८ नोव्हेंबर, २०१२

रव्याचे पॅनकेक


साहित्य :-
१. २ कप रवा 
२. पाऊण कप दही 
३. अर्धा कप पाणी 
४. १ छोटं गाजर किसून 
५. अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी 
६. बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा तिखट चवीनुसार 
७. चवीनुसार मीठ 
८. फ्रुट सॉल्ट १ चमचा 
९. १ चमचा किसलेलं  आलं 

कृती :-
एका बाऊलमध्ये रवा, दही व पाणी एकत्र करून घ्यावे व अर्धा तास ठेवून द्यावे. अर्ध्या तासाने त्यात किसलेलं गाजर, चिरलेला कोबी, आलं, मिरची किंवा तिखट आणि चवीनुसार मीठ सर्व घालून मिश्रण छान एकजीव करावं.  त्यात एक चमचा  फ्रुट सॉल्ट घालून लगेचच त्यावर ४ ते ५ चमचे पाणी घालावं. त्याने  फ्रुट सॉल्ट फसफसेल. यानंतर अतिशय हलक्या हाताने हे बॅटर एकजीव करावे. हे बॅटर डोश्याच्या बॅटरपेक्षा थोडे घट्ट असते. आता एका पॅनमध्ये छोटे छोटे पॅनकेक घालावेत व मध्यम आचेवर तेल सोडून परतून घ्यावेत. हे पॅनकेक लहान मुलांसाठी अतिशय healthy आहेत. कुठल्याही हिराव्या चटणीसोबत खावयास द्यावेत.

हे पॅनकेक लाल टोमॅटोच्या हिरव्या चटणीसोबत अतिशय चविष्ट लागतात. या चटणीची कृती ब्लोगवर नक्की पहा.

वाढणी :- वरील साहित्यात ८ ते १० छोटे पॅनकेक होतील.

करंजी


साहित्य :-
१. २ कप खोवलेलं ओलं खोबरं 
२. २ कप + १/४ कप साखर (ज्यांना कमी गोड आवडतं त्यांनी जेवढं खोबरं त्यापेक्षा थोडी कमी साखर घ्यावी.)
३. अर्धा चमचा वेलची पूड 
४. १ कप मैदा 
५. २ चमचे बारीक रवा 
६. ४ चमचे तुपाचे मोहन 
७. चिमुटभर मीठ 

कृती:-
मैदा व रवा एकत्र करून त्यात तुपाचे मोहन व चिमुटभर मीठ घालावे. हे सगळे तूप मैद्यामध्ये एकजीव करून घ्यावे. थोडं थोडं पाणी किंवा दुध घालत घट्ट कणिक मळून घ्यावी. ही कणिक झाकून ठेवावी. खोबरं व साखर एकत्र करून शिजायला ठेवावं. मध्यम आचेवर हे मिश्रण सतत ढवळत शिजवावं. हे सारण थोडं दाट व्हायला लागेल. कढईच्या कडा सुटायला लागल्या की सारण तयार झालं. हे सारण गार होऊ द्यावं. मग मैद्याची मळलेली कणिक घेऊन ती पुन्हा एक ५ मिनिटे छान मळून घ्यावी. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. एक गोळा घेऊन तो पुरीसारखा लाटून घ्यावा. त्यात खोबऱ्याचे सारण भरून अर्धगोलामध्ये कारंजी बंद करून घ्यावी. या बंद बाजूला कातण्याने अगदी बाहेरच्या बाजूने कापून घ्यावे. कातण नसेल तर काटेचमच्याने बंद बाजू दाबून घ्यावी. या तयार करंज्या ओलसर फडक्याखाली ठेवाव्यात. कढईमध्ये तेल तापवून या करंज्या बदामी रंगावर परतून घ्याव्यात. करंज्या केल्या की नेहेमी एखादा मोदक करावा.

वाढणी :- या साहित्याच्या १२ ते १५ करंज्या होतील.

पातळ पोह्यांचा चिवडा


साहित्य :-
१. ३ कप पातळ पोहे 
२. १ कप चुरमुरे 
३. १० ते १२ कढीपत्त्याची पाने 
४. मुठभर दाणे 
५. मुठभर डाळं 
६. चवीनुसार हिरव्या मिरच्या 
७. अर्धा चमचा हिंग 
८. १ चमचा साखर 
९. तेल व फोडणीचे साहित्य 
१०. चवीनुसार मीठ 
११. १ चमचा हळद 

