११ जुलै, २०२०

पड थाय नूडल्स



साहित्य :-
१. चपट्या नूडल्स  (Fettucccine) 
२. २ ते ४ चमचे ऑलिव्ह ऑइल 
३. २ चमचे दाण्याचं कूट 
४. २ चमचे लिंबू रस 
५. बारीक चिरलेली कांद्याची पात 
६. मोड आलेले मूग 
७. ४ ते ५ चमचे सोय सॉस 
८. १ चमचा ब्राऊन किंवा साधी साखर 
९. १ चमचा चिरलेला लसूण 

कृती :-
नूडल्स पूर्व शिजेपर्यंत उकडून घ्याव्यात. साधारणपणे नूडल्सच्या पाकिटावर त्या शिजवायची पूर्ण कृती लिहिलेली असते. त्याप्रमाणे नूडल्स शिजवून त्या गाळून घ्याव्यात. मोड आलेले मूग कमी पाण्यावर वाफवून घ्यावेत. एका पातेल्यात तेल घालून ते कडकडीत गरम करावं आणि त्यात लसूण घालावा. लसूण परतून घेतल्यावर त्यावर मोड आलेले मूग घालावेत. त्यावर नूडल्स घालून लगेचच सोया सॉस, दाण्याचं कूट, लिंबाचा रस, कांद्याची पात आणि साखर घालावी.  नूडल्स व्यवस्थित एकजीव करून घ्याव्यात आणि गरम गरम serve कराव्यात. 
यामध्ये तुम्ही पनीर, टोफू किंवा उकडलेलं चिकन देखील घालू शकता. 

​वाढणी :- ३ ते ४ माणसं ​

३ एप्रिल, २०२०

दाल खिचडी



साहित्य :-
१. तांदूळ २ वाटी 
२. मूग डाळ १ वाटी 
३. तूर डाळ पाव वाटी 
४. मसूर डाळ पाव वाटी 
५. ३ ते ४ लवंग 
६. २ पेरभर दालचिनी 
७. २ तमालपत्र 
८. २ हिरव्या मिरच्या 
९. १ चमचा काश्मिरी लाल तिखट 
१०. १ चमचा धणेपूड 
११. १ चमचा जीरंपूड 
१२. १ चमचा गरम मसाला 
१३. बारीक चिरलेला कांदा दीड वाटी
१४. बारीक चिरलेला टोमॅटो १ वाटी
१५. बारीक चिरलेली कोथिंबीर १ वाटी
१६. मोहरी १ चमचा 
१७. जीरं १ चमचा 
१८. १० ते १२ कढीपत्त्याची पानं 
१९. प्रत्येकी १ चमचा किसलेलं आलं आणि लसूण 
२०. फोडणीसाठी तेल 

कृती :-
प्रथम तांदूळ आणि इतर सर्व डाळी एकत्र करून पाण्यामध्ये २ - ३ वेळा धुवून घ्याव्यात आणि  पाणी गाळून घ्यावे. अर्धा तास तांदूळ आणि डाळी भिजल्या की त्या कुकरमध्ये घालून त्यात दुपटीपेक्षा थोडं जास्त पाणी आणि चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्याव्यात. एका पातेल्यात तेल घेऊन ते तापलं की मोहरी जीरं घालून फोडणी करावी. त्यात लवंग, तमालपत्र आणि दालचिनी घालावी. कढीपत्त्याची पानं घालून झाकण ठेवावं आणि आच कमी करावी. असं केल्यानं कढीपत्त्याचा छान स्वाद खिचडीला लागतो. झाकण मिनिटभराने काढून आच माध्यम करावी आणि मग त्यात कांदा घालावा. कांदा परतून घेतानाच आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालावी. कांदा मऊसर शिजला की त्यात धणेपूड, जीरंपूड, लाल तिखट आणि गरम मसाला घालावा. मसाले मिनिटभर सतत हलवून परतून घ्यावेत आणि मग त्यात टोमॅटो घालावा. २ - ३ चमचे पाणी घालत घालत टोमॅटो मऊ आणि एकजीव होईपर्यंत परतून घ्यावा. हा मसाला तयार झाला की त्यात दीड ते २ वाट्या पाणी घालावं. कोथिंबीर व चवीनुसार मीठ  घालून या मसाल्याला छान उकळी काढावी. कुकरचं झाकण उघडून ठेवावं. सगळा मसाला कुकरमध्ये घालून तांदूळ आणि डाळींसोबत एकजीव करून घ्यावा. या दाल खिचडीवर तूप घालून आणि लिंबू पिळून ती गरम गरम serve करावी. 

