३१ जानेवारी, २०१२

मसाला पापड


साहित्य :-
१. बारीक चिरलेला कांदा १ वाटी
२. बारीक चिरलेला टोमॅटो १ वाटी
३. चिरलेली कोथिंबीर
४. चाट मसाला १ छोटा चमचा
५. जिरे पूड अर्धा चमचा
६. चवीनुसार मीठ
७. अर्धा चमचा तिखट
८. तुमच्या आवडीचे ४ ते ५ पापड

कृती :-
प्रथम प्रत्येक पापडाला दोन्ही बाजूनी थोडसं तेल लावून घ्यावं. हे तेल लावलेले पापड मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्यावेत. एका बाउल मध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व बाकी सर्व जिन्नस घालून पापडावर घालायचा मसाला तयार करावा. मसाला तयार झालं की प्रत्येक पापडावर घालून चहासोबत किंवा जेवणाच्या आधी एखाद्या सूपसोबत serve करावेत.

वाढणी :- १ ते २ माणसे

१६ जानेवारी, २०१२

साधी चिकन करी


साहित्य :-
१. बारीक चिरलेला कांदा १ कप
२. बारीक चिरलेला टोमॅटो १ कप
३. १ चमचा तिखट
४. १/२ चमचा हळद
५. धना जीरा पावडर प्रत्येकी १ चमचा
६. गरम मसाला १ चमचा
७. पॅप्रिका किंवा देगी मिरची पावडर १ चमचा
८. १.५ पाऊंड चिकन
९. चवीपुरतं मीठ
१०. कोथिंबीर सजावटीसाठी
११. आलं लसूण किसून प्रत्येकी १ चमचा

कृती :-
प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. एका चाळणीमध्ये जास्तीचं पाणी गाळण्यासाठी चिकन ठेवून द्यावं. एका कढईमध्ये तेल तापवून त्यात कांदा परतावं. कांदा ब्राऊन झाला की त्यात आलं लसूण घालून मिनिटभर परतावं. मग हळद, तिखट, पॅप्रिका, गरम मसाला, धना जीरा पावडर सगळा घालून परत मिनिटभर परतावं. मग त्यात टोमॅटो घालून शिजवून घ्यावा. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत छान परतावा. मग त्यात चिकन घालावं व मिक्स करून झाकण लावून एक २ ते ३ मिनिटं शिजवावं. चिकनला तेल आणि पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी आत्ता घालू नये. थोडं थोडं पाणी घालत झाकण लावून चिकन शिजू द्यावं. चिकन शिजलं की त्यात तुम्हाला जेवढी पातळ ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालावं व मीठ घालून चिकन पुन्हा २ ते ३ मिनिटं शिजवावं. कोथिंबीर घालून गरम गरम serve करावं.

वाढणी :- २ ते ३ माणसे

१४ जानेवारी, २०१२

गुळाची पोळी


साहित्य :-
१. २ वाट्या किसलेला गूळ
२. पाव वाटी बेसन
३. खसखस व तीळ प्रत्येकी २ चमचे
४. अर्धा चमचा वेलची पूड
५. ३ वाट्या कणिक
६. अर्धी वाटी तेल

