२४ मे, २०११

पालक मुग डाळ भाजी


साहित्य :-
१. ४ ते ५ वाट्या चिरलेला पालक
२. अर्धी वाटी मुग डाळ
३. पाव वाटी उडदाची डाळ
४. २ हिरव्या मिरच्या
५. अर्धा चमचा आलं
६. अर्धा चमचा लसूण
७. अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा
८. फोडणीसाठी तेल
९. ६ ते ७ कढीपत्त्याची पानं
१०. चवीपुरतं मीठ

कृती :-
एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यामध्ये पहिले थोडी उडदाची डाळ घालावी. डाळीचा रंग हलकासा बदलला की त्यात मुग डाळ घालावी. मुगाच्या डाळीचा रंग बदलला की त्यात मिरची, आलं व लसूण घालून मिनिटभर परतावे. उभा चिरलेला कांदा घालावा. तो मऊसर झाला की त्यात कढीपत्ता घालावा. हळद घालावी व चिरलेला पालक आणि मीठ घालावे. मिठाने पालकाला पाणी सुटते व त्याच पाण्यात पालक आणि डाळी शिजवाव्यात. ही गरम गरम भाजी पोळी किंवा फुलक्यासोबत फारच छान लागते.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

१७ मे, २०११

साबुदाणा वडा


साहित्य :-
१. साबुदाणा १ वाटी
२. दाण्याचे कूट अर्धी वाटी
३. १ मध्यम आकाराचा बटाटा
४. जीरं १ चमचा
५. मिरची १ चमचा
६. चिमूटभर सोडा
७. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
८. मीठ चवीनुसार
९. तळणीसाठी तेल

कृती :-
प्रथम साबुदाणा पाण्यात भिजवावा. जेवढा साबुदाणा त्याच्यापेक्षा रेषभर जास्त पाणी घालावे आणि हा साबुदाणा ५ ते ६ तास भिजवावा. बटाटा शिजवून घेऊन mash करून घ्यावा. भिजवलेला साबुदाणा, mash केलेला बटाटा, दाण्याचे कूट, जीरं, मीठ, सोडा, कोथिंबीर हे सर्व जिन्नस एकत्र करावेत. हाताला थोडे पाणी लावत लावत त्याचे वाडे करून घ्यावेत. तेल गरम करावे व वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत व दह्यासोबत गरम गरम serve करावेत. यामध्ये कुरकुरीत पणासाठी वारीचे तांदूळ घातले जातात. तुम्हाला आवडत असल्यास घालावेत. पण त्याशिवायदेखील हे वडे छान कुरकुरीत होतात आणि फुलतात.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

४ मे, २०११

मुगाच्या डाळीचे वडे



साहित्य :-
१. २ वाटी मुगाची डाळ
२. ४ ते ५ वाटी पाणी
३. २ हिरव्या मिरच्या
४. १ चमचा आलं
५. १ चमचा लसूण
६. चवीनुसार मीठ
७. १ चमचा जीरं
८. कोथिंबीर
९. तळण्यासाठी तेल

कृती :-
प्रथम मुगाची डाळ ७ ते ८ तास पाण्यामध्ये भिजवावी. त्यानंतर मुगाची डाळ कमीत कमी पाणी घालून मिक्सरमध्ये वाटावी. त्यात आलं, लसूण, मीठ, मिरच्या, जीरं हे सर्व घालून वाटावे. थोडेसे जाडसर वाटावे. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर या पिठात घालावी व तापलेल्या तेलामध्ये चमच्याने छोटे छोटे गोळे सोडावेत. छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत टाळावेत. व कुठल्याही चटणी सोबत गरम गरम serve करावेत.

वाढणी :- वरील साहित्यात १५ ते १८ वडे होतील.

स्पाँज केक


साहित्य :-
१. १ कप मैदा
२. अर्धा चमचा बेकिंग सोडा
३.१ कप पिठीसाखर
४. ६ अंडी
५. १ चमचा व्हॅनिला इसेन्स

कृती :-
प्रथम अंडी फोडावीत व पांढरा बलक व पिवळा बलक वेगळा करावा. पांढरा बलक व्हीप होईपर्यंत फेटावं. अर्थात त्या पांढऱ्या बालकाचे हलके क्रीम तयार झाले पाहिजे. पिवळे बलक वेगळे फेटून घ्यावे. त्यात पिठीसाखर व व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा फेटून घ्यावे. मैदा व बेकिंग सोडा चाळणीतून चाळून घ्यावा. फेटलेले पांढरे बलक व पिवळे बलक एकत्र करावं व त्यात मैदा घालावा. अगदी हळुवार हाताने एखाद्या चमच्याने सर्व मिश्रण एकत्र करावं. ओव्हन ३५०f ला preheat करून घ्यावा. केक चे मिश्रण एका baking tray मध्ये घालून ३० ते ४० मिनिटे ओव्हन मध्ये ठेवावे. ३० मिनिटांनी एखादी सुरी किंवा toothpick केक मध्ये घालून बघावी. जर त्याला केक चिकटला नाही तर केक तयार झाला असे समजावे. नाहीतर अजून ५ ते १० मिनिटे केक bake करावा.

केक तयार झाल्यावर तो गार झाला की मग त्यावर whipped cream ने आपल्याला आवडेल तशी सजावट करावी.

केक मध्ये जर अंड चालत नसेल तर तुम्ही फ्लेक्स सीडची पावडर करून वापरू शकता. १ अंड = १ चमचा फ्लेक्स सीड पावडर.