२६ एप्रिल, २०११

बन सँडविच


साहित्य :-
१. बर्गरसाठी वापरले जाणारे बन ४
२. १ वाटी पातळ गोल चिरलेली काकडी
३. १ वाटी पातळ गोल टोमॅटोचे काप
४. १ वाटी किसलेले गाजर
५. पाव वाटी कांद्याचे बारीक गोल काप
६. अर्धी वाटी केचअप
७. अर्धी वाटी किसलेले चीज
८. कोथिंबीर चटणी (ह्या चटणीच्या कृतीसाठी चटणी/ तोंडीलावणं हा thread पाहावा.)
९. स्प्रेड चीज किंवा लोणी

कृती :-
प्रथम बन दोन भागात विभागून त्याला स्प्रेड चीज किंवा लोणी लावून घ्यावे. त्याच्यावर चटणी लावावी. काकडी, टोमॅटो , गजर, किसलेले चीज व केचअप घालून बन बंद करून घ्यावा. आवडेल त्या प्रमाणे बनला अर्धा किवा त्रिकोणी काप घेऊन सँडविच serve करावे.

वाढणी :- २ माणसे

लाल टोमॅटोची हिरवी चटणी

साहित्य :-
१. १ टोमॅटो
२. कोथिंबिरीची १ जुडी
३. २ पेर आलं
४. ३ लसणाच्या पाकळ्या
५. चवीनुसार मीठ
६. अर्धा चमचा साखर

कृती :-
वरील सर्व जिन्नस मिक्सर मधून कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत. लाल टोमॅटोची हिरवी चटणी तयार. ही चटणी कुठल्याही प्रकारच्या सँडविचमध्ये छान लागते.

२५ एप्रिल, २०११

अंगूर मलाई


साहित्य :-
१. १० ते १२ कप दूध
२. अर्धा कप लिंबू रस
३. अर्धा कप पाणी
४. अडीच कप साखर
५. ६ कप पाणी
६. १ ते २ चमचे मैदा
७. कापलेले बदाम, पिस्ते सजावटीपुरते
८. अर्धा चमचा वेलची पूड
९. चिमूटभर केशर

कृती :-
प्रथम जाड बुडाच्या पातेल्यामध्ये ६ ते ७ कप दूध उकळत ठेवावे. दूध पातेल्याला खाली चिकटणार नाही याची सतत काळजी घ्यावी. आच मध्यम असू द्यावी. दुधाला उकळी आली की आच मंद करावी. लिंबू रस पाण्यामध्ये एकत्रित करून हळूहळू उकळी आलेल्या दूधात घालावे. दूध सतत ढवळावे. थोडेसे ढवळल्यावर पनीर व पाणी वेगवेगळे होताना दिसू लागेल. आच बंद करावी. थोडासा वेळ दूध ढवळावे. एका चाळणीत एक पातळ कापड घालून हे पनीर गाळून घ्यावे. (गाळून शिल्लक राहिलेले पाणी पोळीची कणिक मळायला वापरले जाऊ शकते.) या गाळलेल्या पनीर वर गार पाणी सोडावे. गार पाणी सोडल्याने पनीर घट्ट होत नाही. अंगूर बनवण्यासाठी अत्यंत मऊ पनीर ची गरज असते. भाजीसाठीचे पनीर थोडे घट्ट असते. थोडावेळ हे पनीर टांगून ठेवावे. त्यातील पाणी गाळले गेले पाहिजे. मग हे पनीर परातीमध्ये घ्यावे. तळहाताने थोडे थोडे पनीर मळून घ्यावे. पनीर मध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. या पनीर मध्ये १ चमचा मैदा घालून त्याचे छोटे छोटे गोळे बनवावेत. ३/४ कप साखर व त्यात ५ कप पाणी घालावे. या पाकाला उकळी आली की पनीर चे गोळे त्यात घालून झाकण लावून ५ मिनिटे शिजवावेत. शिजले की या गोळ्यांचा आकार दुप्पट होतो. हा साखरेचा पाक दाट होता कामा नये. प्रत्येक वेळेला गोळे शिजवताना थोडे पाणी वाढवावे. पाव कप साखर व १ कप पाणी एकत्र करून कोमट करून घ्यावे. हे पाणी आचेवर ठेवू नये. शिजलेले पनीर या कोमट पाण्यात काढावेत. हे सर्व होताना उरलेले दूध आटवत ठेवावे. ६ कप दूध आटवत ठेवले असेल तर त्याचे ३ कप होईपर्यंत आटवावे. उरलेली दीड कप साखर या दूधात घालावी. वेलची व केशर घालावे. कोमट पाण्यातले अंगूर ५ ते ७ मिनिटांनी हातामध्ये हळुवार दाबून घ्यावेत व आटवलेल्या दूधामध्ये सोडावेत. अंगूर मलाई गार झाली की बदाम व पिस्ते घालून serve करावी.

