३० सप्टेंबर, २०११

उप्पीट


साहित्य :-
१. कप रवा
२. २ कप कोमट पाणी
३. २ हिरव्या मिरच्या
४. पाव कप बारीक चिरलेला कांदा
५. २ ते ३ चमचे दाणे
६. ७ ते ८ कढीपत्त्याची पानं
७. अर्धा चमचा आलं
८. कोथिंबीर, खोबरं व फरसाण
९. फोडणीच साहित्य
१०. १ चमचा उडदाची डाळ
११. चवीपुरतं मीठ
१२. १/२ चमचा लिंबाचा रस

कृती :-
प्रथम रवा मध्यम आचेवर थोडा भाजून घ्यावा. भाजलेला रवा एका ताटात काढून घ्यावा. कढईमध्ये थोडा तेल तापवून घ्यावं. त्यात मोहरी, मिरच्या मधोमध उभ्या चिरून, थोडा आलं किसून घालावं. कढीपत्ते घालावेत. थोडी उडदाची डाळ घालावी. ती तांबूस झाली की शेंगदाणे घालावेत. ते पण परतले गेले की कांदा घालावा. कांदा मऊ झाला की त्यात भाजलेला रवा घालावा. रवा थोडासा परत परतून घ्यावा. मग त्यात कोमट पाणी घालावं. लगेचच मीठ व लिंबाचा रस घालून छान ढवळाव व झाकण लाऊन उप्पीट शिजवून घ्यावं. जर तुम्हाला फडफडीत उप्पीट आवडत असेल तर कमी पाणी घालावं किंवा अगदी मऊसर उप्पीट आवडत असेल तर जास्त पाणी घालावं. छान गरम गरम उप्पीट खोबरं, कोथिंबीर व फरसाण घालून serve करावं.
आवडत असल्यास उडदाच्या डाळीबरोबर थोडे काजू घालून ते परतावेत.

वाढणी :- २ ते ३ माणसे

२० सप्टेंबर, २०११

टोमॅटो राईस


साहित्य :-
१. २ कप शिजलेला भात
२. पाव कप बारीक चिरलेला कांदा
३. ३ ते ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
४. २ सुक्या लाल मिरच्या
५. २ हिरव्या मिरच्या
६. ७ ते ८ कढीपत्त्याची पानं
७. २ चमचे उडदाची डाळ
८. १ चमचा हरभरा डाळ
९. ३ ते ४ चमचे शेंगदाणे
१०. जीरं व मोहरी
११. चवीनुसार मीठ
१२. थोडीशी हळद

कृती :-
प्रथम एका कढईमध्ये तेल तापवावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी व जीरं घालावं. दोन्हीही तडतडले की मग त्यात कढीपत्ता व लाल मिरच्या घालाव्यात. नंतर हरभऱ्याची डाळ घालून छान परतून घ्यावी. उडदाची डाळ घालावी व शेंगदाणे घालावेत. सर्व गोष्टी छान परतल्या, डाळींचे रंग बदलले की त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा मऊ होईपर्यंत परतावे. मग हिरव्या मिरच्या चिरून घालाव्यात. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. थोडंसं मीठ घालावं. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू द्यावे. थोडीशी हळद घालावी. मग यात शिजलेला मोकळा भात घालावा. चवीनुसार मीठ घालावे व सर्व जिन्नस छान एकजीव करावेत. कोथिंबीर घालून हा भात गरम गरम serve करावा.

टीप :- भात शिजवतानाच मीठ घातले तर एकजीव करणे अजूनच सोपे होईल.
वाढणी :- ३ ते ४ माणसे.

१५ सप्टेंबर, २०११

उपवासाची कचोरी


साहित्य :-
१. २ ते ३ माध्यम आकाराचे बटाटे
२. ४ मिरच्या
३. १ चमचा आलं
४. २ चमचे जीरं
५. १ कप किसलेलं खोबरं
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा कप कोथिंबीर
८. २ ते ३ चमचे कोर्नफ्लोर
९. तळणीसाठी तेल
१०. चिमूटभर साखर

