६ डिसेंबर, २०१२

पनीर पुलाव


साहित्य :-
१. १ कप भिजवलेला बासमती तांदूळ 
२. १ कप चौकोनी कापलेले पनीर 
३. अर्धा चमचा किसलेलं आलं
४. अर्धा चमचा किसलेलं लसूण 
५. अर्धा ते १ चमचा वाटलेली हिरवी मिरची 
६. १ चमचा गरम मसाला 
७. २ चमचे दही 
८. ३ चमचे टोमॅटो केचअप 
९. चिरलेली कोथिंबीर 
१०. चवीनुसार मीठ 
११. अर्धा कप उभा चिरलेला कांदा 
१२. फोडणीसाठी तेल व बटर प्रत्येकी १ चमचा 
१३. २ कप गरम पाणी 
१४. चिमुटभर साखर 

कृती:-
प्रथम कुकरमध्ये थोडं तेल व बटर घालावं. दोन्ही तापलं की मग त्यात कांदा घालावा. कांदा मऊ होईपर्यंत परतावा. मग त्यात आलं, लसूण, व हिरवी मिरची घालावी. छान मिक्स करून घ्यावे. मग त्यात टोमॅटो केचअप घालावे. थोडा परतून लगेचच भिजवलेला तांदूळ घालावा. परतून घ्यावे. मग पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करावे. गरम पाणी घालून तांदूळ नीट ढवळून घ्यावा. मग त्यात मीठ, दही व गरम मसाला घालावा. चिमुटभर साखर घालावी व ढवळून घेऊन पाण्याची चव घेऊन बघावी. कुकरचे झाकण लावून २ शिट्ट्या करून घ्याव्यात. कुकरची वाफ दडपली की भात हलक्या हाताने मोकळा करून घ्यावा. serve करताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

वाढणी :- ३ ते ४ माणसे 

५ डिसेंबर, २०१२

बटाटा वडा सांबार


वड्यासाठीचे साहित्य :-
१. उकडलेले बटाटे ३ ते ४
२. २ हिरव्या मिरच्या 
३.  आलं, लसूण प्रत्येकी २ चमचे
४. कोथिंबीर 
५. चवीनुसार मीठ 
६. अर्धा कप डाळीचं पीठ 
७. अर्धा चमचा तिखट 
८. पाव चमचा खायचा सोडा 
९. चवीनुसार मीठ 
१०. १ ते सव्वा कप पाणी 

सांबारचे  साहित्य :-
११. १ कप भिजवलेली तुरीची डाळ 
१२. १ ते २ लहान वांगी 
१३. पाव कप चिरलेला दुध्या 
१४. ४ ते ५ भेंड्या 
१५. अर्धा कप उभा चिरलेला कांदा 
१६. १ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून
१७. अर्धा चमचा तिखट 
१८. १ चमचा धणे पूड 
१९. अर्धा चमचा जीरं पूड 
२०. १ चमचा सांबार मसाला 
२१. अर्धा चमचा हळद 
२२. कढीपत्त्याची पाने 
२३. शेवग्याच्या शेंगा २

कृती :-
उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, आलं व लसूण वाटून घालावं. त्यात चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. त्याचे गोळे करून घ्यावेत. डाळीच्या पिठात तिखट, मीठ, सोडा व हळद घालावी. थोडं थोडं पाणी घालत दाटसर असा घोळ बनवून घ्यावा. गुठळ्या होऊ देऊ नयेत. ५ मिनिटे थांबून मग वडे करायला घ्यावेत. कढईमध्ये तेल तापवावे. बटाट्याचा प्रत्येक गोळा डाळीच्या पिठामध्ये घोळवून तेलात सोडवा. मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर वडे टाळून घ्यावेत. तोवर कुकरमध्ये तेल तापवावे. त्यात मोहरी,कढीपत्ता व हळद घालून फोडणी करावी. त्यात कांदा मऊ होईपर्यंत परतावा. धणे जीरं पूड, तिखट, सांबार मसाला व रंगासाठी पाप्रिका घालावं. मसाला थोडा परतून त्यात टोमॅटो घालावेत. ते परतले की मग भाज्या घालाव्यात. तुरीची भिजवलेली डाळ त्यात घालावी. शेवग्याच्या शेंगाही घालाव्यात. डाळीच्या दुप्पट पाणी घालावं व मीठ घालून कुकर बंद करावा व ३ शिट्ट्या करून घ्याव्यात. सांबार तयार झाला की त्याचा दाटपणा तपासून घ्यावा. आवश्यक वाटल्यास थोडं पाणी घालून सांबार पुन्हा उकळून घ्यावं. आता एका बाऊल मध्ये पहिले वडा घालून त्यावर सांबार घालावा. वरून कोथिंबीर व शेव घालून गरम गरम serve करावे.

थंडीच्या दिवसात किंवा पाऊस पडत असताना असा गरम गरम वडा सांबार अधिकच चविष्ट लागतो.

वाढणी:- २ ते ३ माणसे.