कृती :-
पहिले पोळीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यावी. फक्त ही कणिक थोडी घट्ट असावी. किसलेला गूळ घ्यावा. त्यात खसखस व तीळ भाजून त्यांची पूड करून ते घालावे. बेसन तेलावर थोडं भाजून घ्यावं व गुळामध्ये घालावं. त्यात वेलची पूड घालावी. गुळाबरोबर हे सर्व जिन्नस मिक्स करावेत. आता या गुळाचा गोळा मळून घ्यावा. त्यासाठी अगदी थोडं थोडं दूध वापरावं. दूध अगदी अर्धा अर्धा चमचा घालत राहावं. दूध जास्त झालं तर पोळी लाटली जाणार नाही. थोडं तेल लावून गुळाचा छान गोळा मळून घ्यावा. आता कणकेचे गोळे करून घ्यावेत. त्यातला एक गोळा घेऊन त्याचे दोन भाग करावेत. त्याच्या छोट्या लाट्या करून घ्याव्यात. त्यातल्या एका लाटीवर गुळाचा एक गोळा ठेवून वरून दुसरी लाटी लावावी. कडा नीट बंद करून घ्याव्यात. व तांदुळाची पिठी लावून हलक्या हाताने पोळी लाटावी. मध्यम आचेवर तवा तापवून पोळी दिनही बाजूनी भाजून घ्यावी. अशाप्रकारे सर्व पोळ्या करून घ्याव्यात. गुळाच्या पोळीवर साजूक तूप घालून ही पोळी serve करावी.

वाढणी :- २ ते ३ माणसे

११ जानेवारी, २०१२

तीळगूळ वडी


साहित्य :-
१. २ वाट्या चिरलेला गूळ
२. १. वाटी भाजलेले तीळ
३. १ वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट
४. २ चमचे किसलेलं सुकं खोबरं
५. चिमूटभर वेलची पूड
६. १ चमचा तूप

कृती :-
प्रथम एका ताटाला तूप लावून ठेवावे. कढईमध्ये गूळ घालून मध्यम आचेवर कढई तापवावी. गूळ वितळला की लगेचच त्यात तीळ, दाण्याचं कूट व वेलची पूड घालावी. पटापट ढवळून घ्यावं. तुपाने ग्रीस केलेल्या तटावर हे मिश्रण घालून एखाद्या डावाने ते भरभर पसरून घ्यावे. या डावाला देखील थोडेसे तूप लावावे म्हणजे गूळ डावाला चिकटणार नाही. मिश्रण एकसारखा पसरलं की त्यावर सुकं खोबरं लावून हलक्या हाताने दाबून घ्यावं. लगेचच सुरीने वड्या पाडाव्यात. तिळगुळ वडी तयार.

वाढणी :- वरील साहित्यातून साधारणपणे १२ ते १५ वड्या होतील.

१० जानेवारी, २०१२

बाजरीची भाकरी


साहित्य :-
१. बाजरीच पीठ २ वाट्या
२. गरम पाणी
३. पांढरे तीळ २ चमचे

कृती :-
बाजरीच पीठ गरम पाणी घालत घालत थोडसं सैलसर मळून घ्यावं. मळलेल्या गोळ्याचा छोटा उंडा घेऊन दोन हातामध्ये त्याचा दाबत दाबत त्याचा चपटा गोल बनवून घ्यावा. पोळपाटावर थोडं तांदळाचं पीठ भुरभुरून त्यावर हा चपटा गोळा ठेवावा. हाताने हळू हळू थापत थापत गोल भाकरी बनवावी. त्यावर लगेचच थोडे तीळ लावून हलक्या हाताने दाबून घ्यावेत. भाकरीला ज्या बाजूला तीळ लावलेले आहेत ती बाजू तव्यावर देखील वरच आली पाहिजे अशा प्रकारे भाकरी तव्यावर टाकावी. लगेचच भाकरीच्या वरच्या बाजूला थोडसं पाणी लावायचं. हे पाणी थोडं वाळत आलं की भाकरी उलटावी. परत २ ते ३ मिनिटं भाकरी भाजली गेली की मग उलटून थेट आचेवर भाजावी. जर तुमच्याकडे कॉईल असेल तर त्यावर ठेवायची एक जाळी मिळते. त्या जाळीवर भाकरी भाजली तरी छान फुलते. अशा गरम गरम भाकऱ्या लोणी लावून serve कराव्यात.
ही बाजरीची भाकरी संक्रांतीच्या आदल्या दिवशी अर्थात भोगीला खाल्ली जाते.

वाढणी :- १ ते २ माणसे