२६ जुलै, २०११

मशरूम पनीर कबाब


साहित्य :-
१. १० ते १२ मशरूम
२. १० ते १२ पनीरचे चौकोनी तुकडे
३. १ सिमला मिरची
४. १ टोमॅटो
५. १ कांदा
६. १ चमचा आलं
७. ४ ते ५ लसूण पाकळ्या
८. ३ ते ४ मिरच्या
९. १ चमचा जीरं पूड
१०. १ चमचा गरम मसाला
११. १ चमचा चाट मसाला
१२. १ चमचा मध
१३. १ चमचा लिंबू रस
१४. चवीनुसार मीठ
१५. ३ ते ४ स्क्युअर्स

कृती :-
कांदा, सिमला मिरची, टोमॅटो या सर्वांचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मशरूम जर अख्खा वापरायचा असेल तर त्याचा केवळ देठ काढून टाकावा. नाहीतर त्याचेही चौकोनी तुकडे करावेत. आलं लसूण आणि मिरची वाटून त्याची पेस्ट बनवावी. त्यामध्ये जीरं पूड, गरम मसाला, चाट मसाला, मध, लिंबू रस, व मीठ घालून चिरलेल्या सर्व भाज्या त्यात घालाव्यात. छान मिक्स करून ३० मिनिटे ठेवावे. लाकडाचे स्क्युअर्स १५ मिनिटे पाण्यात भिजवावेत. म्हणजे तव्यावर वा ओवन मध्ये ते जळणार नाहीत. या स्क्युअर्सना एकामागे एक भाज्या लावून तव्यावर वा कोळशाच्या आचेवर खरपूस भाजाव्यात. छान चटपटीत कबाब तयार.


वाढणी :- २ ते ३ माणसे.

२२ जुलै, २०११

इडली


इडलीसाठी साहित्य :-
१. २ कप इडलीचा तांदूळ किंवा इडली रवा
२. १ कप उडदाची डाळ
३. अर्धा कप जाड पोहे

कृती :-
इडलीचा तांदूळ किंवा रवा आणि उडदाची डाळ वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये भिजवावी. साधारण ७ ते ८ तास या दोन्ही गोष्टी भिजणं गरजेचं आहे. तांदूळ व डाळ भिजवताना पाणी थोडं जास्तच ठेवावं. ८ तासांनंतर अर्धा कप जाड पोहे घेवून ते पाण्यात भिजवावेत. जाड पोह्यामुळे इडली हलकी व्हायला मदत होते. १० ते १५ मिनिटांनी सर्व जिन्नस मिक्सरमधून वाटावेत. मिक्सरमधून वाटताना तांदूळ व डाळ यातील पाणी वेगळं काढावं व अगदी वाटताना लागेल तेवढंच पाणी घालावं. मिक्सरमधून काढलेलं पीठ एका मोठ्या पातेल्यात ठेवावं. नीट ढवळून घ्यावं. पातेल्यामध्ये पीठ फुगायला थोडी जागा असेल एवढं मोठं पातेलं घ्यावं. हे पीठ थोडं दाट असावं. मिक्सरमधून पीठ काढून एकत्रं केलं की त्यात मीठ घालावं व पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवावं. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी फर्मेंट करायला ठेवलेलं पीठ ७ ते ८ तासात तयार होतं. इडलीच पीठ सर्वसाधारणपणे दुप्पट होतं. पण थंडीच्या दिवसात मात्र पीठ फर्मेंट व्हायला १२ ते १५ तास लागू शकतात. पीठ फर्मेंट झालं की लगेचच इडली करायला घ्यावी. पीठ जास्त ढवळू नये. इडली करण्यासाठी इडली पात्रात किंवा कुकरमध्ये एक पेर बुडेल एवढं पाणी घ्यावं व इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून तो साचा भरेल एवढं पीठ त्यात घालावं. सर्व साच्यात पीठ भरलं की ते इडली पात्रात ठेवावे व १० मिनिटे उकडावे. जर कुकरमध्ये साचा ठेवत असाल तर कुकरची शिट्टी आठवणीने काढून ठेवावी. चमच्याने किंवा सुरीने इडल्या उचलून घ्याव्यात.
सांबार व चटणी सोबत गरम गरम इडली serve करावी.

वाढणी :- ३ ते ४ माणसे.

१९ जुलै, २०११

पाणी पुरी


पुरीसाठीचे साहित्य :-
१. ३/४ कप रवा
२. १/४ कप मैदा
३. जवळपास अर्धा कप पाणी

कृती:-
वरील साहित्याचा पोळीच्या कणकेपेक्षा थोडा घट्ट गोळा भिजवावा. एक ओलसर कापड घेऊन हा गोळा त्याने झाकावा. साधारण १५ मिनिटांनी या गोळ्याचे समान भाग करून मोठी पोळी लाटावी. एका छोट्याशा वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्याव्यात. त्या देखील ओलसर कपड्यात झाकून ठेवाव्यात. सगळ्या पुऱ्या तयार झाल्या की गरम तेलामध्ये पुऱ्या तळाव्यात. पुऱ्या तळताना झाऱ्याने त्या तेलात खाली दाबाव्यात. म्हणजे पुऱ्या फुगायला मदत होईल.

अशाप्रकारे पुऱ्या तयार झाल्या की पाणीपुरीचे झणझणीत पाणी बनवावे.

पाणीपुरीचे पाणी
साहित्य :-
१. १ कप पुदिन्याची पानं
२. १ कप कोथिंबीर
३. २ ते ३ मिरच्या
४. ३ चमचे चिंचेचा कोळ
५. ३ चमचे लिंबू रस
६. १ चमचा जीरं पूड
७. १/४ चमचा काळी मिरी पावडर
८. १ चमचा काळं मीठ
९. १/४ चमचा सुंठ पूड
१०. १ चमचा मीठ
११. पाव चमचा हिंग

कृती :-
वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून काढावेत. ही पेस्ट गाळून घ्यावी. गाळलेल्या पाण्यात अजून ३ कप पाणी मिसळावे. मिठाचा अंदाज पुन्हा एकदा घ्यावा. पाणीपुरीचे पाणी तयार!!

पाणीपुरीमध्ये पुऱ्या व पाणी हे दोन महत्वाचे टप्पे आपण बघितले. याशिवाय अजूनही काही तयारी करावी लागते. पांढरे वाटाणे साधारण ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावेत. ज्या पाण्यात हे वाटाणे भिजवले आहेत त्या पाण्यासाहित कुकरमध्ये हळद व मीठ घालून हे वाटाणे उकडावेत. पाणीपुरी serve करताना पुरीला मधोमध भोक पडावे व त्यात उकडलेले पांढरे वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिंचेची गोड चटणी, बारीक शेव, कोथिंबीर व सर्वात शेवटी पाणीपुरीचे पाणी घालावे. इतर सर्व जिन्नस पुरीमध्ये घालून केवळ चिंचेची गोड चटणी आणि पाणीपुरीची चटणी वेगवेगळ्या वाट्यांमध्ये देऊनही पाणी पुरी serve करता येते.

चिंचेच्या गोड चटणीची कृती blog वर जरूर पहावी.
वाढणी :- ३ ते ४ माणसे.

चिंचेची गोड चटणी




साहित्य :-
१. २ चमचे चिंचेचा कोळ
२. २ कप कोमट पाणी
३. १/२ कप किसलेला गूळ
४. १ चमचा मीठ
५. १ चमचा गरम मसाला
६. १ चमचा तिखट
७. १ चमचा जीरं पूड
८. १ चमचा बडीशेप पावडर

कृती :-
२ कप कोमट पाण्यात २ चमचे चिंचेचा कोळ मिक्स करून घ्यावा.गूळ घालून पुन्हा एकजीव करावे. एका पातेल्यात हे मिश्रण घेवून शिजवत ठेवावे. उकळी आली की त्यात इतर सर्व जिन्नस घालावेत. मध्यम आचेवर हे मिश्रण उकळत ठेवावे. सतत ढवळावे. हे मिश्रण ज्या डावाने ढवळत आहात त्या डावाला हे मिश्रण चिकटू लागले की ही चटणी तयार झाली असे समजावे. सुरुवातीच्या पातळपणापेक्षा ही चटणी बरीच दाट होते.
ही चटणी भेळ, पाणीपुरी, सामोसा चाट, रगडा पॅटीस यासारख्या कुठल्याही चाट प्रकारात वापरता येते.

१३ जुलै, २०११

जीरा राईस


साहित्य :-
१. १ वाटी बासमती तांदूळ
२. ३ वाट्या पाणी
३. जीरं १ चमचा
४. कोथिंबीर
५. १ ते २ चमचे तेल.
६. चवीनुसार मीठ

कृती:-
प्रथम बासमती तांदूळ धुवून घ्यावा. जीरा राईस करण्यासाठी तसा कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरता येऊ शकतो. पण बासमतीचा स्वाद काही निराळाच येतो. हा भिजवलेला तांदूळ पाणी घालून शिजवत ठेवावा.चवीनुसार मीठ घालावे. प्रथम मोठ्या आचेवर तांदूळ शिजवावा. त्याला जो स्टार्च येईल तो वरचे वर काढून घ्यावा. भात पूर्ण शिजला की उरलेला पाणी गाळून घेऊन भात गार होऊ द्यावा. भात गार झाला की मग एका कढईमध्ये तेल तापवावे त्यात जीरं घालावं व शिजलेला भात घालून छान मिक्स करून घ्यावा. वरून कोथिंबीर पेरून गरम गरम serve करावं.

