२० जुलै, २०१२

कांद्याची गोल भजी


साहित्य :-
१. १ कांदा बारीक चिरलेला
२. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
३. १ कप बेसन
४. अर्धा चमचा तिखट
५. पाव चमचा हळद 
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा कप पाणी 
८. चिमूटभर खायचा सोडा
९. बारीक चिरलेली कोथिंबीर 
१०. तळणीसाठी तेल

कृती:-
एका भांड्यामध्ये बेसन घ्यावं. त्यात तिखट, हळद, हिरवी मिरची, खायचा सोडा, कोथिंबीर या सर्व गोष्टी घालाव्यात. एकदा मिक्स करून मग हळू हळू पाणी घालत बॅटर तयार करावं. हे बॅटर पातळ असू नये थोडं घट्ट असावं. त्यातच बारीक चिरलेला कांदा घालावा. तेल तापवून घेऊन हाताने कांद्यासहित  थोडं थोडं बॅटर तेलात घालावं. हाताने घालायचा नसेल तर चमच्याने देखील ही भजी घालता येतील. तेलामध्ये ही भजी छान सोनेरी रंगावर तळून घ्यावीत. ऐन पावसाच्या दिवसात गरम गरम चहासोबत अशी गरम गरम भजी serve करावीत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

१८ जुलै, २०१२

लेमन राईस


साहित्य :-
१. २ कप शिजवलेला भात
२. ४ ते ५ चमचे लिंबाचा रस
३. २ ते ३ चमचे शेंगदाणे 
४. २ चमचे हरभऱ्याची डाळ 
५. ४ ते ५ कढीपत्त्याची पानं
६. १ हिरवी मिरची 
७. अर्धा चमचा हळद 
८. २ ते ३ सुक्या लाल मिरच्या 
९.  सजावटीसाठी कोथिंबीर
१०. चवीनुसार मीठ 

कृती :-
प्रथम भात शिजवून घ्यावा. भात शिजवतानाच त्यात चवीनुसार मीठ घालावे. हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजवून ठेवावी.  भात शिजला की एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यात मोहरीची फोडणी करावी. कढीपत्त्याची पानं घालावीत. हिरवी मिरची व लाल मिरची घालून परतून घ्यावे.  हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे घालावेत. हळद घालावी. त्यात लगेचच शिजलेला भात घालून छान मिक्स करून घ्यावे. भातामध्ये लिंबाचा रस घालावा व पुन्हा भात मिक्स करून घ्यावा. कोथिंबीर घालून हा भात गरम गरम serve करावा. बाहेर ट्रीपला नेण्यासाठी देखील हा भात सोपा व टिकाऊ आहे. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

७ जुलै, २०१२

चिकन बिर्याणी




साहित्य :-
१. २ कप भिजवलेले बासमती तांदूळ
२. ४ ते ५ चिकन थाईज
३. ४ ते ५ मोठे चमचे दही
४. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी १ चमचा
५. हिरवी मिरची १ किंवा २ 
६. लाल तिखट पावडर १ ते २ चमचे 
७. वेलची पूड २ चमचे
८. तळलेला कांदा १ कप
९. बारीक चिरलेला पुदिना १/२  कप
१०. बारीक चिरलेली कोथिंबीर १ कप 
११. हळद अर्धा चमचा 
१२. पातळ तूप अर्धी वाटी
१३. गरम मसाला पावडर २ चमचे
१४. लिंबाचा रस २ चमचे 
१५. मसाला वेलची १
१६. काळी मिरी ४ ते ५ 
१७. लवंगा ४ ते ५
१८. शाही जीरं 
१९. दालचिनी पेरभर 
२०. तमालपत्र मध्यम आकाराची 
२१. चवीनुसार मीठ 

कृती :-
प्रथम एका कढईमध्ये ५ कप पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळायला लागले की त्यात २ छोटे चमचे मीठ घालावे. मग तमालपत्र, मिरी, लवंग, दालचिनी, मसाला वेलची व शाही जीरं हे सर्व मसाले एका कपड्यात बांधून त्याची पुरचुंडी या पाण्यात सोडावी. अर्धा तास भिजलेले तांदूळ या पाण्यात घालून भात शिजू द्यावा. हा भात पूर्ण शिजवू नये. ३/४ भात शिजला की तो गाळून घ्यावा. मसाल्याची  पुरचुंडी काढून टाकावी. एकीकडे भात शिजेपर्यंत ज्या कढईमध्ये बिर्याणी करायची आहे त्यात चिकन मॅरीनेट करावं. यासाठी सरळ बुडाच पातेलं वापरावं. त्यामध्ये दही, हळद, तळलेल्या कांद्यामाधला अर्धा कांदा, तिखट, वेलची पूड मधली अर्धी पूड, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, अर्धा पुदिना व अर्धी कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक तुकडे करून, गरम मसाला १ चमचा व पातळ तुपातले ४ ते ५ चमचे तूप व चवीनुसार मीठ या सर्व गोष्टी एकत्र कराव्यात. हे मीठ केवळ या मासाल्यापुरते घालावे. भात आपण मीठ घालूनच शिजवत आहोत. हा मसाला तयार झाला की चिकन धुवून स्वच्छ करून थोडे मोठे तुकडे करून या मसाल्यात घालावे. चिकन बोन्ससहित असावे तसेच  थोडे बोनलेस तुकडे पण असावेत. हे  मॅरीनेट केलेलं चिकन किमान अर्धा तास ठेवावं. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आता हे पातेलं मध्यम आचेवर ठेवावा. या चिकनवर ३/४ शिजलेल्या भातामधला अर्धा भात घालावा. त्यावर २ चमचे तूप, थोडी वेलची पूड, गरम मसाला, पुदिना व कोथिंबीर व थोडा तळलेला कांदा हे सर्व घालावे. उरलेला भात घालून पुन्हा त्यावर राहिलेले तूप, राहिलेली वेलची पूड, राहिलेला सर्व तळलेला कांदा, गरम मसाला, पुदिना व कोथिंबीर घालावी. थोडे पाणी शिंपडून आच वाढवून पातेल्याला घट्ट झाकण लावावे. झाकणातून खूप  वाफ बाहेर यायला लागली की आच मध्यामाहून कमी करावी. या कमी आचेवर बिर्याणी २० मिनिटे शिजू द्यावी. चिकनला थोडा भाजल्याचा खुसखुशीतपणा येईल पण  आच कमी केली नाही तर चिकन खालून जळेल. तसे होऊ देऊ नये. २० मिनिटांनी झाकण उघडून हळुवार हाताने भात व चिकन एकत्र करावे व रायत्या सोबत ही गरम गरम बिर्याणी serve करावी

वाढणी :- २ ते ३ माणसे