वाढणी :- या साहित्यात ३ ते ४ माणसांची खिचडी होईल.

मेजवानी

तुमच्या आजपर्यंतच्या प्रेमाने आणि प्रोत्साहनाने मी भारावले आहे. तुमचं असंच प्रेम यापुढेही मिळत राहो हीच अपेक्षा आहे. आपल्या ब्लॉगचं नाव या महिन्यात बदलून "मेजवानी" असं केलं आहे. गृहिनींना  सतत काहीतरी वेगळं आणि चविष्टं करत राहावं लागतं. त्यामुळे पंचपक्वान्नांची नसली तरी जगभरातल्या वेगवेगळ्या पाककृतींची मेजवानीच त्या घरच्यांना देत असतात. म्हणून आजपासून आपल्या ब्लॉगचं नाव "मेजवानी"!
खूप महिने झाले मी काही नवीन पाककृती ब्लॉगवर लिहिली नाही. परंतु आता पुन्हा एकदा नवीन छान छान पाककृती मी घेऊन येते आहे. सध्याच्या थोड्या उदासीन आणि काळजीच्या काळात आपल्या घरच्यांसाठी काहीतरी छान पण सोपं खायला करणं हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. घराबाहेर पडता येत नसल्याने चालणं आणि व्यायाम दोन्हीही कमी किंवा जवळपास शून्य आहेत. अशावेळी पचायला हलका  पण सकस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या या आवडत्या ब्लॉगला अवश्य भेट देत राहा. 

१२ जानेवारी, २०१६

पोहा भजी



साहित्य :-
१. १ कप पोहे 
२. अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी एकत्र करून घ्यावे 
३. पाव कप किसलेला दुधी 
४. पाव कप किसलेले गाजर 
५. शिजवून घेतलेले मटार पाव कप 
६. किसलेलं आलं आणि लसूण प्रत्येकी एक चमचा 
७. तिखट चवीनुसार 
८. हळद पाव चमचा 
९. ४ ते ५ चमचे बेसन 
१०. चवीनुसार मीठ 
११. तळणीसाठी तेल 
१२. बारीक चिरलेली कोथिंबीर 

फोडणीसाठी साहित्य :-
१. १ चमचा तेल 
२. अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जीरं 
३. पाव चमचा हिंग 

कृती:-
प्रथम पोहे धुऊन घ्यावेत व त्यातले पाणी पूर्णपणे काढून घ्यावे. त्यात दही व पाण्याचे मिश्रण घालून एकत्र करून २० - २५ मिनिटे झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने बाकीचे सर्व पदार्थ घालून थोडे पाणी घालून परत एक १० मिनिटे ठेवावे. एका छोट्या पातेल्यात फोडणी करावी. फोडणीमध्ये मोफारी, जीरं व हिंग घालावे आणि ही फोडणी पोह्याच्या मिश्रणात घालावी. सर्व पीठ चमच्याने छान एकत्रित करून घ्यावे. एका कढईमध्ये तेल तापवावे व हाताने पिठाचा एक एक छोटा गोळा तेलात तळण्यासाठी सोडावा. ही भाजी छान सोनेरी होईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तळून घ्यावीत. सॉस बरोबर गरम गरम serve करावीत. 

वाढणी :- वरील पिठात साधारण १७ ते २० भज्या होतील. 

