चमचा
११. धणे जिरे पूड प्रत्येकी १ चमचा
१२. गरम मसाला अर्धा चमचा
१३. हळद अर्धा चमचा
१४. सजावटीसाठी कोथिंबीर

कृती:-
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन ते गरम झालं की त्यात वेलची, लवंग व दालचिनी घालावी. मग  त्यात कांदा घालावा. थोडा परतल्यावर आलं लसूण पेस्त घालावी. ही पेस्ट थोडी परतली की मग त्यात हळद, धणे जिरे पूड घालावी. थोडं परतावं व त्यात टोमॅटो घालावा. थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून टोमॅटो छान  मॅश होईपर्यन्त शिजवावा. मग या ग्रेव्ही मध्ये तिखट व गरम मसाला घालावा. छान मिक्स करून मग त्यात चिकन घालावा. परत एकदा मिक्स करून झाकण ठेवून चिकन शिजू दयावं.  मधून मधून चिकन परतावं व आवश्यक वाटल्यास पाणी घालावं. चिकन ८०% शिजलं की त्यात कसुरी मेथी घालावी. मेथी घालताना हातावर एकदा चोळावी जेणेकरून त्याची छान पूड होईल. चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा सर्व जिन्नस मिक्स करून झाकण लावून शिजवावेत. गरम गरम मेथी चिकन रोटी, नान अथवा पराठ्यासोबत serve करावं.

वाढणी  :- ३ ते ४ माणसे


१२ मे, २०१२

दाल बाटी


साहित्य :-
१. १ कप गव्हाची कणिक
२. पाव कप रवा
३. अर्धा चमचा ओवा
४. ४ ते ५ चमचे तेलाचे मोहन
५. चवीनुसार मीठ
६. तुरीची दाल अर्धा कप
७. अर्धा कप मुग दाल
८. कढीपत्ता
९. लाल मिरच्या ३ ते ४
१०. आलं, लसूण प्रत्येकी पेरभर
११. पाव कप कांदा बारीक चिरून 
१२. १ चमचा हळद
१३. फोडणीसाठी तेल व जीरं 

कृती :-
प्रथम गव्हाची कणिक, रवा व ओवा मिक्स करून घ्यावे व त्यात तेलाचे मोहन व चवीनुसार मीठ घालावे. थोडी हळद घालावी. पाणी घालत घालत याचा छान गोळा मळून घ्यावा. कुकरच्या एका भांड्यामध्ये हा गोळा व एका भांड्यात तूर व मुग डाळ एकत्र करून ३ शिट्ट्या करून घ्याव्या. शिजलेला बाटीचा गोळा छोट्या छोट्या वड्यामध्ये कापून घ्यावा व तेलावर तळून घ्यावा. एका कढईमध्ये तेल तापवावे व त्यात जीरं, लाल मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करावी. हळद घालावी व कांदा घालून परतावे. आलं , लसूण घालून मिनिटभर पुन्हा परतून घ्यावे. कांदा छान मऊ झाला की त्यात शिजलेल्या डाळी घालाव्यात. थोडं पाणी व चवीनुसार मीठ घालून या वरणाला छान उकळी आणावी. कोथिंबीर घालावी. दाल बाटी serve करताना बाटी मोडून कुस्करावी व त्यावर वरण, तूप, व लिंबू पिळून घालावे. छान, खुसखुशीत दाल बाटी गरम असताना खावी. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

शेवयांचा उपमा


साहित्य :-
१. १ कप बोम्बिनो शेवया 
२. २ मोठे चमचे स्वीट कॉर्न 
३. २ मोठे चमचे चमचे मटार
४. २ मोठे चमचे चौकोनी कापलेले गाजर
५. फोडणीसाठी तेल
६. २ हिरव्या मिरच्या 
७. चवीनुसार मीठ 
८. बारीक चिरलेला कांदा पाव कप
९. पेरभर किसलेला आलं 
१०. खवलेलं खोबरं आणि कोथिंबीर सजावटीसाठी 

कृती :-
प्रथम एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ व शेवया घालून साधारणपणे ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्यावे. नंतर लगेचच या शेवया गाळून घ्याव्यात. त्याच्यावर गार पाणी सोडावे व थोडेसे तेल घालून हळुवार हाताने मिक्स करून घ्यावे. असे केल्याने शेवया एकमेकाला चिकटणार नाहीत. मग एका कढईमध्ये तेल तापवून घ्यावे. त्यात फोडणी करावी. फोडणीमध्ये हिरवी मिरची व आलं घालावं. आवडत असल्यास शेंगदाणे देखील घालावेत. थोडंसं परतून मग कांदा घालावा. कांदा मऊ झाला की हळद व सगळ्या भाज्या घालाव्यात व थोडंसं मीठ व पाणी घालून भाज्या शिजवून घ्याव्यात. हे मीठ केवळ भाज्यांपूरतच घालावं. जर फ्रोझन मटार व स्वीट कॉर्न वापरलं तर शिजायला फारसा वेळ लागत नाही. भाज्या शिजल्या आणि पाणी आटलं की मग शेवया घालाव्यात व अगदी हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यावं. serve करताना वरून खोबरं व कोथिंबीर घालावी आणि गरम गरम serve करावं. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

८ मे, २०१२

नारळाची बर्फी


साहित्य :-
१. खवलेला नारळ २ कप
२. साखर दीड कप
३. फेटलेली दाट साय किंवा फ्रेश क्रीम २ ते ३ चमचे
४. वेलची पूड अर्धा चमचा
५. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स 
६. चिमूटभर केशर 

कृती :-
खवलेला नारळ, साखर व फेटलेली साय किंवा फ्रेश क्रीम सर्व एका कढईमध्ये एकत्र करावे.  मध्यम आचेवर हे सर्व मिश्रण शिजवावे. साखर विरघळली की हे मिश्रण थोडे सैल होते. यावेळी वेलची पूड व केशर घालावे. त्यानंतर एक ५ मिनिटे शिजवले की मिश्रण कढईच्या कडेने सुटायला लागते व दाट व्हायला लागते. असे झाले की लगेचच आच बंद करून तूप लावलेल्या एका तटावर हे मिश्रण जाडसर पसरून घ्यावे. त्यावर लगेचच  ड्रायफ्रुट्स घालावीत व हाताने थोडेसे दाबावे. ही बर्फी थोडी गार झाली की सुरीने त्याच्या वड्या पडून घ्याव्या. बर्फी पूर्ण गार झाली की मगच उचलावी.

वाढणी  :- या साहित्यात साधारणपणे १२ ते १५ वड्या होतील.