३० एप्रिल, २०१२

बटाटा वडा






साहित्य :-
१. उकडलेले बटाटे ३ ते ४
२. ४ हिरव्या मिरच्या 
३. ४ ते ५ लसूण पाकळ्या 
४. पेरभर आल्याचा तुकडा 
५. कोथिंबीर
६. ५ ते ६ चमचे डाळीचे पीठ/ बेसन 
७. अर्धा चमचा तिखट
८. पाव चमचा हळद
९. चिमूटभर बेकिंग सोडा
१०. चवीनुसार मीठ
११. तळणीसाठी तेल

कृती:-
प्रथम उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यावेत. हिरवी मिरची, लसूण व आलं मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. तेलावर हे वाटलेलं आलं, लसूण व मिरची थोडसं परतून घ्यावं. त्यात चिमूटभर हळद घालावी. मॅश केलेला बटाटा घालावा व लगेचच आच बंद करावी. थोडी कोथिंबीर घालून या मिश्रणाचा छान गोळा करून घ्यावा.  मग बेसन, तिखट, सोडा, हळद व मीठ हे सर्व एकत्र करावं. थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे थोडं दाटसर पीठ बनवून घ्यावं. बटाट्याच्या मिश्रणाचे लहान मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल तापवून घ्यावं. आच माध्यमच ठेवावी.  बटाट्याचा एक गोळा बेसनाच्या मिश्रणात घोळवून तेलात सोडवा व छान खुसखुशीत वडे तळून घ्यावेत. केचअप बरोबर किंवा पुदिना कोथिंबिरीच्या चटणीसोबत गरम गरम serve करावेत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

२९ एप्रिल, २०१२

बनाना वॉल्नट ब्रेड


साहित्य :-
१. ३ पूर्ण पिकलेली केळी
२. २ कप मैदा
३. १/२ चमचा बेकिंग सोडा 
४. १/२ चमचा बेकिंग पावडर
५. १ चमचा  व्हॅनिला इसेन्स 
६. १/३ कप साखर
७. आवडत असल्यास पाव चमचा दालचिनीची पूड
८. २ अंडी
९. १/३ कप दही 
१०. बटर अर्धी स्टिक 

कृती :-
प्रथम केळी सोलून ती छान मॅश करून घ्यावी. दुसऱ्या बाउल मध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व साखर हे सर्व घालून छान मिक्स करून घ्यावं. केळी मॅश केलेल्या बाउल मध्ये बटर, व्हॅनिला इसेन्स, २ अंडी व दही घालावे आणि सर्व पदार्थ छान मिक्स करावेत. मग या मिश्रणात मैदा घालावा. सर्व मैदा एकाच वेळी घालू नये. थोडा थोडा मैदा केळ्याच्या मिश्रणात घालून मिक्स करून घ्यावे. मग त्यात तुकडे केलेले वॉल्नट घालावेत. या वेळेपर्यंत ओवन ३५०f ला preheat करून घ्यावा. ओवनच्या  एखाद्या नॉनस्टिक भांड्याला बटर लावावे व त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरावा. आपण तयार केलेले ब्रेडचे मिश्रण या ग्रीस केलेल्या भांड्यात ओतावे. हा ब्रेड बेक व्हायला साधारणपणे  ५० ते ५५ मिनिटे लागतील. ब्रेड तयार झाला की टूथपिक किंवा नाईफ मधोमध घालून बघावे. जर नाईफला ब्रेडचे मिश्रण लागले नाही तर ब्रेड तयार झाला असे समजावे. ब्रेड गार झाला की मग त्याचे slice करावेत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे

१८ एप्रिल, २०१२

तवा पुलाव


साहित्य :-
१. शिजवलेला भात २ कप
२. बारीक चिरलेली सिमला मिरची पाव कप
३. बारीक चिरलेलं गाजर व श्रावण घेवडा प्रत्येकी पाव कप
४. चौकोनी कापलेले पनीर पाव कप
५. मटारचे दाणे पाव कप
६. बारीक चीरालेला कांदा पाव कप
७. बारीक चिरलेले टोमॅटो अर्धा कप
८. टोमॅटो केचअप ३ ते ४ चमचे
९. पाव भाजी मसाला १ चमचा
१०. तिखट १ चमचा
११. चवीनुसार मीठ
१२. बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :-
प्रथम ४ ते ५ कप पाणी उकळावे. त्यात मीठ घालून २ कप तांदूळ शिजवून घ्यावेत. भात थोडा शिजला की जास्तीचे पाणी काढून घ्यावे. एका कढईमध्ये तेल घेऊन ते तापले की त्यात कांदा घालावा. चिरलेला टोमॅटो घालून दोन्ही छान मऊ होऊ द्यावे. मग त्यात टोमॅटो केचअप घालावे व इतर सर्व मसाले घालावेत. थोडंसं मीठ घालावं आणि कांदा टोमॅटो सर्व मसाल्यांमध्ये थोडं शिजवावं. मग त्यात भाज्या घालाव्यात व पाणी घालून भाज्या शिजवाव्यात. भाज्या अर्ध्या कच्च्या शिजल्या की त्यात भात घालावा आणि छान मिक्स करून घ्यावे. पनीर घालावे व भाज्या, भात, मसाले सर्व एकत्र ५ ते १० मिनिटे मंद आचेवर शिजवावे. कोथिंबीर घालून हा तवा पुलाव गरम गरम serve करावा.

वाढणी :- ३ ते ४ माणसे

३ एप्रिल, २०१२

पनीर झाल्फ्रेझी


साहित्य :-
१. उभी चिरलेली हिरवी सिमला मिरची १ कप
२. उभी चिरलेली लाल, पिवळी सिमला मिरची प्रत्येकी अर्धा कप
३. उभं चिरलेलं पनीर ३/४ कप
४. २ ते ३ हिरव्या मिरच्या
५. १ चमचा किसलेलं आलं
६. जीरं १ चमचा
७. हळद पाव चमचा
८. गरम मसाला १ चमचा
९. उभं चिरलेला कांदा १ कप
१०. उभा चिरलेला टोमॅटो
११. सजावटीसाठी बारीक कोथिंबीर चिरलेली व आलं उभं चिरलेलं
१२. मीठ चवीनुसार

कृती :-
प्रथम सर्व भाज्या, पनीर, कांदा, टोमॅटो व हिरव्या मिरच्या हे सर्व चिरून घ्यावं. टोमॅटो चिरताना त्यातल्या बिया पूर्णपणे काढून घ्याव्यात. सर्व तयारी झाली की एका कढईमध्ये तेल तापवावं. त्यात जीरं घालावं व ते थोडं परतलं की मग कांदा घालावा. कांदा मऊसर होयीपर्यंत परतावा. मग त्यात आलं व हिरवी मिरची घालावी व १ मिनिटभर परतावं. आता त्यात सर्व प्रकारच्या सिमला मिरची घालाव्यात. एक ५ मिनिट झाकण न लावता शिजवाव्यात. मध्ये मध्ये भाजी परतावी. मग त्यात हळद व गरम मसाला घालावा. थोडं अजून तिखट हवं असेल तर लाल तिखट घालावं. भाजी पुन्हा थोडावेळ परतावी. मग त्यात पनीर घालावं. पनीर घातल्यावर भाजी अतिशय हलक्या हाताने परतावी. मग त्यात टोमॅटो व मीठ घालून भाजी पुन्हा ५ मिनिटं शिजू द्यावी. कोथिंबीर व आलं पेरून भाजी गरम गरम serve करावी. ही भाजी गरम गरम फुलाक्यांसोबत फारच छान लागते. शिवाय रंगीत सिमला मिरची नसेल तर साधी नेहेमीची हिरवी सिमला मिरची वापरली तरी चालेल.

वाढणी :- २ ते ३ माणसे