३१ मार्च, २०१२

पालक लच्छा पराठा






साहित्य :-
१. ब्लांच केलेला पालक २ कप
२. ३ ते ४ लसूण पाकळ्या
३. पेरभर आलं
४. २ ते ३ हिरव्या मिरच्या
५. साधारण ३ ते ४ कप कणिक
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा चमचा ओवा
८. २ मोठे चमचे दही
९. बारीक चिरलेली पालकाची पाने अर्धा कप

कृती :-
प्रथम उकळत्या पाण्यात पालकाची पाने घालून ३ ते ४ मिनिटे छान शिजवून घ्यावीत. नंतर गरम पाण्यातून पालक काढून गार पाण्यामध्ये ५ मिनिटे ठेवावा. नंतर एका चाळणीमध्ये घेऊन पाणी पूर्ण निथळू द्यावे. मग ही पालकाची पाने, आलं, लसूण व मिरची मिक्सरमधून वाटून घ्यावी. या वाटलेल्या मिश्रणात कणिक, मीठ, ओवा व बारीक चिरलेली पालकाची पाने घालावीत व पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी. आवश्यक वाटल्यास कणकेचे प्रमाण कमी जास्त करावे. मळलेली कणिक अर्धा तास झाकून ठेवावी. लच्छा पराठा करायला घेताना प्रथम कणकेचे समान आकाराचे गोळे करून घ्यावेत. मग त्यातल्या एका गोळ्याला दोन्ही बाजूने कोरडं पीठ लावून पोळी लाटून घ्यावी. लाटलेल्या पोळीला तूप लावावे व थोडी पिठी भुरभुरावी. मग फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे केंद्रातून सुरीने कापून गुंडाळी करायला सुरुवात करावी. कोनाचा आकार आला की हाताने तो कोन twist कारावा व हळुवार हाताने खाली दबावा. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा तयार झाला की तो बाजूला ठेवून द्यावा. अशाप्रकारे सगळे गोळे बनवून ते ५ ते १० मिनिटे थांबावे. मध्यम आचेवर तवा तापत ठेवून एक एक पराठा हलक्या हाताने लाटावा व तूप लावून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावा. थंडगार रायत्यासोबत गरम गरम लच्छा पराठा serve कारावा. याच कणकेचे तुम्ही साधे पालक पराठे देखील करू शकता पण हा लच्छा पराठा सध्या लाटलेल्या पराठ्यापेक्षा अतिशय मऊ होतो आणि त्याचे छान पदर सुटतात.

वाढणी :- ३ ते ४ माणसे

२२ मार्च, २०१२

श्रीखंड / आम्रखंड


साहित्य :-
१. ४ ते ५ कप दही
२. दीड ते २ कप साखर
३. १ चमचा वेलची पूड
४. केशर चिमूटभर
५. १ चमचा चारोळी (ऐच्छिक)

कृती :-
एका कपड्यामध्ये दही गुंडाळून ते रात्रभर टांगून ठेवावा. म्हणजे दह्यातून सगळं पाणी निथळून जाईल आणि चक्का आपल्याला मिळेल. मग या चाक्क्यामध्ये साखर घालावी. साखर विरघळली की हा साखर घातलेला चक्का एका चाळणीमध्ये घेऊन हाताने दाबत दाबत फेटून घ्यावा. असं केल्याने अतिशय मऊसर आणि गुठळ्या नसलेले श्रीखंड तयार होईल. मग त्यात वेलची पूड, केशर आणि आवडत असल्यास चारोळी घालावी व पोळी किंवा पुरीसोबत serve करावे. जर याच चक्क्यामध्ये आंब्याचा पल्प घातला तर श्रीखंडाचे आम्रखंड तयार होईल. फक्त आम्रखंड केले तर त्यात वेलची पूड घालू नये. आंब्याचा स्वतःचाच स्वाद इतका छान असतो की त्याला इतर स्वादांची गरज भासत नाही.
जर तुम्ही दही टांगून ठेवायला विसरला असाल तर दही एका कापडात घ्यावं आणि वर्तमान पत्राचा एक गठ्ठा खाली ठेवून त्यावर कापडात गुंडाळून ठेवलेलं दही ठेवावं. वरून परत वर्तमान पत्राचा एक गठ्ठा ठेवावा आणि त्यावर जाड वजनदार वस्तू ठेवावी. १० ते १५ मिनिटांनी वर्तमान पत्र काढून ती बदलावीत. पुन्हा अशीच कृती २ वेळेला करावी. दह्यातलं पाणी निघून छान घट्ट चक्का तुम्हाला मिळेल.

