२९ ऑगस्ट, २०११

उकडीचे मोदक


साहित्य :-
१. १ वाटी पाणी
२. १ वाटी तांदुळाची पिठी
३. १ चमचा बटर किंवा तूप
४. चिमूटभर मीठ
५. ३ ते ४ चमचे तेल
६. अर्धी वाटी कोमट पाणी
७. १ वाटी ओलं खोबरं
८. १ वाटीपेक्षा थोडा कमी गूळ
९. १ चमचा वेलची पूड
१०. ड्रायफ्रुट्स (हवी असल्यास )
११. दीड चमचा खसखस

कृती :-
उकड :-
प्रथम १ वाटी पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आली की लगेचच त्यात मीठ व तूप घालावे. १ वाटी तांदळाची पिठी पहिले चाळून ठेवावी व पाण्याला उकळी आल्याआल्या लगेचच सर्व पिठी त्या पाण्यात घालावी. आच अगदी मंद करावी. पटापट पिठी पाण्यात एकत्र करावी. आच बंद करून झाकण लावून ही पिठी ठेवून द्यावी. ही अशीच कृती मायक्रोवेव्ह मधेही तुम्ही करू शकता. पहिले पाणी तूप व मीठ घालून १ मिनिटासाठी गरम करावे. चाळलेली पिठी घालून पुन्हा २ मिनिटे ठेवावे. उकड तयार.

सारण :-
आता सारण करून घ्यावे. हे देखील मायक्रोवेव्हमध्ये छान होते. एका मायक्रोवेव्हच्या भांड्यात प्रथम खसखस ४० ते ५० सेकंद भाजून घ्यावी. त्यात ओलं खोबरं व गूळ घालावं. पुन्हा ४० सेकंद ठेवावा. गूळ व खोबरं छान एकत्र करावं व हे सारण मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिटे ठेवावं. जर सारणातल पाणी आटलं नसेल तर काही सेकंद पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये ठेवावं. सारण तयार झाल्यावर वेलची पूड व ड्रायफ्रुट्स घालावीत. मिक्स करावं. हे सारण तुम्ही आचेवर शिजवत असाल तर आच मध्यम असावी. आणि सारणाच पाणी आटल्या आटल्या सारण भांड्यामधून काढावे.

मोदक :-
आता उकड व सारण या दोन्ही गोष्टी तयार झाल्या. आता मगाशी जी उकड बनवली आहे टी कोमट पाणी लावून छान मळून घ्यावी. त्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत. चीर नसेल अशाप्रकारे एक एक गोळा तयार करावा. मधोमध अंगठ्याने दाबून खळगा तयार करावा. बाकीच्या बोटांनी या गोळ्याला बाहेरून आधार देत अंगठ्याने आटल्या बाजूला हलकासा जोर लावून वाटीसारखा आकार तयार करावा. त्याला छान काळ्या पाडाव्यात. मध्ये सारण भरावे व हळुवार पणे कळ्या दुमडणार नाहीत अशी काळजी घेऊन मोदक बंद करावा.
हाताने मोदक बनवणे ही एक कला आहे. जर हाताने मोदक बनवायला अवघड वाटत असतील आणि मोदकाचा साचा उपलब्ध असेल तर साच्याचा वापर करूनच मोदक बनवावेत. त्यासाठी साच्याला थोडेसे पाणी व तेल लावून घ्यावे. साचा बंद करून उकडीचा छोटा गोळा साच्यात भरावा. साच्यात सर्व बाजूनी तो गोळा पसरवून घ्यावा. सारण भरावे व एक चकती खालच्या बाजूने लावून हळू हळू साचा उघडावा.
हे तयार होणारे मोदक ओलसर कापडाखाली ठेवावेत म्हणजे उकड बाहेरून कोरडी पडणार नाही व मोदक फुटणार नाहीत.

अशाप्रकारे मोदक तयार झाले की इडली पात्रात १० मिनिटे उकडून घ्यावेत. तुमच्याकडे राइस कुकर असेल तर त्यातही जाळीच्या ताटलीवर मोदक छान उकडले जातात. असे गरम गरम मोदक साजूक तूप घालून serve करावेत.

