२८ सप्टेंबर, २०१२

छोले बिर्याणी


साहित्य :-
१. १ कप बासमती तांदूळ
२. अर्धा कप छोले / कबुली चणा 
३. २ ते ३ मोठे चमचे दही
४. अर्धा चमचा हळद
५. अर्धा चमचा तिखट
६. १ हिरवी मिरची 
७. १ कप बारीक चिरलेला टोमॅटो
८. खडा मसाला :- तमालपत्र, ३ ते ४ लवंगा, ३ ते ४ मिरी, १ इंच दालचिनी, ३ ते ४ वेलदोडे 
९. चवीनुसार मीठ 
१०. बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर प्रत्येकी अर्धा कप 
११. पाव वाटी दूध 
१२. ५ ते ६ केशराच्या काड्या
१३. आलं लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा
१४. वितळलेले तूप २ चमचे 

कृती:-
प्रथम बासमती तांदूळ ३ ते ४ पट पाणी व चवीनुसार मीठ  घालून शिजवावा. शिजवताना त्यात खड्या मसाल्याची पुरचुंडी करून घालावी. म्हणजे भाताला मसाल्याचा छान वास लागेल. हा भात शिजवताना मात्र एक काळजी घ्यावी आणि ती म्हणजे हा भात मोकळा शिजला पाहिजे. त्यामुळे भाताचा दाणा बघत राहावं. जेव्हा भात शिजला आहे असं वाटेल तेव्हाच तो गाळून घ्यावा व गार होऊ द्यावा. कबुली चणे आदल्या दिवशी भिजत घालावेत व बिर्याणी करायच्या आधी कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. मग एका कढईमध्ये तेल घालून त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. त्यात हळद, तिखट व हिरवी मिरची घालावी. टोमॅटो घालावेत व २ ते ३ चमचे पाणी घालून ते शिजू द्यावेत. टोमॅटो छान मऊ शिजले की त्यात दही घालावं व त्यात उकडलेले छोले घालावेत. चवीनुसार मीठ घालावे व दाटसर ग्रेव्ही तयार करावी. आता एक मायक्रोवेव्ह सेफ बाऊल घेऊन त्यात प्रथम वितळलेले तूप घालावे. त्यात मग भाताचा एक थर घालावा. वर पुदिना व कोथिंबीर घालावी. वरून चोल्याच्या ग्रेव्हीचा थर घालावा. परत भाताचा थर घालून पुदिना व कोथिंबीर घालावी. दूधामध्ये केशर घालून ते पण भातावर वरून घालावे. मायक्रोवेव्हमध्ये ५ मिनिटे झाकण घालून बिर्याणी शिजू द्यावी. मायक्रोवेव्ह नसेल तर असेच थर कढईमध्ये घालावेत व ही कढई आचेवर तवा ठेवून त्यावर ठेवावी. म्हणजे भात खालून लागणार नाही. ही बिर्याणी serve करताना डाव पूर्ण खालपर्यंत घालून सर्व थर उचलले जात आहेत न ते बघावे. एखाद्या रायत्यासोबत ही बिर्याणी गरम गरम serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

१५ सप्टेंबर, २०१२

तळणीचे मोदक


साहित्य :-
१. १ कप मैदा
२. २ ते ३ चमचे बारीक रवा
३. २ चमचे तुपाचे मोहन 
४. चिमुटभर मीठ
५. दीड कप किसलेला सुकं खोबरं 
६. पाऊण वाटी साखर
७. २ चमचे खसखस 
८. ५ ते ६ बदाम
९. ४ ते ५ काजू
१०. १ चमचा वेलची पूड
११. चिमुटभर केशर
१२. वाटीभर कोमट दूध
१३. तळणीसाठी तेल 


कृती :-
प्रथम मैदा, रवा, चिमुटभर मीठ हे सर्व एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घालावे. हे तूप सर्व मैद्यामध्ये अगदी छान एकजीव करून घ्यावे. नंतर दुधामध्ये पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी व झाकून ठेवावी. सुकं खोबरं व खसखस २ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यावी. ही भाजलेली खसखस व खोबरं, साखर, बदाम, काजू व वेलची पूड सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. या बारीक झालेल्या खिरापतीमध्ये केशर घालावं. हे आपलं सारण तयार झालं. आता भिजवलेली कणिक खलबत्त्याने कुटून थोडी मऊ करून घ्यावी. मग त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून त्यात सारण भाराव. सर्व बाजूने लाटी एकत्र करायला सुरुवात करावी. सर्व लाटी नीट एकत्र आली की वर मोदकाचे तोंड दाबून बंद करावे. हा तयार मोदक ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावा. सर्व मोदक तयार झाले की ते गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. हे तयार मोदक गणपतीच्या प्रसादासाठी वापरले जातात व ते ४ ते ५ दिवस टिकतात. 

वाढणी :- या साहित्यात ११ ते १२ मोदक होतील. 