वाढणी :- ४ ते ५ माणसे

१८ एप्रिल, २०११

तिखटामिठाच्या पुऱ्या


साहित्य :-
१. २ वाट्या गव्हाची कणिक
२. चवीनुसार मीठ
३. अर्धा चमचा तिखट
४. अर्धा चमचा जीरं पूड
५. अर्धा चमचा धणे पूड
६. १ चमचा गोडा मसाला
७. अर्धा चमचा चाट मसाला
८. १ चमचा गरम तेलाचे मोहन
९. पाव वाटी कोथिंबीर
१०. कणिक मळायला पाणी
११. तळण्यासाठी तेल


कृती :-
वरील सर्व जिन्नस एकत्र करावेत. पाणी घालून थोडी घट्ट कणिक मळावी. १५ ते २० मिनिटे कणिक झाकून ठेवावी. एका कढईमध्ये तेल तापत ठेवावे. कणकेचा छोटा गोळा घेवून तो गोल लाटावा व गरम तेलात दोन्ही बाजूनी पुरी छान तळून घ्यावी. गरम गरम खायला द्यावी.

वाढणी :- या साहित्यात साधारण ८ ते १० पुऱ्या होतील.

८ एप्रिल, २०११

शेजवान सॉस


साहित्य :-
१. छोटा अर्धा कांदा
२. छोटा टोमॅटो
३. ४ ते ५ कसून पाकळ्या
४. आलं २ चमचे
५. ७ ते ८ ओल्या लाल मिरच्या

कृती :-
कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, लाल मिरच्या या सर्व गोष्टी बारीक चिरून घ्याव्यात. प्रथम तेलावर कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यात आलं लसूण घालून परतावे. आलं व लसणाचा वास यायला लागल्यावर त्यात टोमॅटो घालावा. सर्वात शेवटी मिरच्या घालाव्यात व अगदी मंद आचेवर हा सॉस घट्ट होईपर्यंत शिजवावा. थोडेसे मीठ घालावे. म्हणजे शेजवान सॉस तयार होईल.

हा सॉस चायनीज हक्का नुडल्स तसेच फ्राईड राइसमध्ये खूप छान लागतो. या सॉस ने चायनीज पदार्थाला वेगळीच चव येते.

चायनीज फ्राईड राइस



साहित्य :-
१. उभा चिरलेला कोबी अर्धी वाटी
२. उभा चिरलेला श्रावण घेवडा पाव वाटी
३. उभं चिरलेलं गाजर पाव वाटी
४. उभी चिरलेली सिमला मिरची पाव वाटी
५. वाट्या शिजलेला बासमती तांदूळ (तांदूळ कुठलाही वापरला तरी चालेल पण बासमती तांदुळाचा भात मोकळा होतो.)
६. ४ चमचे सोय सॉस
७. २ चमचे टोमॅटो केचअप
८. पाव चमचा चिली सॉस
९.पाव वाटी कांद्याची पात

कृती :-
बासमती तांदूळ प्रथम भिजवून ठेवावा. ४ पट पाणी एका पातेल्यात घ्यावे व त्याला उकळी आणावी. या पाण्यात थोडेसे मीठ घालावे. भिजवलेला तांदूळ घालून भात मोकळा शिजवावा. भात शिजला की जास्तीचे पाणी गाळून घ्यावे. सर्व भाज्या उभ्या चिराव्यात. एका पसरट कढईमध्ये थोडेसे तेल घ्यावे. तेल तापले की त्यात कोबी, गाजर, सिमला मिरची, श्रावण घेवडा या सर्व भाज्या घालाव्यात. भाज्या मऊ होईपर्यंत परतावे. मग त्यात सोय सॉस, टोमॅटो केचअप व चिली सॉस घालावा. सर्व भाज्यांना सॉस एकसारखा लागला की भाज्या एका बाजूला घेऊन एक अंड त्या कढईतच फोडून घालावं व छान परतून घ्यावं. सर्व भाज्या त्या अंड्यासोबत एकत्र कराव्यात व त्यात शिजलेला भात घालून नीट एकजीव करून घ्यावा. अंड आवडत नसल्यास नाही घातलं तरी चालेल. कांद्याची पात पेरून हा भात गरम गरम serve करावा.

जर थोडा चटपटीत भात आवडत असेल तर शेजवान सॉस घालावं. शेजवान सॉस कसा बनवावा ते चायनीज च्या thread वर बघावे.

वाढणी :- २ ते ३ माणसे


६ एप्रिल, २०११

श्रावण घेवडा- बटाटा-टोमॅटो




साहित्य :-
१. श्रावण घेवडा चिरून साधारण ३ वाट्या
२. १ मध्यम आकाराचा बटाटा
३. एक टोमॅटो
४. अर्धा चमचा हळद
५. २ चमचे गोड मसाला
६. धणे जीरं पावडर प्रत्येकी १ चमचा
७. ७ ते ८ कढीपत्ते
८. १/४ वाटी खोबरं
९. ४ चमचे दाण्याचे कूट
१०. गूळ अर्धा चमचा
११. फोडणीसाठी तेल
१२. हिंग
१३.मोहरी व जीरं