वाढणी :- वरील साहित्यात साधारण ५ ते ६ मध्यम आकाराचे मोदक तयार होतील.
गोडाचे

२८ ऑगस्ट, २०११

पेढा



साहित्य :-
१. ४ कप दूध
२. १/४ कप लिंबाचा रस
३. १/३ कप मिल्क पावडर
४. १/३ कप दूध
५. १/२ कप साखर
६. १ चमचा वेलची पूड
७. चिमूटभर केशर
८. ३ ते ४ चमचे बटर

कृती :-
प्रथम ४ कप दुधाचे पनीर बनवून घ्यावे. मग नॉनस्टिक कढईमध्ये प्रथम बटर वितळून घ्यावे. सतत ढवळावं म्हणजे बटर करपणार नाही. बटर वितळल्यावर पहिले दूध घालावं. लगेचच मिल्क पावडर व पनीर घालावं आणि सतत ढवळत राहावं. हे मिश्रण कढईला खाली लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. मध्यम आचेवर हे मिश्रण साधारण १० ते १२ मिनिटे आटवल्यावर त्याचा गोळा तयार होईल. केशर घालून थोडावेळ परत ढवळावे. हे मिश्रण ढवळताना डावाने सतत दाबत राहावे जेणेकरून अतिशय मऊ खवा तयार होईल. खवा तयार झाला की तो एका बाउलमध्ये काढून घ्यावा. थोडा गार झाला की मग तयार साखर व वेलची पूड घालून थोडा मळून घ्यावा. या मळलेल्या गोळ्याचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे पेढे बनवावेत.

वाढणी :- या साहित्यात साधारण १२ ते १५ पेढे होतील.

२६ ऑगस्ट, २०११

मलई बर्फी



साहित्य :-
१. ४ कप दूध
२.  पाव  कप साखर
३. अर्धा चमचा वेलची पूड
४. पिस्ते व बदाम सजावटीसाठी
कृती:-
२ कप दुधाचे प्रथम पनीर बनवून घ्यावे.(पनीरची कृती blog वर नक्की पहावी.) मलई बर्फी साठीचं पनीर ताजंच बनवावं. पनीर कापडामध्ये गाळल्यावर फ्रीजमध्ये ठेवू नये. उरलेलं २ कप दूध आटवत ठेवावं. साधारण २ कप दुधाचं १ कप दूध होईपर्यंत आटवावं. दूध आटलं की त्यात हे ताजं पनीर घालावं. सतत ढवळावं. दूध आटून छान मिळून येईपर्यंत शिजवावं. त्याचा छान गोळा तयार होतो .गोळा बनत आला की त्यात साखर घालावी. साखर घातल्यावर मिळून आलेला गोळा थोडा परत पातळ होतो. त्यात वेलची पूड घालावी व आवडत असेल तर केशरही घालावे. केशर घातल्यावर बर्फीचा रंग अगदी पांढरा राहणार नाही. त्यानंतर २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावं व तो गोळा एका तूप लावलेल्या ताटलीवर थोडा जाडसर पसरावा. त्यावर चांदीचा वर्ख लावून पिस्ते व बदामाचे कप लावून सजवावे व तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात. मलई बर्फी तयार.
वाढणी:- या साहित्याच्या साधारण १० ते १२ बर्फी बनतील.

२५ ऑगस्ट, २०११

पनीर


साहित्य :-
१. ४ कप दूध
२. १/४ कप लिंबाचा रस
३. अर्धा कप पाणी

कृती :-
जाड बुडाच्या पातेल्यामध्ये दूध उकळत ठेवावे. दूध पातेल्याला खाली चिकटणार नाही याची सतत काळजी घ्यावी. आच मध्यम असू द्यावी. दुधाला उकळी आली की आच मंद करावी. लिंबू रस पाण्यामध्ये एकत्रित करून हळूहळू उकळी आलेल्या दूधात घालावे. दूध सतत ढवळावे. थोडेसे ढवळल्यावर पनीर व पाणी वेगवेगळे होताना दिसू लागेल. आच बंद करावी. थोडासा वेळ दूध ढवळावे. एका चाळणीत एक पातळ कापड घालून हे पनीर गाळून घ्यावे. (गाळून शिल्लक राहिलेले पाणी पोळीची कणिक मळायला वापरले जाऊ शकते.) या गाळलेल्या पनीर वर गार पाणी सोडावे. गार पाणी सोडल्याने पनीर घट्ट होत नाही. कापदातले पनीर घट्ट पिळून घ्यावे. कापडासकट एका परातीत ठेवून त्यावर वजनदार असे काहीही ठेवावे. म्हणजे पनीर मधील उरले सुरले पाणी देखील निघून जाईल. ५ ते १० मिनिटांनी या पनीरचे तुम्हाला हवे तसे तुकडे करावेत.

१९ ऑगस्ट, २०११

फ्लॉवर बटाटा रस्सा



साहित्य :-
१. मध्यम आकाराचे २ बटाटे
२. फ्लॉवरची मध्यम आकाराची ८ ते १० फुले
३. अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला
४. छोटा टोमॅटो बारीक चिरलेला
५. पाव चमचा हळद
६. १ चमचा तिखट
७. १ चमचा प्रत्येकी धना जीरं पूड
८. १ चमचा गोडा मसाला
९. ५ ते ६ कढीपत्ते
१०. चवीपुरते मीठ

कृती:-
प्रथम एका कढईमध्ये तेल तापवावे व त्यात मोहरी व जीरं घालून फोडणी करावी. जीरं मोहरी तडतडले की त्यात कढीपत्ते घालावेत. हळद घालून थोडंसं परतावं व बारीक चिरलेला कांदा घालावं. कांदा मऊ होईपर्यंत परतावा व त्यात बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घालाव्यात. बटाटा तेलावरच थोडासा शिजवावा. मग अर्ध्या शिजलेल्या बटाट्यामध्ये तिखट, धणे जीरं पूड, मसाला घालावा. फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे घालावेत व अगदी कमी पाणी घालून रस्सा शिजवत ठेवावा. रस्सा पूर्ण शिजवून मग त्यात जितकं हवं आहे तितकं पाणी व चवीपुरतं मीठ घालून रस्सा २ ते ३ मिनिटे शिजू द्यावा. कोथिंबीर पेरून हा रस्सा पोळी किंवा भातासोबत serve करावा.

वाढणी :- २ ते ३ माणसे

११ ऑगस्ट, २०११

नारळी भात


साहित्य :-
१. बासमती तांदूळ १ कप
२. २ चमचे तूप
३. ४ ते ५ लवंगा
४. २ ते २ १/२ कप पाणी
५. किसलेला गूळ १ कप
६. पाव चमचा वेलची पूड
७. अर्धा कप खवलेला नारळ

कृती :-
प्रथम तांदूळ धुऊन १५ मिनिटं भिजवून ठेवावेत. एका कढईमध्ये २ चमचे तूप घ्यावे. तूप तापले की त्यात लवंगा घालाव्यात. तुपामध्ये लवंगा फुगल्या की त्यात भिजवलेले तांदूळ घालावेत व २ ते ३ मिनिटे परतावेत. तांदूळ परतला गेला की त्यात प्रथम २ कप पाणी घालून झाकण लावावे व भात छान शिजू द्यावा. आवश्यक वाटल्यास पुन्हा थोडे पाणी घालावे. भात मऊ शिजला की त्यात किसलेला गूळ घालावा. गूळ घातल्यावर भात परत थोडा पातळ होईल. तो पातळपणा पूर्ण आटला की मग त्यात नारळ घालून ५ मिनिटं शिजू द्यावा. या भाताच्या मुदी करून गरम गरम serve कराव्यात.

वाढणी :- २ ते ३ माणसे

३ ऑगस्ट, २०११

बीट रूट मंचुरियन


साहित्य :-
१. १ बीट किसून
२. १ गाजर किसून
३. अर्धी वाटी फ्लॉवर बारीक चिरलेला
४. अर्धी वाटी श्रावण घेवडा बारीक चिरलेला
५. २ वाट्या उभा चिरलेला कोबी
६. पाव वाटी उभी चिरलेली सिमला मिरची
७. अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा
८. २ ते ३ चमचे मैदा
९. ४ चमचे कोर्नफ्लोवर किंवा तांदुळाची पिठी
१०. ४ ते ५ चमचे सोय सॉस
११. ३ ते ४ चमचे टोमॅटो केचप
१२. अर्धा चमचा चिली सॉस
१३. तळणीसाठी तेल


कृती :-
प्रथम किसलेले गाजर, बीट,बारीक चिरलेला श्रावण घेवडा, फ्लॉवर, मैदा व तांदुळाची पिठी सर्व गोष्टी एकत्र कराव्यात. एका कढईमध्ये तेल तापवावे व या मिश्रणाचे गोळे करून ते तेलावर छान तळून घ्यावेत. प्रथम एक गोळा करून तळून बघावा. तो जर तेलात फुटला नाही तर इतर गोळे करून घ्यावेत. जर तो तेलात फुटला तर थोडी तांदुळाची पिठी वाढवावी. हे गोळे तयार झाले की ते एका kitchen towel वर काढून घ्यावेत. म्हणजे त्यातल जास्तीच तेल निघून जाईल. कढईमध्ये अगदी कमी तेल घेऊन ते गरम झाले की पहिले कांदा घालावा. मग कोबी, सिमला मिरची व कांद्याची पात घालावी. ह्या भाज्या थोड्या मऊ झाल्या की त्यात बीटाचे गोळे अर्थात मंचुरियन घालावेत. अगदी अलगत ते सर्व एकत्र करावं. त्यात सोय सॉस, केचअप व चिली सॉस घालून छान एकत्र करावं. पुन्हा १ चमचा कोर्नफ्लोवर घेऊन ते पाण्यात विरघळवून घ्यावा व भाजीमध्ये घालाव त्याने ही भाजी छान मिळून येईल. एक २ मिनिटे ही भाजी परतून मग एका bowl मध्ये काढावी व कांद्याची पात भुरभुरून भाजी गरम गरम serve करावी.

वाढणी :- ३ ते ४ माणसे