खिरापत


साहित्य :-
१. दीड कप किसलेला सुकं खोबरं 
२. पाऊण वाटी साखर
३. २ चमचे खसखस 
४. ५ ते ६ बदाम
५. ४ ते ५ काजू
६. १ चमचा वेलची पूड
७. चिमुटभर केशर
८. २ चमचे खवा 

कृती :-
सुकं खोबरं व खसखस २ मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यावी. ही भाजलेली खसखस व खोबरं, साखर, बदाम, काजू व वेलची पूड सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. या बारीक झालेल्या खिरापतीमध्ये केशर घालावं. खिरापत serve करताना  थोडासा खवा भाजून त्यात घालावा. 

वाढणी :- १ छोटी वाटी प्रसाद या साहित्यात होईल. 

७ सप्टेंबर, २०१२

आलू टिक्की


साहित्य :-
१. ३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे
२. २ ते ३ हिरव्या मिरच्या
३. ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या
४. पेरभर आल्याचा तुकडा
५. बारीक चिरलेली कोथिंबीर
६. २ चमचे कोर्नफ्लोर 
७. चवीनुसार मीठ

कृती:-
बटाटे उकडून सालं काढून किसून घ्यावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, लसूण व आलं घालावं. या तिन्हीही गोष्टी मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. त्यात कोर्नफ्लोर, कोथिंबीर व मीठ घालून छान गोळा मळून घ्यावा. हाताला तेल लावून या गोळ्याचे गोलाकार छोटे चपटे गोळे बनवावेत. किंवा तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या टिक्की बनवाव्या. एका पॅन मध्ये थोडं थोडं तेल घालून या टिक्की shallow fry करून घ्याव्यात. सॉस किंवा चटणीसोबत  गरम गरम serve कराव्यात.

वाढणी :- २ ते ३ माणसे 

४ सप्टेंबर, २०१२

लसूण चटणी


साहित्य :-
१. ५ ते ६ लसणाच्या मोठ्या पाकळ्या 
२. ४ ते ५ चमचे किसलेला सुकं खोबरं 
३. २ ते ३ चमचे पांढरे तीळ
४. १ चमचा देघी मिरची पावडर
५. चवीनुसार मीठ
६. १ चमचा तेल

कृती :-
एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यात सुकं खोबरं, तीळ व लसूण भाजून घ्यावा. भाजलेल्या गोष्टी गार झाल्या की मिक्सरमध्ये मीठ व तिखट घालून बारीक करून घ्याव्यात. ही लसूण चटणी ७ ते ८ दिवस छान राहते. 


लादीपाव


साहित्य :-
१. दीड कप सेल्फ रायझिंग फ्लोअर किंवा मैदा 
२. १ चमचा यीस्ट 
३. पाव चमचा साखर
४. १ कप कोमट पाणी 
५. १ चमचा बटर

कृती :-
प्रथम एका काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात सेल्फ रायझिंग फ्लोअर किंवा मैदा घ्यावा. जर तुम्ही मैदा वापरणार असाल तर त्यात अर्चा चमचा मीठ घालावं. पण सेल्फ रायझिंग फ्लोअरला मीठ घालायची गरज नाही. एका छोट्या वाटीमध्ये यीस्ट घेऊन त्यात साखर घालावी. कोमट पाण्यातील थोडं पाणी घालून यीस्ट active होण्यासाठी १० मिनिटे ठेवावे. पिठात हे यीस्ट घालून लागेल तेवढ्या पाण्यात पुरणाच्या पोळीसारखी पातळ कणिक मळावी. बटर लावून ही कणिक ५ ते ७ मिनिटे मळावी. हा daugh हाताला चिकटणार नाही अशा स्टेजला येईपर्यंत मळावा. मग काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेऊन वरून झाकावा. १ तास हा daugh ferment होऊ द्यावा. बकिंग ट्रेला तूप व मैदा लावून घ्यावा. ferment झालेल्या कणकेला हाताने बुक्क्या मारून त्यातील हवा काढावी व गोळा पुन्हा मळून घ्यावा. हाताला थोडे पीठ लावून या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून ते ट्रे मध्ये एकमेकाला थोडेसे चिकटतील असे ठेवावे. पुन्हा झाकून हे गोळे अर्धा तास ferment होऊ द्यावेत. तोवर ओव्हन ३५०f ला preheat करून घ्यावा. अर्ध्या तासाने ह्या गोळ्यांना वरून दुधाचा हात लावून बेक करायला ठेवावे. ३० मिनिटे बेक झाल्यावर बाहेर काढून लगेचच या पावला बटर लावावे. त्यामुळे पाव मऊ राहतो. हा पाव एका जाळीवर थंड होण्यासाठी ठेवावा. थंड झाला की एकमेकांपासून अलग करून मधोमध कापावा. वडा पाव, पाव भाजी किंवा अच्छी दाबेली सारख्या पदार्थांमध्ये हा पाव वापरता येऊ शकतो. तुमच्या ओव्हन नसेल तर convection microwave मध्ये १८०c  वर तुम्ही हा पाव बेक करू शकता. 

वाढणी :- या साहित्यात ५ ते ६ पाव होतील. 

वडा बनवण्याची कृती या पत्त्यावर पहावी :- http://migruhini.blogspot.com/2012/04/blog-post_30.html