वाढणी :- ३ ते ४ माणसे

हरा भरा कबाब


साहित्य :-
१. १ कप ब्लांच केलेला पालक
२. १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा
३. अर्धी वाटी उकडून ठेचलेले मटार
४. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
५. अर्धा चमचा किसलेला आलं
६. ३ ते ४ चमचे कॉर्नफ्लोर
७. १ चमचा चाट मसाला
८. चवीनुसार मीठ
९. तळणीसाठी तेल

कृती :-
प्रथम पालकाची पणे खुडून ती ब्लांच करून घ्यावीत. म्हणजे उकळत्या पाण्यात पालकाची पानं घालून २ ते ४ मिनिटे ती उकळायची आणि लगेचच गार पाण्यात घालायची. असं केल्याने पालकाचा हिरवा रंग छान खुलून येतो आणि पालक थोडा शिजतोही. गार पाण्यातून पानं काढली की त्यातलं शक्य तेवढं पाणी काढून ती पानं चिरून घ्यावी. मटार उकडावेत व त्यातालेदेखील पाणी काढून ते ठेचून घ्यावेत. मग उकडलेला बटाटा हाताने छान कुस्करून घ्यावा. त्यात पालक, मटार, बारीक चिरलेली मिरची, किसलेला आलं, कॉर्नफ्लोर, चाट मसाला व मीठ घालावं. छान गोळा मळून घ्यावा. पाहिजे त्या आकाराचे कबाब करून ते तळून घावेत. कबाब तेलात पसरायला लागले तर त्यात थोडं कॉर्नफ्लोर घालून परत गोळा मळून घ्यावा. यासाठी पहिले एक छोटा गोळा तेलात टाकून तो फुटत नाही ना ते पाहावे व मगच बाकीचे कबाब करायला घ्यावेत. तुम्ही हे कबाब shallow fry पण करू शकता. हे कबाब बनवताना मध्ये पनीरचा तुकडा, काजू किंवा मनुका घालून शाही हरा भरा कबाब देखील बनवता येईल.

वाढणी :- २ ते ३ माणसे

१३ मार्च, २०१२

कोथिंबीर वडी


साहित्य :-
१. बारीक चिरलेली कोथिंबीर २ वाट्या
२. २ चमचे डाळीचं पीठ
३. २ चमचे तांदुळाच पीठ
४. ४ ते ५ चमचे थालीपीठाची भाजाणी
५. अर्धा चमचा तिखट
६. धणे जिरे पूड प्रत्येकी अर्धा चमचा
७. चवीनुसार मीठ

कृती :-
प्रथम कोथिंबीर धुवून चिरून घ्यावी. त्यात डाळीचं पीठ, तांदुळाच पीठ, तिखट, भाजाणी, धणे जिरे पूड व चवीनुसार मीठ घालावे. पाणी न घालता या मिश्रणाचा गोळा होतोय का ते पहावं. गरज पडल्यास १ - १ चमचा पाणी घालत जावं. छान गोळा तयार झाला की कुकरमध्ये २ शिट्ट्या काढून उकडून घ्यावा. गोळा थोडासा गार झाला की त्याचे तुकडे करून थोड्या तेलामध्ये तळून घ्यावेत. कुरकुरीत गरम गरम कोथिंबीर वडी जेवताना तोंडीलावणं म्हणून किंवा चहाबरोबर serve कराव्यात.

वाढणी :- २ ते ३ माणसे

९ मार्च, २०१२

वॉर्म सलाड


साहित्य :-
१. उभा चिरलेला कोबी २ वाट्या
२. उभं चिरलेला गाजर अर्धी वाटी
३. उभी चिरलेली सिमला मिरची अर्धी वाटी
४. उभा चिरलेला कांदा अर्धी वाटी
५. स्वीट कॉर्नचे दाणे पाव वाटी
६. तिरका चिरलेला श्रावण घेवडा अर्धी वाटी
७. २ ते ३ चमचे ऑलिव ऑइल
८. काळी मिरी पावडर
९. चवीनुसार मीठ
१०. इटालियन सिझानिंग अर्धा चमचा
११. रेड चिली फ्लेक्स चवीनुसार
१२. १ चमचा लिंबाचा रस

कृती :-
एका पॅनमध्ये ऑलिव ऑइल गरम करून घ्यावे. त्यात प्रथम कांदा थोडासा परतावा. मग त्यात काळ्या मिरीची पावडर व रेड चिली फ्लेक्स घालावेत. सर्व भाज्या घाल्याव्यात व छान परताव्यात. या भाज्या थोड्या मऊ झाल्या की त्यात इटालियन सिझानिंग व मीठ घालावे. पुन्हा थोडावेळ परतावे. या भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाहीयेत. भाज्या अर्ध्या कच्च्या असतानाच लिंबू पिळावे व हे सलाड एका बाउल मध्ये घेऊन छान गरम गरम serve करावे.
या सलाड मध्ये तुम्ही बेबी कॉर्न, वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरचीही वापरू शकता. हे सलाड थंडीच्या दिवसात गरम गरम खायला अतिशय छान वाटते.

वाढणी :- ३ ते ४ माणसे