कृती:-
बटाटे उकडून सोलावेत व हाताने कुस्करून घ्यावेत. त्यात कोर्नफ्लोर घालावे. २ मिरच्या व थोडं आलं वाटून घ्यावं व बटाट्यामध्ये घालावं. मीठ घालून हे सर्व पदार्थ छान एकत्र करून गोळा बनवून घ्यावा. उरलेल्या मिरच्या, आलं व जिरे वाटून घेऊन किसलेल्या खोबऱ्यामध्ये घालावे. मीठ व थोडीशी साखर घालून सर्व एकत्र करावं. आता बटाट्याच्या गोळ्यामधला थोडा गोळा घेऊन त्याला मध्ये खळगा करावा व त्यात खोबऱ्याच सारण भराव आणि कचोरी बंद करावी. जर आवडत असेल तर सारण भरल्यावर त्यात एखादा बेदाणा घालावा. सर्व कचोऱ्या अशा तयार करून घ्याव्यात. तेल मध्यम आचेवर तापवून घ्यावं. कचोरी तेलात पूर्ण बुडेल एवढं तेल कढईमध्ये घ्यावं. एकदा तेलात कचोरी घातली की जास्त हलवू नये. झाऱ्यावर कचोरी ठेवून मग तेलात सोडावी म्हणजे तिचा आकार बदलणार नाही. कोर्नफ्लोरमुळे कचोरी तळली जायला थोडा जास्त वेळ लागेल. छान सोनेरी रंगावर सर्व कचोऱ्या तळून घ्याव्यात व गरम गरम serve कराव्यात.

वाढणी :- या साहित्यात साधारणपणे १० ते १२ कचोऱ्या होतील.

१४ सप्टेंबर, २०११

मुगाच्या डाळीचे डोसे


साहित्य :-
१. २ कप मुगाची डाळ
२. २ ते ३ मिरच्या
३. अर्धा चमचा आलं
४. अर्धा चमचा लसूण
५. अर्धा चमचा जीरं
६. कोथिंबीर
७. चवीनुसार मीठ

कृती :-
प्रथम मुगाची डाळ ७ ते ८ तास भिजवून ठेवावी. भिजलेली मुगाची डाळ आलं, लसूण, मिरची व मीठ हे सगळे जिन्नस मिक्सरमधून वाटावेत. थोडं पाणी घालून पीठ पळीवाढ होईल इतपत सैल करावं. तवा मध्यम आचेवर तापवून घ्यावा. डावाने तव्यावर डोसे घालावेत. आपण नेहमी जसे डोसे घालतो तेवढे पातळ घालू नयेत. थोडेसे जाडसरच घालावेत. एका बाजूने डोसा भाजला गेला की तो उलटून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यावा. असा गरम गरम डोसा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा केचअप सोबत serve करावेत.

वाढणी:- या साहित्यात साधारण १० ते १२ डोसे होतील.

८ सप्टेंबर, २०११

फुलका


साहित्य :-
१. २ कप गव्हाची कणिक
२. ४ चमचे तेल
३. चवीपुरतं मीठ
४. कोमट पाणी

कृती:-
प्रथम कणकेमध्ये मीठ घालावे व कणिक थोडी मिक्स करून घ्यावी. त्यानंतर कणकेमध्ये २ चमचे तेल घालावे. तेलामुळे होणाऱ्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्याव्यात. तेल व कणिक छान एकजीव करून घ्यावी. हळू हळू कोमट पाणी घालत घालत कणिक मळावी. फार घट्ट किंवा अगदी सैल कणिक मळू नये. कणिक मळल्यावर तो गोळा किमान अर्धा तास झाकून ठेवावा. आचेवर प्रथम जाळी ठेवून त्यावर तवा ठेवावा. तवा छान तापला की आच मध्यमहून थोडी जास्त ठेवावी. कणकेच्या गोळ्याचे ८ ते १० समान आकाराचे गोळे करून एक गोळा थोडासा पीठ लावून छान गोल लाटून घ्यावा. हा लाटलेला फुलका तव्यावर टाकला की अगदी थोडासाच भाजून लगेचच त्याची बाजू बदलावी. बाजू बदल्यावर मात्र फुलका छान भाजून घ्यावा. आता जी बाजू भाजलेली नाही ती तवा उचलून जाळीवर टाकावी. फुलका छान फुगला की चिमट्याने लगेच उचलावा. परत तवा जाळीवर ठेवून पुढचे फुलके बनवावेत.

वाढणी :- या साहित्याचे किमान ८ ते १० फुलके होतील.