१५ जून, २०१५

स्वीट कॉर्न चाट



साहित्य :-
१. उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे  २ कप 
२. बारीक चिरलेली सिमला मिरची पाव कप 
३. बारीक चिरलेला कांदा अर्धा कप 
४. बिया काढून बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप 
५. बारीक चिरलेली कोथिंबिर अर्धा कप 
६. बारीक चिरलेली हिरवी मिरची स्वादानुसार 
७.  बारीक चिरलेली काकडी अर्धा कप 
८. जीरा पावडर अर्धा चमचा
९. चाट मसाला अर्धा चमचा 
१०. लिंबुरस १ चमचा 
११. चवीनुसार मीठ 

कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे व स्वीट कॉर्न चाट serve करावी. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

२६ मे, २०१५

ब्रेड पनीर रोल्स

साहित्य :-
१. व्हीट ब्रेडचे ७ - ८ स्लाईस 
२. १ कप किसलेलं पनीर 
३. चमचाभर लिंबू रस 
४. चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची 
५. पेरभर किसलेलं आलं 
६. चवीनुसार मीठ 
७. परतण्यासाठी बटर 
८. २ ते ३ चमचे दूध 
९. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर 

कृती:-
प्रथम पनीर कुस्करून घ्यावे. त्यात किसलेलं आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर. लिंबू रस, दूध व चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित कालवून घ्यावे. ब्रेडच्या कडा काढाव्यात. मग तो ब्रेड लाटणं फिरवून पातळ करावा. त्यात पनीरचा मसाला भरून त्याचा रोल करावा. ब्रेडच्या कडांना पाणी लावावे म्हणजे ब्रेडचे रोल्स नीट बंद करता येतील. मग त्या रोल्सना बटर लावून तव्यावर परतून घ्यावे आणि केचअप अथवा चटणीसोबत गरम गरम serve करावे. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

सिमला मिरची - पनीर भुर्जी


साहित्य :-
१. बारीक चिरलेला कांदा १ कप 
२. बारीक चिरलेला  टोमॅटो अर्धा कप 
३. चौकोनी चिरलेली सिमला मिरची अर्धा कप 
४. कुस्करलेलं पनीर ३ कप 
५. १ चमचा देघी मिरची पावडर 
६. पाऊण चमचा गरम मसाला 
७. चवीनुसार मीठ
८.  अर्धा चमचा जीरं 
९. सजावटीसाठी कोथिंबीर 
१०. फोडणीसाठी तेल 

कृती :-
प्रथम पनीर कुक्सरून घ्यावे. कांदा बारीक चिरावा. तेलावर कांदा परतून घ्यावा. कांदा छान मौसार झाला कि मग त्यात टोमॅटो घालून ते मऊ शिजेपर्यंत परतावेत. त्यात सिमला मिरची घालावी. सिमला मिरची अर्धी कच्ची असताना त्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे. मसाले शिजले की त्यात कुस्करलेलं पनीर घालावं. पनीर घालून भाजी छान एकत्र करून घ्यावी. पनीर जास्त शिजवू नये नाहीतर ते कडक व्हायला लागतं. वरून कोथिंबीर व गरज असल्यास मीठ घालून भाजी पुन्हा परतून घ्यावी आणि पोळी अथवा पराठ्यासोबत गरम गरम serve करावी. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

५ फेब्रुवारी, २०१५

पॉपकॉर्न चिकन


साहित्य :-
१. चिकन ब्रेस्ट २ 
२. मैदा २ वाटी 
३. १ का  अंड्याचा पांढरा भाग  
४. दूध १ कप 
५. कांदा पावडर अर्धा चमचा 
६. मिरी पावडर अर्धा चमचा 
७. लाल तिखट १ चमचा 
८. हळद अर्धा चमचा 
९. ब्रेड क्रम्स १ वाटी 
१०. तळणीसाठी तेल 
११.  चवीनुसार मीठ 

कृती :-
प्रथम चिकन स्वच्छ करून  ब्रेस्टचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. त्या तुकड्यांना तिखट आणि मीठ लावून ठेवावे. एका ट्रेमध्ये मैदा घेऊन त्यात मीठ, तिखट, हळद, मिरी पावडर आणि कांद्याची पावडर घालावी. हे सर्व एकत्र करून ठेवावे. अजून एक ट्रे घेऊन त्यात दूध घ्यावे. या दूधात अंड्याचा पांढरा भाग घालून फेटून घ्यावे. ब्रेड क्रम्स देखील एका ताटलीमध्ये काढून घ्यावेत. एका आचेवर तेल तापत ठेवावे. चिकनचे तुकडे प्रथम एक एक करून मैद्याच्या मिश्रणात घोळवावेत . मग दुधाच्या मिश्रणात घोळवावेत. पुन्हा एकदा मैद्याच्या मिश्रणात घोळवून परत दुधात घोळवावेत. मग एक एक करून हे चिकनचे तुकडे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावेत व छान सोनेरी रंगावर तळावेत.पूर्ण शिजलेले आणि कुरकुरीत चिकन पॉपकॉर्न तयार झाले की लगेच गरम गरम serve करावेत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

