२७ जून, २०१२

मेक्सिकन राईस



साहित्य :-
१. भिजवलेले तांदूळ १ कप
२. लाल सिमला मिरची पाव कप
३. लाल  टोमॅटो पाव कप
४. ४ ते ५ सुक्या लाल मिरच्या 
५. किसलेलं गाजर पाव कप 
६. व्हेजिटेबल स्टॉक
७. बारीक चिरलेला कांदा
८. ऑलिव ऑईल 
९. चवीनुसार मीठ 
१०. ४ ते ५ लसूण पाकळ्या 

कृती :- 
प्रथम एका पॅनमध्ये ऑलिव ऑईल घेऊन त्यात लाल सिमला मिरचीचे मोठे तुकडे, टोमॅटोचे मोठे तुकडे, लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्या सर्व घालून परतत ठेवावे. हे सर्व पदार्थ करपल्यासारखे थोडे थोडे काळसर दिसेपर्यंत परतावेत. मग गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. एका कढईमध्ये ऑलिव ऑईल घेऊन त्यात कांदा घालावा. तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात भिजवलेले तांदूळ घालावेत. थोडावेळ परतून मग त्यात मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालावा.हा मसाला तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या चवीनुसार घालावा. बऱ्याचदा सगळा मसाला वापरण्याची गरज भासत नाही. हा उरलेला मसाला फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ७ ते ८ दिवस टिकतो.  व्हेजिटेबल स्टॉक मिळाला तर तो घालून भात शिजवावा नाहीतर साध्या पाण्यात भात शिजवला तरी चालतो. व्हेजिटेबल स्टॉक घालून भात शिजवताना मिठाची चव घेऊन लागेल तसे मीठ घालावे. स्टॉक घातल्यावर भात शिजायला जरा वेळ लागतो. भात थोडा शिजत आलं की त्यात किसलेलं गाजर घालून भात पूर्ण शिजवून घ्यावा. हा भात सोअर क्रीम व सलाड सोबत गरम गरम serve कारावा. 

वाढणी :- २ ते ३ माणसे. 

१९ जून, २०१२

आलू पराठा


साहित्य :-
१. २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे
२. पेरभर आलं
३. २ ते ३ लसूण पाकळ्या 
४. २ ते ३ मिरच्या 
५. अर्ध्या लिंबाचा रस
६. चवीनुसार मीठ 
७. बारीक चिरलेली कोथिंबीर 
८. २ कप पोळीची कणिक
९. कणकेच्या गोळ्याला लावण्यासाठी तेल 
१०. पराठे भाजण्यासाठी तूप किंवा बटर 

कृती:-
प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. बटाटे गार झाल्यावर ते हाताने मॅश करून घ्यावेत. आलं, लसूण व मिरची थोडंसं मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. हे मिश्रण बटाट्यामध्ये घालावे. त्यात चवीनुसार  मीठ, लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान गोळा मळून घ्यावा. पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी. थोडेसे तेल लावून ही कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. या पोळीच्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. तसेच बटाट्याच्या सारणाचेही गोळे करावेत. पोळीच्या कणकेचा एक गोळा घेऊन तो थोडासा लाटावा व त्यात बटाट्याच्या सारणाचा गोळा घालून सर्व बाजूनी बंद करून घ्यावे. हा गोळा पिठात घोळवून बंद बाजू खाली ठेवून हलक्या हाताने लाटावा. तवा मध्यम आचेवर तापवून घ्यावा व पराठा दोन्ही बाजूनी तूप किंवा बटर लावून भाजून घ्यावा. कोबीच्या कोशिंबिरीसोबत व लोणच्यासोबत आलू पराठा गरम गरम serve करावा.  

वाढणी :- २ ते ३ माणसे 

६ जून, २०१२

केळ्याची कोशिंबीर


साहित्य :-
१. २ पिकलेली केळी
२. १ ते दीड कप दही
३. चिमूटभर मीठ
४. ३ ते ४ चमचे साखर
५. १ मध्यम आकाराची हिरवी मिरची
६. कोथिंबीर

कृती:-
दोन्ही केळी सोलून कापून घ्यावी. त्यात दही, साखर, व मीठ घालावे. हिरवी मिरची बारीक चिरून घालावी व आवडत असल्यास कोथिंबीर घालावी. ही कोशिंबीर पोळीबरोबर छान लागते किंवा नुसती खायला पण छान वाटते. लहान मुलांना ही कोशिंबीर देताना मिरची न घालता दिली तरी चविष्ट लागते. उपवासाला देखील नुसती खायला ही कोशिंबीर चालते. 

वाढणी :- २ ते ३ माणसे.

मटकी- श्रावण घेवडा भाजी


साहित्य :-
१. मोड आलेली मटकी अर्धा कप
२. बारीक चिरलेला घेवडा दीड कप
३. चिमूटभर हळद
४. अर्धा चमचा तिखट
५. प्रत्येकी अर्धा चमचा धना जीरा पूड
६. गोडा मसाला १ चमचा
७. चवीनुसार मीठ
८. फोडणीसाठी तेल,मोहरी व हिंग 
९. कढीपत्त्याची पानं ५ ते ६ 
१०. बारीक चिरलेली कोथिंबीर व खोबरं सजावटीसाठी

कृती:-
प्रथम श्रावण घेवडा व मोड आलेली मटकी एकत्र करून कुकरला २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. एका कढईमध्ये तेल तापवावे व त्यात मोहरी, कढीपत्ता व हिंग घालावे. लगेचच सगळे मसाले घालावेत व आच कमी करावी. मसाले तेलात परतले की लगेच त्यात शिजवलेली मटकी व घेवडा घालावा. आवश्यक तेवढे पाणी व चवीनुसार मीठ घालून भाजीला छान उकळी येऊ द्यावी. ही भाजी खोबरं व कोथिंबीर घालून गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे