१७ फेब्रुवारी, २०१२

वरणफळं / चकोल्या


साहित्य :-
१. २ कप पोळीची कणिक
२. १ चमचा हळद
३. २ चमचे तिखट
४. धना जीरा पूड प्रत्येकी २ चमचे
५. गरम मसाला ३ चमचे
६. तेल ४ ते ५ चमचे
७. १ कप चिरलेली कोथिंबीर
८. तूर डाळ १ कप
९. चवीनुसार मीठ
१०. ६ ते ७ कढीपत्त्याची पणे
११. २ ते ३ आमसुले / कोकम

कृती :-
प्रथम तूर डाळ दीड कप पाणी घालून कुकर मध्ये उकडून घ्यावी. पोळीची कणिक घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, धना जीरा पूड प्रत्येकी १ चमचा, दीड चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, थोडं तेल व कोथिंबीर घालावी. पोळीच्या कणिकेपेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळावी. आता कढईमध्ये तेलाची फोडणी करून त्यात मोहरी व कढीपत्ता घालावा व उरलेले सर्व मसाले घालावेत. उकडलेली डाळ थोडी मॅश करून कढईत घालावी. कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालावे. आमटी थोडी पातळ होण्यासाठी थोडं पाणी घालावं. आमसुले घालून आमटीला उकळी येऊ द्यावी व आमटी बारीक आचेवर उकळत ठेवावी. आता मळलेल्या कणिकेचे छोटे गोळे घेऊन त्यांना तेल लावून ते लाटावेत. पोळी लाटली की कातण्याने शंकरपाळीच्या आकाराचे तुकडे करावेत व आमटीमध्ये सोडावेत. आमटी थोडी उकळावी व तोवर दुसरी पोळी लाटून घ्यावी. आमटीमध्ये अशाप्रकारे पोळीचे तुकडे घातले की आमटी मध्यम आचेवर थोडावेळ उकळावी. म्हणजे कच्ची कणिक शिजेल. आमटी पातळ राहील इतपत तुकडे घालावेत. मध्ये मध्ये आमटी उकळत असताना ढवळावी. अशी तयार वरणफळे एका बाउलमध्ये घालून वरून कोथिंबीर घालून गरम गरम serve करावे. अतिशय झटपट होणारे हे पूर्ण जेवण आहे. वरणफळे वाढताना तूप आणि लिंबू त्यावर घालावे व मगच वाढावे.

वाढणी :- २ ते ३ माणसे

३ फेब्रुवारी, २०१२

राज कचोरी


साहित्य :-
१. मैदा १ कप
२. १ ते ३ चमचे तेल
३. चवीनुसार मीठ
४. साधारणपणे १/४ कप कोमट पाणी
५. १/३ कप बेसन
६. चिली फ्लेक्स अर्धा चमचा
७. आमचूर पावडर १ चमचा
८. मोड आलेले मुग २ वाट्या
९. २ उकडलेले बटाटे
१०. पुदिना, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर यांची चटणी
११. चिंचेची गोड चटणी (ही चटणी ब्लॉगवर लिहिलेली आहे.)
१२. १ कप फेटलेलं दही
१३. कोथिंबीर, शेव सजावटीकरता
१४. तळणीसाठी तेल

कृती:-
प्रथम मैदा, १ चमचा तेल चवीनुसार मीठ व कोमट पाणी हे सर्व जिन्नस एकत्र करून अगदी मऊसर कणिक मलीन घ्यावी. मैद्याची कणिक भिजवताना नेहेमी जास्त वेळ कणिक मळावी. १० ते १५ मिनिटं कणिक झाकून ठेवावी. आता बेसन, १ चमचा तेल, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स व आमचूर पावडर हे सर्व जिन्नस हाताने एकत्र करून घेऊन सारण करून घ्यावे. मोड आलेले मुग एका कढईमध्ये २ ते ४ चमचे पाणी घालून व चवीपुरतं मीठ घालून थोडे मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावेत. उकडलेला बटाटा चौकोनी चिरून घ्यावा. मैद्याची जी कणिक आपण माळली होती ती घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. हे गोळे तळहाताएवढे लाटून घ्यावे. या लाटलेल्या कणकेमध्ये बेसनाचे सारण जे आपण तयार केलं होतं ते चमचाभर भरून घ्यावं. सारण भरून कणकेचे गोळे करून ते थोडावेळ बाजूला ठेवावेत. एक ५ ते १० मिनिटांनी हे बेसनाचे पीठ भरलेले गोळे घेऊन पुन्हा तळहाताएवढे लाटून घ्यावेत. लाटताना ज्या बाजूने हे गोळे बंद केले आहेत ती बाजू वरती घेऊन लाटावेत. त्यामुळे कचोरी छान फुलून येते. कढईमध्ये तेल तापवावे. पण तेल जास्त कढत असू नये. कचोरी तेलात टाकली की ती लगेच वर येत कामा नये. ती आपोआपच फुगते व वर येते. तेलात कचोरी तळताना ती सतत हलवू नये किंवा तेलात खाली दाबू नये. मध्यम आचेवर कचोरी दोन्ही बाजूने ब्राऊन होईपर्यंत तळावी. अशी तळलेली कचोरी जास्त कुरकुरीत होते. कचोरी तयार झाल्यावर ती गार झाली की मग त्याला पाणीपुरीच्या पुरीप्रमाणे मध्ये भोक पाडावे. आता या कचोरीमध्ये उकलेल्या बटाट्याच्या फोडी, शिजवलेले मोड आलेले मुग, पुदिन्याची हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी, फेटलेलं दही, कोथिंबीर व बारीक शेव घालून छान सजवून serve करावी.

वाढणी :- वरील साहित्यात १० ते १२ कचोरी होतील.