३ एप्रिल, २०२०

दाल खिचडी



साहित्य :-
१. तांदूळ २ वाटी 
२. मूग डाळ १ वाटी 
३. तूर डाळ पाव वाटी 
४. मसूर डाळ पाव वाटी 
५. ३ ते ४ लवंग 
६. २ पेरभर दालचिनी 
७. २ तमालपत्र 
८. २ हिरव्या मिरच्या 
९. १ चमचा काश्मिरी लाल तिखट 
१०. १ चमचा धणेपूड 
११. १ चमचा जीरंपूड 
१२. १ चमचा गरम मसाला 
१३. बारीक चिरलेला कांदा दीड वाटी
१४. बारीक चिरलेला टोमॅटो १ वाटी
१५. बारीक चिरलेली कोथिंबीर १ वाटी
१६. मोहरी १ चमचा 
१७. जीरं १ चमचा 
१८. १० ते १२ कढीपत्त्याची पानं 
१९. प्रत्येकी १ चमचा किसलेलं आलं आणि लसूण 
२०. फोडणीसाठी तेल 

कृती :-
प्रथम तांदूळ आणि इतर सर्व डाळी एकत्र करून पाण्यामध्ये २ - ३ वेळा धुवून घ्याव्यात आणि  पाणी गाळून घ्यावे. अर्धा तास तांदूळ आणि डाळी भिजल्या की त्या कुकरमध्ये घालून त्यात दुपटीपेक्षा थोडं जास्त पाणी आणि चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्याव्यात. एका पातेल्यात तेल घेऊन ते तापलं की मोहरी जीरं घालून फोडणी करावी. त्यात लवंग, तमालपत्र आणि दालचिनी घालावी. कढीपत्त्याची पानं घालून झाकण ठेवावं आणि आच कमी करावी. असं केल्यानं कढीपत्त्याचा छान स्वाद खिचडीला लागतो. झाकण मिनिटभराने काढून आच माध्यम करावी आणि मग त्यात कांदा घालावा. कांदा परतून घेतानाच आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालावी. कांदा मऊसर शिजला की त्यात धणेपूड, जीरंपूड, लाल तिखट आणि गरम मसाला घालावा. मसाले मिनिटभर सतत हलवून परतून घ्यावेत आणि मग त्यात टोमॅटो घालावा. २ - ३ चमचे पाणी घालत घालत टोमॅटो मऊ आणि एकजीव होईपर्यंत परतून घ्यावा. हा मसाला तयार झाला की त्यात दीड ते २ वाट्या पाणी घालावं. कोथिंबीर व चवीनुसार मीठ  घालून या मसाल्याला छान उकळी काढावी. कुकरचं झाकण उघडून ठेवावं. सगळा मसाला कुकरमध्ये घालून तांदूळ आणि डाळींसोबत एकजीव करून घ्यावा. या दाल खिचडीवर तूप घालून आणि लिंबू पिळून ती गरम गरम serve करावी. 

वाढणी :- या साहित्यात ३ ते ४ माणसांची खिचडी होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा