४ ऑक्टोबर, २०१३

जिलबी

साहित्य :-
१. अर्धा कप मैदा 
२. पाव चमचा यीस्ट 
३. १ कप साखर 
४. पाऊण कप पाणी 
५. अर्धा चमचा वेलची पूड 
६. चिमुटभर केशर 
७. तळणीसाठी तेल 

कृती:-
प्रथम यीस्ट २ ते ३ चमचा कोमट पाण्यात भिजवून ठेवावे. १० मिनिटांनी मैद्यामध्ये तेयीस्ट घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर  हळू हळू पाणी घालून  भज्याच्या घट्ट पिठासारखे पीठ बनवावे. हे पीठ थोडावेळ झाकून ठेवावे. तोवर साखर व पाणी एकत्र करून पाक बनवून घ्यावा. वेलची पूड व केशर घालावे.  नंतर एका आडव्या पातेल्यामध्ये तेल तापवावे. जिलबी बनवण्यासाठी जी बाटली मिळते त्यात किंवा सॉसच्या बाटलीमध्ये  मिश्रण घालावे. यापैकी काहीच उपलब्ध नसेल तर झिप लॉकच्या पिशवीमध्ये मिश्रण घालून एका कोपऱ्यामध्ये छोटेसे भोक पडावे. त्यातून जिलबी येते. पातेल्यातील तेल जास्त ताप देऊ नये. तेलामध्ये थोडेसे मिश्रण घालून बघावे. जर थोड्यावेळाने टाकलेले मिश्रण आपोआप वर आले तर तेल योग्य तापले आहे असे समजावे. मग तेलामध्ये चकली घालतो तशाप्रकारे गोल गोल बाटली फिरवत जिलबी घालावी. दोन्ही बाजूनी तळून घ्यावी. मग कोमट झालेल्या पाकात अगदी थोडावेळ बुडवून ठेवावी. दोन्ही बाजूनी पाकात घोळवून घेतली की जिलबी तयार झाली. वरून सजावटीकरता ड्राय फ्रुट्स घालाव्यात. गरम गरम जिलबी serve करावी. 

वाढणी :- वरील साहित्यात १५ ते २० जिलब्या होतील. 

१ ऑगस्ट, २०१३

टोमॅटो रवा डोसा


साहित्य:-
१. २ टोमॅटो
२. १ कप रवा 
३. पाव कप डाळीचे पीठ 
४. अर्धा चमचा तिखट 
५. अर्धा चमचा धणेपूड 
६. अर्धा चमचा जीरंपूड 
७. पाव चमचा ओवा 
८. चवीनुसार मीठ 
९. कोथिंबीर 
१०. किसलेलं आलं लसूण प्रत्येकी अर्चा चमचा 
११. अर्धा ते एक कप पाणी 

कृती:-
टोमॅटो मिक्सरमधून काढून घ्यावेत. त्यात रवा, बेसन. व  इतर सर्व जिन्नस घालावेत. डोश्याच्या पिठाप्रमाणे दाटसर बॅटर बनवून घ्यावे. तवा तापला की या पिठाचा त्यावर जाडसर डोसा घालावा. बाजूने तेल सोडून एका बाजूने छान परतून घ्यावा. उलटून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यावा. पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉस बरोबर हा डोसा serve करावा. हा डोसा लहानमुलंदेखील आवडीने खातात. 

वाढणी:- ५ ते ६ डोसे. 

२६ एप्रिल, २०१३

छोले राजमा सलाड


साहित्य :-
१. लाल सिमला मिरची 
२. भिजवून शिजवलेला राजमा 
३. भिजवून शिजवलेले छोले 
४. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा 
५. १ चमचा लिंबाचा रस 
६. अर्धा चमचा लाल तिखट किंवा १ बारीक चिरलेली हिरवी मिरची 
७. चवीनुसार मीठ 
८. अर्धा चमचा तेल 

कृती :-
राजमा व छोले वेगवगळे भिजववेत. ७ ते ८ तास भिजले की वेगवेगळे शिजवून घ्यावेत. शिजल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे. लाल सिमला मिरचीला हाताने थोडे तेल लावून घ्यावे. सिमला मिरची काट्याचमच्यामध्ये खोचावी व थेट आचेवर धरावी. मिरची सगळीकडून काळे डाग पडून भाजली गेली पाहिजे. असं झाल्यावर ती मिरची पाण्यात घालावी व जळालेला पापुद्रा काढून घ्यावा. सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर एका बाऊलमध्ये छोले, राजमा, कांदा, सिमला मिरची, तिखट किंवा हिरवी मिरची, लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावेत. हे सलाड खास वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी तर फारच उपयोगाचे आहे. 

