२७ फेब्रुवारी, २०१४

राईस आणि कॉर्न बॉल्स

साहित्य:-
१. शिजवलेला भात २ वाट्या 
२. शिजवून मॅश केलेले  कॉर्न
३. पाव वाटी मैदा 
४. १ कप दूध 
५. ३ ते ४ चमचे बटर 
६. २ हिरव्या मिरच्या 
७. पेरभर आलं 
८. २ ते ३ लसणाच्या पाकळ्या 
९. अर्धी वाटी कोथिंबीर 
१०. पाव वाटी कॉर्नफ़्लॉर 
११. अर्धी वाटी ब्रेड क्रम्स 
१२. चवीनुसार मीठ 
१३. तळणीसाठी तेल 

कृती:-
प्रथम आलं, लसूण, मिरची वाटून घ्यावी. एका पसरट जड बुडाच्या पातेल्यामध्ये बटर घालावे आणि ते वितळायला लागले की त्यात मैदा घालावा. सतत ढवळावे म्हणजे मैदा जास्त भाजला जाणार नाही. मैद्याला रंग चढायच्या आधी त्यात दूध घालावे. दूध घातल्यावर मात्र सतत गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत ढवळावे. हा सॉस घट्ट होत आला की  एका पसरट ताटलीमध्ये काढून घेऊन गार करून घ्यावा. गोल होईल अशा consistency चा हा व्हाईट सॉस तयार झाला की मग त्यात शिजवलेला भात, कॉर्न, मिरची आलं आणि लसणाच वाटण, कोथिंबीर, कॉर्नफ़्लॉर, ब्रेड क्रम्स व चवीनुसार मीठ घालावे. हे मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊन तेलावर मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर टाळून घ्यावेत. कुठल्याही चटणी किंवा सॉस बरोबर serve करावेत. 

वाढणी :- ३ ते ४ माणसे. 

१७ फेब्रुवारी, २०१४

ब्रेड रोल्स

साहित्य :-
१. ब्रेडचे स्लाईस ६ ते ८ 
२. उकडलेले बटाटे ३ ते ४ 
३. वाफवलेले मटार अर्धी वाटी 
४. हळद अर्धा चमचा 
५. तिखट अर्धा चमचा 
६. गरम मसाला १ चमचा 
७. आमचूर पावडर १ चमचा 
८. धणेपूड १ चमचा 
९. भरपूर कोथिंबीर 
१०. चवीनुसार मीठ 
११.  फोडणीसाठी तेल  
१२. तळणीसाठी तेल   
१३. अर्धी वाटी दूध

कृती :-
एका पातेल्यात फोडणीसाठी तेल घ्यावे. त्यात जिरे घालावेत. ते तडतडले की त्यात हळद, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, धणेपूड घालावी. मसाला तेलात नीट मिक्स करून घ्यावा. उकडलेला बटाटा हाताने कुस्करून या मसाल्यावर घालावा. मटार घालावेत. कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घ्यावे. या मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. मग एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊन गार करून घ्यावे. मिश्रण गार झाले की एका कढईमध्ये तळणीसाठी तेल तापत ठेवावे. एका पसरट ताटामध्ये दुध घालावे. ब्रेड स्लाईसच्या कडा काढून ते दुधामध्ये हलक्या हाताने भिजवून घ्यावेत. स्लाईस दुधातून अगदी लगेच काढून घ्यावेत. ते ओलसर झाले पाहिजेत. दोन्ही हातात स्लाईस धरून ज्यादाचे दुध पिळून घ्यावे. मग त्या स्लाईसमध्ये बटाट्याचे सारण भरावे. स्लाईसची एक बाजू पकडून घट्ट गुंडाळी करायला सुरुवात करावी. हे स्लाईस दुधात भिजवल्याने ते पटकन रोल होतात. छान  घट्ट रोल तयार झाला की तेलामध्ये खरपूस बदामी रंगावर टाळून घ्यावा. अशाप्रकारे सगळे स्लाईस रोल टाळून घ्यावेत व सॉससोबत serve करावेत. 

वाढणी :- २ ते ३ माणसे