४ नोव्हेंबर, २०१४

कोबी पनीर सँडविच


साहित्य :-

१. किसलेला कोबी अर्धा कप 
२. किसलेलं पनीर अर्धी वाटी 
३. किसलेलं आलं १ चमचा 
४. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे १ चमचा अथवा चवीनुसार 
५. बारीक चिरलेली कोथिंबीर पाव कप 
६. चवीनुसार मीठ 
७. ६ ते ८ व्हीट ब्रेड 
८. ब्रेड भाजायला बटर 

कृती:-

प्रथम किसलेलं पनीर, कोबी, आलं, मिरची, कोथिंबीर आणि मीठ या सर्व गोष्टी एका बाऊल मध्ये एकत्र करून घ्याव्यात. एक १० मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवावे. म्हणजे कोबीला पाणी सुटून हे मिश्रण चं एकजीव होईल. मग ब्रेडच्या स्लाईसला आतून बाहेरून बटर लावावे. एका स्लाईसवर हे मिश्रण घालून वरून दुसरा स्लाईस दाबून लावावा. मग हे सँडविच तव्यावर दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे. तव्यावरून काढून मग या सँडविचचे त्रिकोणी तुकडे कापून घ्यावेत. केचअप बरोबर serve करावे. मुलांना डब्यात द्यायला हे सँडविच खूपच छान आहेत. 

वाढणी :- १ ते २ माणसे 

२७ फेब्रुवारी, २०१४

राईस आणि कॉर्न बॉल्स

साहित्य:-
१. शिजवलेला भात २ वाट्या 
२. शिजवून मॅश केलेले  कॉर्न
३. पाव वाटी मैदा 
४. १ कप दूध 
५. ३ ते ४ चमचे बटर 
६. २ हिरव्या मिरच्या 
७. पेरभर आलं 
८. २ ते ३ लसणाच्या पाकळ्या 
९. अर्धी वाटी कोथिंबीर 
१०. पाव वाटी कॉर्नफ़्लॉर 
११. अर्धी वाटी ब्रेड क्रम्स 
१२. चवीनुसार मीठ 
१३. तळणीसाठी तेल 

कृती:-
प्रथम आलं, लसूण, मिरची वाटून घ्यावी. एका पसरट जड बुडाच्या पातेल्यामध्ये बटर घालावे आणि ते वितळायला लागले की त्यात मैदा घालावा. सतत ढवळावे म्हणजे मैदा जास्त भाजला जाणार नाही. मैद्याला रंग चढायच्या आधी त्यात दूध घालावे. दूध घातल्यावर मात्र सतत गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत ढवळावे. हा सॉस घट्ट होत आला की  एका पसरट ताटलीमध्ये काढून घेऊन गार करून घ्यावा. गोल होईल अशा consistency चा हा व्हाईट सॉस तयार झाला की मग त्यात शिजवलेला भात, कॉर्न, मिरची आलं आणि लसणाच वाटण, कोथिंबीर, कॉर्नफ़्लॉर, ब्रेड क्रम्स व चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊन तेलावर मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर टाळून घ्यावेत. कुठल्याही चटणी किंवा सॉस बरोबर serve करावेत. 

वाढणी :- ३ ते ४ माणसे. 