वाढणी:- २ ते ३ माणसे 

२५ एप्रिल, २०१३

मसूर भात


साहित्य:-
१. भिजवलेले अक्खे मसूर १ कप 
२. उभा चिरलेला कांदा अर्धा कप 
३. किसलेलं आलं अर्धा चमचा 
४. हळद अर्धा चमचा 
५. धणे पूड १ चमचा 
६.जीरं पूड अर्धा चमचा 
७. बिर्याणी मसाला १ चमचा 
८. २ सुक्या लाल मिरच्या 
९. भिजवलेला तांदूळ दीड कप 
१०. चवीपुरते मीठ 
११. सजावटीसाठी कोथिंबिर 

कृती:-
मसूर ७ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात जीरं व मोहरीची फोडणी करावी. सुक्या लाल मिरच्या घालावयात.  मोहरी तडतडली की त्यात उभा चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतावा. आलं घालून पुन्हा परतावा.  मग त्यात  भिजवलेले मसूर घालावेत. थोडावेळ परतून मग त्यात हळद, धणे जीरं पूड व बिर्याणी मसाला घालावा.  तांदूळ कृती सुरु करण्यापूर्वी भिजवावेत. म्हणजे १५ मिनिटे तांदूळ पाण्यात भिजतील. सगळे मसाले घालून २ ते ३ मिनिटे मसूर परतले की मग त्यात भिजवलेला तांदूळ घालावा. तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून भात शिजवावा. भाताला उकळी आल्यावर आच मंद करून १० मिनिटे भात झाकण लावून शिजवावा. कोथिंबिर घालून हा भात दह्यासोबत किंवा रायत्या सोबत serve करावा . 

वाढणी :- २ ते ३ माणसे. 

१८ फेब्रुवारी, २०१३

व्हेज हंडी बिर्याणी!!



साहित्य :-
१. १ वाटी चौकोनी चिरलेलं गाजर 
२. १ वाटी चिरलेला श्रावण घेवडा 
३. १ वाटी चिरलेला फ्लॉवर 
४. १ वाटी मटारचे दाणे 
५. फोडणीसाठी तेल 
६. अर्धा चमचा शाही जिरं 
७. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा 
८. १ वाटी बारीक चिरलेला कांदा 
९. १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
१०. १ ते २ हिरव्या मिरच्या 
११. अर्धा चमचा हळद 
१२. १ चमचा तिखट 
१३. १ चमचा धने पूड 
१४. १ वाटी घुसलेलं दही 
१५. पाव वाटी तूप 
१६. चिमूटभर केशर दूधात भिजवलेलं 
१७. अर्धा वाटी तळलेला कांदा 
१८. खडा मसाला :- वेलची, लवंग, तमालपत्र, मिरी, मसाला वेलची 
१९. २ कप भिजवलेला बासमती तांदूळ 
२० चवीनुसार मीठ 
२१. बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर प्रत्येकी अर्धी वाटी 
२२. गरम मसाला १ चमचा 

कृती :-
प्रथम एका भांड्यामध्ये पाणी गरम करावे. त्यात चवीनुसार मीठ व खडा मसाला घालावा. भिजवलेले तांदूळ घालावेत. भात शिजत आला की उपसावा. पुन्हा एका भांड्यामध्ये पाणी तापवावे. त्यात चवीनुसार मीठ घालून गाजर, फ्लॉवर, श्रावण घेवडा व थोड्यावेळाने मटार घालावेत. या भाज्या थोड्या शिजेपर्यंत उकडून घ्याव्यात. भाज्या शिजत आल्या की उपासाव्यात. एका भांड्यात तेल तापवावे. त्यात शाही जीरं घालावं. जीरं तडतडलं की त्यात कांदा घालावा. आलं लसूण पेस्ट घालून १ मिनीटभर परतावं. त्यात टोमॅटो घालून तो मऊ शिजेपर्यंत परतावा. मग त्यात मसाले अर्थात हळद, तिखट व धणे पूड घालावी. मसाले परतून घ्यावेत.  त्यात दही घालावं व शिजलेल्या भाज्या घालून गरज असल्यास थोडासा मीठ घालून थोडावेळ शिजवावं. आता एका पातेल्यात खाली भाजीचा एक थर घालावा. वर भाताचा एक थर घालावा. त्यावर थोडा गरम मसाला, पुदिना, व कोथिंबीर घालावी. पुन्हा राहिलेल्या भाजीचा थर घालावा. भाताचा थर घालावा. वरून गरम मसाला, पुदिना व कोथिंबीर घालावी. तळलेला कांदा घालावा. वरून केशराचं दूध घालावं. तूप घालावं, काजूचे तुकडे व बेदाणे घालून बिर्याणी आचेवर ठेवावी. प्रथम पहिले १० मिनिटंमोठ्या आचेवर ठेवावी व नंतर मंद आचेवर १५ मिनिटं ठेवावी. बिर्याणी तयार!! 

वाढणी :- ३ ते ४ माणसे