२६ एप्रिल, २०१३

छोले राजमा सलाड


साहित्य :-
१. लाल सिमला मिरची 
२. भिजवून शिजवलेला राजमा 
३. भिजवून शिजवलेले छोले 
४. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा 
५. १ चमचा लिंबाचा रस 
६. अर्धा चमचा लाल तिखट किंवा १ बारीक चिरलेली हिरवी मिरची 
७. चवीनुसार मीठ 
८. अर्धा चमचा तेल 

कृती :-
राजमा व छोले वेगवगळे भिजववेत. ७ ते ८ तास भिजले की वेगवेगळे शिजवून घ्यावेत. शिजल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे. लाल सिमला मिरचीला हाताने थोडे तेल लावून घ्यावे. सिमला मिरची काट्याचमच्यामध्ये खोचावी व थेट आचेवर धरावी. मिरची सगळीकडून काळे डाग पडून भाजली गेली पाहिजे. असं झाल्यावर ती मिरची पाण्यात घालावी व जळालेला पापुद्रा काढून घ्यावा. सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर एका बाऊलमध्ये छोले, राजमा, कांदा, सिमला मिरची, तिखट किंवा हिरवी मिरची, लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावेत. हे सलाड खास वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी तर फारच उपयोगाचे आहे. 

वाढणी:- २ ते ३ माणसे 

२५ एप्रिल, २०१३

मसूर भात


साहित्य:-
१. भिजवलेले अक्खे मसूर १ कप 
२. उभा चिरलेला कांदा अर्धा कप 
३. किसलेलं आलं अर्धा चमचा 
४. हळद अर्धा चमचा 
५. धणे पूड १ चमचा 
६.जीरं पूड अर्धा चमचा 
७. बिर्याणी मसाला १ चमचा 
८. २ सुक्या लाल मिरच्या 
९. भिजवलेला तांदूळ दीड कप 
१०. चवीपुरते मीठ 
११. सजावटीसाठी कोथिंबिर 

कृती:-
मसूर ७ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात जीरं व मोहरीची फोडणी करावी. सुक्या लाल मिरच्या घालावयात.  मोहरी तडतडली की त्यात उभा चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतावा. आलं घालून पुन्हा परतावा.  मग त्यात  भिजवलेले मसूर घालावेत. थोडावेळ परतून मग त्यात हळद, धणे जीरं पूड व बिर्याणी मसाला घालावा.  तांदूळ कृती सुरु करण्यापूर्वी भिजवावेत. म्हणजे १५ मिनिटे तांदूळ पाण्यात भिजतील. सगळे मसाले घालून २ ते ३ मिनिटे मसूर परतले की मग त्यात भिजवलेला तांदूळ घालावा. तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून भात शिजवावा. भाताला उकळी आल्यावर आच मंद करून १० मिनिटे भात झाकण लावून शिजवावा. कोथिंबिर घालून हा भात दह्यासोबत किंवा रायत्या सोबत serve करावा . 

वाढणी :- २ ते ३ माणसे.