वाढणी :- २ ते ३ माणसे

नवरत्न कुर्मा



साहित्य :-
१. अर्धी वाटी श्रावण घेवडा
२. अर्धी वाटी गाजर
३. अर्धी वाटी बटाटा
४. अर्धी वाटी मटारचे दाणे
५. पाव वाटी सिमला मिरची
६. अर्धी वाटी पनीर
७ . मध्यम आकाराचा कांदा
८ . १ चमचा आलं
९ . १ चमचा लसूण
१० . ८ ते १० काजू
११ . अर्धा चमचा तिखट
१२ . अर्धा चमचा गरम मसाला
१३. पाव चमचा हळद
१४. पॅपरीका
१५. अर्धा कप heavy whipping cream
१६. पाव चमचा जीरं
१७. १ वाटी टोमॅटो प्युरे
१८. अननस, सफरचंद, द्राक्षं प्रत्येकी ३ ते ४ चमचे
१९. बेदाणे ३ ते ४ चमचे

कृती :- मसाला
प्रथम तेलावर चिरलेला कांदा, चिरलेला आलं, लसूण व काजू परतून घ्यावेत. हा मसाला मिक्सरमधून बारीक वाटावा. हा मसाला बनवून ठेवला तर फ्रीज मध्ये साधारण २ ते ३ आठवडे चांगला टिकतो व पनीर- मटर, मशरूम- मटर, कोफ्ता करीची करी बनवण्यासाठी वापरता येतो.

भाजीची कृती :-
सर्व भाज्या चौकोनी कापून घ्याव्यात. एका कढईमध्ये मध्यम आचेवर तेल तापवून घ्यावे. मग या तेलावर प्रथम भाज्या परतून घ्याव्या. कढईच्या मधोमध जागा करून पनीर चे चौकोनी तुकडे त्यात घालावेत व परतून घ्यावे. पनीर तळू नये. पनीर पहिले तळून घेतलं तर त्याचा मऊपणा जाऊन ते चिवट होतं. मग त्यात वरील मसाला घालावा. थोडावेळ परतून मग टोमॅटो प्युरे घालावी. थोडसं पाणी घालून भाजी थोडावेळ शिजवावी. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला, पॅपरीका व मीठ घालून भाजी सारखी करून घ्यावी. भाजी पूर्ण शिजली की मग त्यात अननस, सफरचंद व द्राक्षं घालावीत. बेदाणे घालून भाजी परत शिजू द्यावी. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालावे. सर्वात शेवटी whipping cream घालून भाजी अजून २ मिनिटं शिजवावी. ही भाजी पोळी सोबत किंवा जीरं राइस सोबत अतिशय छान लागते.

वाढणी :- २ ते ४ माणसे

८ जुलै, २०११

कणकेचे चविष्ट धिरडे




साहित्य :-
१. वाटीभर गव्हाची कणिक
२. २ ते ३ चमचे तांदुळाची पिठी
३. चिमूटभर हळद
४. अर्धा चमचा तिखट
५. अर्धा चमचा गोडा मसाला
६. अर्धा चमचा जीरं पूड
७. २ चमचे दही
८. चवीनुसार मीठ
९. कपभर पाणी
१०. आलं लसूण प्रत्येकी पाव चमचा (हे धिरड लहान मुलांसाठी बनवत असला तर आलं लसूण नाही घातलं तरी चालेल.)

कृती:-
प्रथम पाणी सोडून सर्व जिन्नस एकत्र करावेत. मग हळू हळू पाणी घालत गुठळ्या होणार नाहीत अशाप्रकारे सर्व एकत्र करावे. साधारणपणे डोशाच्या पिठासारखं दाट पीठ असावं. तवा मध्यम आचेवर तापवून लगेचच धिरडी घालायला सुरुवात करावी. ही धिरडी तव्यावर जास्त पसरवू नयेत. इतर धीरड्यासारखी ही धिरडी तव्यावरून उलटायला थोडी त्रासदायक ठरतात. पण ज्या लहान मुलांना नुकताच भात द्यायला सुरु केला असेल त्यांना चवीत बदल म्हणून ही धिरडी अतिशय चांगली आहेत.

वाढणी :- १ ते २ माणसे.