१७ फेब्रुवारी, २०१४

ब्रेड रोल्स

साहित्य :-
१. ब्रेडचे स्लाईस ६ ते ८ 
२. उकडलेले बटाटे ३ ते ४ 
३. वाफवलेले मटार अर्धी वाटी 
४. हळद अर्धा चमचा 
५. तिखट अर्धा चमचा 
६. गरम मसाला १ चमचा 
७. आमचूर पावडर १ चमचा 
८. धणेपूड १ चमचा 
९. भरपूर कोथिंबीर 
१०. चवीनुसार मीठ 
११.  फोडणीसाठी तेल  
१२. तळणीसाठी तेल   
१३. अर्धी वाटी दूध

कृती :-
एका पातेल्यात फोडणीसाठी तेल घ्यावे. त्यात जिरे घालावेत. ते तडतडले की त्यात हळद, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, धणेपूड घालावी. मसाला तेलात नीट मिक्स करून घ्यावा. उकडलेला बटाटा हाताने कुस्करून या मसाल्यावर घालावा. मटार घालावेत. कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घ्यावे. या मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. मग एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊन गार करून घ्यावे. मिश्रण गार झाले की एका कढईमध्ये तळणीसाठी तेल तापत ठेवावे. एका पसरट ताटामध्ये दुध घालावे. ब्रेड स्लाईसच्या कडा काढून ते दुधामध्ये हलक्या हाताने भिजवून घ्यावेत. स्लाईस दुधातून अगदी लगेच काढून घ्यावेत. ते ओलसर झाले पाहिजेत. दोन्ही हातात स्लाईस धरून ज्यादाचे दुध पिळून घ्यावे. मग त्या स्लाईसमध्ये बटाट्याचे सारण भरावे. स्लाईसची एक बाजू पकडून घट्ट गुंडाळी करायला सुरुवात करावी. हे स्लाईस दुधात भिजवल्याने ते पटकन रोल होतात. छान  घट्ट रोल तयार झाला की तेलामध्ये खरपूस बदामी रंगावर टाळून घ्यावा. अशाप्रकारे सगळे स्लाईस रोल टाळून घ्यावेत व सॉससोबत serve करावेत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे 

४ ऑक्टोबर, २०१३

जिलबी

साहित्य :-
१. अर्धा कप मैदा 
२. पाव चमचा यीस्ट 
३. १ कप साखर 
४. पाऊण कप पाणी 
५. अर्धा चमचा वेलची पूड 
६. चिमुटभर केशर 
७. तळणीसाठी तेल 

कृती:-
प्रथम यीस्ट २ ते ३ चमचा कोमट पाण्यात भिजवून ठेवावे. १० मिनिटांनी मैद्यामध्ये तेयीस्ट घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर  हळू हळू पाणी घालून  भज्याच्या घट्ट पिठासारखे पीठ बनवावे. हे पीठ थोडावेळ झाकून ठेवावे. तोवर साखर व पाणी एकत्र करून पाक बनवून घ्यावा. वेलची पूड व केशर घालावे.  नंतर एका आडव्या पातेल्यामध्ये तेल तापवावे. जिलबी बनवण्यासाठी जी बाटली मिळते त्यात किंवा सॉसच्या बाटलीमध्ये  मिश्रण घालावे. यापैकी काहीच उपलब्ध नसेल तर झिप लॉकच्या पिशवीमध्ये मिश्रण घालून एका कोपऱ्यामध्ये छोटेसे भोक पडावे. त्यातून जिलबी येते. पातेल्यातील तेल जास्त ताप देऊ नये. तेलामध्ये थोडेसे मिश्रण घालून बघावे. जर थोड्यावेळाने टाकलेले मिश्रण आपोआप वर आले तर तेल योग्य तापले आहे असे समजावे. मग तेलामध्ये चकली घालतो तशाप्रकारे गोल गोल बाटली फिरवत जिलबी घालावी. दोन्ही बाजूनी तळून घ्यावी. मग कोमट झालेल्या पाकात अगदी थोडावेळ बुडवून ठेवावी. दोन्ही बाजूनी पाकात घोळवून घेतली की जिलबी तयार झाली. वरून सजावटीकरता ड्राय फ्रुट्स घालाव्यात. गरम गरम जिलबी serve करावी. 

वाढणी :- वरील साहित्यात १५ ते २० जिलब्या होतील. 