कृती :-
ही भाजी आपण थेट कुकर मधेच करणार आहोत. त्यासाठी कुकर मध्यम आचेवर गरम करून घ्यावा. त्यात फोडणीसाठी २ चमचे तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी व जीरं घालावा. दोन्ही तडतडले की मग त्यात चिमूटभर हिंग घालावे. कढीपत्ता घालावा. त्यानंतर सर्व मसाले घालून मिनिटभर परतावे. लगेचच चिरलेला घेवडा, चिरलेला बटाटा व टोमॅटो घालावा. थोडावेळ परतावे. अर्धी ते पाउण वाटी पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळावी व कुकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या करून घ्याव्यात. {आपल्या कुकर नुसार शिट्ट्यांचा अंदाज घ्यावा.} कुकरचे झाकण पडले की भाजी छान ढवळून serving bowl मध्ये काढावी व कोथिंबीर पसरून गरम गरम वाढावी. ही भाजी पोळी व भातासोबातही छान लागते.

वाढणी :- २ ते ३ माणसे.
ही भाजी मी सौ. रोहिणी गोरे यांच्या "उदर भरण नोहे " या blog वर बघून शिकले. रोहिणी ताई आभार!

शेवयाची खीर



साहित्य :-
१. Bombino शेवया १ वाटी
२. तूप ३ चमचे
४. बदामाचे काप, बेदाणे, चारोळी सर्व मिळून १/४ वाटी
५. दूध ४ ते ५ वाट्या
६. साखर एक ते सव्वा वाटी
७. पाव चमचा वेलची पूड
८. चिमूटभर जायफळ पूड
९. चिमूटभर केशर


कृती :-
एका पातेल्यात प्रथम तूप तापवावे. त्यात सर्व सुका मेवा अर्थात बदाम, बेदाणे व चारोळ्या घालाव्यात. मध्यम आचेवर हे सर्व परतावे. बेदाणे छान फुगले की त्यात शेवया घालाव्यात. शेवयांना छान तांबूस रंग यायला लागल्यावर त्यात दूध घालावे. दुधाला छान उकळी येऊ द्यावी. दूध छान उकळले की शेवया पण छान शिजतात. शेवया शिजल्यावर मग गोडाच्या आपल्या आवडीनुसार साखर घालावी. साखर घातल्यावर दूध थोडे पातळ दिसेल. परत छान उकळावे. म्हणजे दूध साखर व शेवया मिळून येतील. खीर जर जास्त दाटली आवश्यकतेनुसार दूध वाढवावे. Bombino शेवयांची खीर थोडी दाटसरच चांगली लागते. त्यात वेलची, जायफळ पूड व केशर घालून पुन्हा अगदी मंद आचेवर खीर उकळत ठेवावी. एक ५ मिनिटे उकळली की मग आच बंद करावी. थोडी थंड झाल्यावरच खीर serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे.

५ एप्रिल, २०११

टोमॅटो सार


साहित्य :-
१. ३ ते ४ पूर्ण पिकलेले टोमॅटो
२. १ छोटा बटाटा
३. अर्धा छोटा कांदा
४. २ चमचे तेल फोडणीकरता
५. अर्धा चमचा जीरं
६. १ हिरवी मिरची
७. १ लाल मिरची
८. हिंग
९. कढीपत्ता
१०. लोणी / butter
११. कोथिंबीर

कृती :-
प्रथम टोमॅटो, कांदा व बटाटा कूकर मध्ये शिजवावेत. एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यात जीरं, कढीपत्ता, हिंग, हिरवी व लाल मिरची न चिरता घालून खमंग फोडणी करावी. जर आवडत असेल तर आलं किसून त्याचा रस घालावा. शिजवून गार केलेले टोमॅटो, कांदा व बटाटा एकत्र मिक्सरमधून वाटावेत व या फोडणीमध्ये गाळून घालावे. थोडेसे पाणी घालून सार पातळ करावे.छान उकळी येऊ द्यावी. सार उकळले की serve करताना त्यावर कोथिंबीर व butter / लोणी घालून गरम गरम वाढावे. हे सार नुसते पिण्यासाठी किंवा पुलाव सोबत फारच छान लागते.

वाढणी :- २ ते ३ माणसे

४ एप्रिल, २०११


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी व भरभराटीचे जावो.

पुरी


साहित्य :-
१. पोळीची कणिक १ वाटी
२. चिमूटभर मीठ
३. १/४ टी. स्पून साखर
४. २ चमचे तेलाचे मोहन
५. कणिक मळण्यासाठी पाणी

कृती :-
प्रथम तेल गरम करावं. कणकेमध्ये मीठ, साखर व मोहन घालावे. थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट कणिक भिजवावी. १० ते १५ मिनिटे थांबून मग त्या कणकेचे छोटे छोटे गोळे करावेत. गोल लाटून ह्या पुऱ्या गरम तेलावर दोन्ही बाजूनी तळून घ्याव्यात.
खीर, आम्रखंड, बासुंदी अशा पक्वान्नासोबत पुरी छान लागते.

वाढणी :- वरील साहित्यात ७ ते ८ पुऱ्या होतील.