कृती:-
प्रथम पातळ पोहे चाळणीतून हलक्या हाताने चाळून घ्यावेत. एका कढईमध्ये हे पातळ पोहे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावेत. एका वर्तमानपत्रावर पोहे काढून घ्यावेत. चुरमुरे देखील थोडे परतून घ्यावेत व पोह्यांवर घालावेत. मग कढईमध्ये भरपूर तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची व हळद  हे सर्व घालून फोडणी करून घ्यावी. त्यात दाणे व डाळं घालून ते परतलं गेलं की ही फोडणीदेखील पोह्यांवर घालावी. मग त्यात साखर व मीठ घालून हलक्या हाताने सर्व पदार्थ मिक्स करावेत. या पोह्यांमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप सोनेरी रंगावर तळून घालतात. फोडणी करायच्या आधी हे खोबरं तळून पोह्यांवर घालावं. अतिशय खरपूस चिवडा तयार. चुकून जर मिठाचा अंदाज चुकला व चिवडा खारट झाला तर थोडे चुरमुरे भाजून घालावेत. खारटपणा कमी होतो.

वाढणी  :- ४ ते ५ माणसे 

रवा खोबरं लाडू


साहित्य :-
१. २ कप बारीक रवा 
२. अर्धा कप किसलेलं ओलं खोबरं 
३. अडीच कप साखर 
४. थोडं पाणी पाक बनवण्यासाठी 
५. १ चमचा वेलची पूड 
६. चिमुटभर केशर 
७. अर्धी ते पाउण वाटी तूप 
८. बेदाणे 

कृती :-
प्रथम एका पातेल्यात तूप गरम करून त्यावर रवा मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावा.  मग त्यात किसलेलं ओलं खोबरं घालून पुन्हा थोडावेळ परतून घ्यावं. खोबरं घातल्यावर रवा थोडा फुलायला लागेल. एक ५ ते १० मिनिटे परतल्यावर आच बंद करावी. रवा भाजून घेईपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये साखर घेऊन ती बुडेल इतपत पाणी घालून १ तरी पाक करायला ठेवावा. एकतरी पाक व्हायला साधारणपणे १० ते १५ मिनिटे लागतील. पाक थोडा दाटसर झाला की कणभर पाक दोन बोटांमध्ये धरून त्याला एक तार येते का ते बघावे. तसे झाल्यास पाक तयार झाला असे समजावे. मग त्यात वेलची पूड व केशर घालावे. केशर आधी घातले तर पाकाचा रंग बदलतो म्हणून पाक तयार झाला की केशर घालावे. मग या पाकामधे भाजलेलं रवा खोबरं घालून मिश्रण छान मिक्स करून घ्यावं. या क्षणी हे मिश्रण खूप सैलसर वाटेल पण हे लाडू लगेच वळायचे नसतात. लाडवाचं मिश्रण तयार झालं  की  ते २ ते ३ तास ठेवावं. ३ तासाने हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं असेल. फक्त या २ ते ३ तासात मिश्रण मधून मधून ढवळून घ्यावं. आता घट्ट झालेल्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळावेत व सजावटीसाठी त्यावर बेदाणे लावावेत.

वाढणी :- या साहित्याचे १६ ते २० लाडू तयार होतील.

शंकरपाळी


साहित्य :-
१. १ कप दूध 
२. १ कपापेक्षा थोडीशी जास्त साखर 
३. १ कप तूप 
४. चिमुटभर मीठ 
५. मैदा साधारणपणे ३ ते ४ कप 
६. तळणीसाठी तेल 

कृती:-
एका पातेल्यामध्ये दुध, साखर व तूप एकत्र करून गरम करण्यास ठेवावे. त्यात चिमुटभर मीठ घालावे. या मिश्रणाला उकळी आली की आच बंद करून त्यात हळू हळू मैदा घालण्यास सुरुवात करावी. अगदी पोळीच्या कणकेसारखी पातळ कणिक तयार झाली की ती झाकून ठेवावी. २ ते ३ तासांनी ही कणिक घट्ट झालेली असेल. आता ही कणिक पुन्हा थोडी मळून  घ्यावी. मळताना जर असे वाटले की कणिक परातीला किंवा ओट्याला चिकटत आहे तर त्यात २ चमचे तांदुळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोर घालावे व कणिक मळावी. मग या कणकेचे मोठो गोळे करून ते पराठ्याप्रमाणे जाडसर लाटून घ्यावेत. कातण्याने किंवा सुरीने या लाटलेल्या पोळीचे चौकोनी तुकडे करावेत. या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्याव्यात. सगळ्या कणकेच्या शंकरपाळ्या तयार झाल्या की तेलामध्ये हळूहळू थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडून सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. शंकरपाळ्या सोनेरी झाल्या की लगेचच तेलातून काढाव्यात. तेलातून काढल्यानंतर देखील त्या थोड्या जास्त रंग पकडतात. शंकरपाळ्या तळताना तेल कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर शंकरपाळ्या तेलात विरघळू शकतात.


वाढणी :- या साहित्याच्या मध्यम आकाराचा डबा भरेल एवढ्या शंकरपाळ्या होतील.