१ ऑगस्ट, २०१३

टोमॅटो रवा डोसा


साहित्य:-
१. २ टोमॅटो
२. १ कप रवा 
३. पाव कप डाळीचे पीठ 
४. अर्धा चमचा तिखट 
५. अर्धा चमचा धणेपूड 
६. अर्धा चमचा जीरंपूड 
७. पाव चमचा ओवा 
८. चवीनुसार मीठ 
९. कोथिंबीर 
१०. किसलेलं आलं लसूण प्रत्येकी अर्चा चमचा 
११. अर्धा ते एक कप पाणी 

कृती:-
टोमॅटो मिक्सरमधून काढून घ्यावेत. त्यात रवा, बेसन. व  इतर सर्व जिन्नस घालावेत. डोश्याच्या पिठाप्रमाणे दाटसर बॅटर बनवून घ्यावे. तवा तापला की या पिठाचा त्यावर जाडसर डोसा घालावा. बाजूने तेल सोडून एका बाजूने छान परतून घ्यावा. उलटून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यावा. पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉस बरोबर हा डोसा serve करावा. हा डोसा लहानमुलंदेखील आवडीने खातात. 

वाढणी:- ५ ते ६ डोसे. 

२६ एप्रिल, २०१३

छोले राजमा सलाड


साहित्य :-
१. लाल सिमला मिरची 
२. भिजवून शिजवलेला राजमा 
३. भिजवून शिजवलेले छोले 
४. अर्धा कप बारीक चिरलेला कांदा 
५. १ चमचा लिंबाचा रस 
६. अर्धा चमचा लाल तिखट किंवा १ बारीक चिरलेली हिरवी मिरची 
७. चवीनुसार मीठ 
८. अर्धा चमचा तेल 

कृती :-
राजमा व छोले वेगवगळे भिजववेत. ७ ते ८ तास भिजले की वेगवेगळे शिजवून घ्यावेत. शिजल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे. लाल सिमला मिरचीला हाताने थोडे तेल लावून घ्यावे. सिमला मिरची काट्याचमच्यामध्ये खोचावी व थेट आचेवर धरावी. मिरची सगळीकडून काळे डाग पडून भाजली गेली पाहिजे. असं झाल्यावर ती मिरची पाण्यात घालावी व जळालेला पापुद्रा काढून घ्यावा. सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर एका बाऊलमध्ये छोले, राजमा, कांदा, सिमला मिरची, तिखट किंवा हिरवी मिरची, लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावेत. हे सलाड खास वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी तर फारच उपयोगाचे आहे. 

वाढणी:- २ ते ३ माणसे 

२५ एप्रिल, २०१३

मसूर भात


साहित्य:-
१. भिजवलेले अक्खे मसूर १ कप 
२. उभा चिरलेला कांदा अर्धा कप 
३. किसलेलं आलं अर्धा चमचा 
४. हळद अर्धा चमचा 
५. धणे पूड १ चमचा 
६.जीरं पूड अर्धा चमचा 
७. बिर्याणी मसाला १ चमचा 
८. २ सुक्या लाल मिरच्या 
९. भिजवलेला तांदूळ दीड कप 
१०. चवीपुरते मीठ 
११. सजावटीसाठी कोथिंबिर 

कृती:-
मसूर ७ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात जीरं व मोहरीची फोडणी करावी. सुक्या लाल मिरच्या घालावयात.  मोहरी तडतडली की त्यात उभा चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतावा. आलं घालून पुन्हा परतावा.  मग त्यात  भिजवलेले मसूर घालावेत. थोडावेळ परतून मग त्यात हळद, धणे जीरं पूड व बिर्याणी मसाला घालावा.  तांदूळ कृती सुरु करण्यापूर्वी भिजवावेत. म्हणजे १५ मिनिटे तांदूळ पाण्यात भिजतील. सगळे मसाले घालून २ ते ३ मिनिटे मसूर परतले की मग त्यात भिजवलेला तांदूळ घालावा. तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून भात शिजवावा. भाताला उकळी आल्यावर आच मंद करून १० मिनिटे भात झाकण लावून शिजवावा. कोथिंबिर घालून हा भात दह्यासोबत किंवा रायत्या सोबत serve करावा . 

वाढणी :- २ ते ३ माणसे.